भाग २ : राग
आश्लेषाला जेंव्हा
इतरांचा राग यायचा तेंव्हा त्यांच्या तक्रारी करायची एकमेव हक्काची जागा होती .... तिचा
"म्याव". मग ती तक्रार कधी तिच्या आईची असायची तर कधी तिच्या आजी आजोबांची,
वडिलांची ... आणि मग ती पक्के ठरवून माझ्याकडे यायची. "मी तिच्याशी बोलनार
नाई. तू पण बोलू नको."
एकदा तर काही तरी कारणाने
तिला घराचे कोणीतरी ओरडले. ती सरळ आमच्या घरी आली आणि रडत रडत म्हणाली, " मी आता
त्यांच्या घरी जानार नाई. ते लोक मला ओरडतात."
"अग, पण ते तुझेसुद्धा घर आहे न?"
"नाई. आता ते
माझ घर नाई."
"मग तुझ घर कुठल?"
डोळे पुसत आमच्या घराकडे बोट
दाखवून म्हणाली, "हे माझ घर आहे."
"अग, पण तुझा
ड्याडी तर त्या घरी राहतो ना? मग तू इथे ड्याडी शिवाय राहणार का?" ती रडणे थांबवून
विचारात पडली. सिद्धेशवर तिचे अतोनात प्रेम ... काय करायचे प्रश्न पडला.
परत रडवेल्या सुरात
म्हणाली "तू त्याला पण इथे राहायला सांग."
"अग, पण तिथे
त्याचे आई बाबा राहतात ना? मग तो त्यांना सोडून इथे कसा राहील? तुला कसा तुझा ड्याडी
पाहिजे तसा तो तर त्याच्या ड्याडीबरोबर राहणार ना?" आता रडणे पूर्ण थांबले. प्रश्न
काही सुटत नव्हता. विचार चालू होता. "मग ते मला ओरडले तसं तू पण त्यांना ओरड.
मग मी जाईन त्यांच्याकडे."
"मी त्यांना ओरडलो
आणि ते मला म्हणाले की .... "आम्हाला ओरडणार तर तू आमच्या घरी येऊ नको" ..... तर मग आपण कसे भेटणार
आणि खेळणार."
आता हा मोठा लफडा झाला.
रडणे पूर्ण थांबले. पण माघार कशी घ्यायची? "मग मी ड्याडी ला सांगेन त्यांना ओरडायला."
प्रश्न मिटला. संध्याकाळी सिद्धेश येईपर्यंत मुक्काम आमच्या घरी _!
आमच्या वरच्या मजल्यावर तिची आत्या राहते. एकदा आश्लेषाचा आणि तिचा काही कारणावरून वाद झाला. आणि ती आश्लेषाला खोट खोट म्हणाली. " मग तू आमच्याकडे येऊ नकोस. जा तुझ्या म्यावकडे."
आश्लेषा खाली आली आणि
मला पाहिल्यावर रडायला लागली. मी विचारले "काय झाले?" "निमा आत्या म्हणाली
तू आमच्याकडे येऊ नको. म्यावकडे जा. मी आता त्यांच्याकडे कदीच नाई जानार."
"मग तू तिला सांगितलास
का की तू तिच्याकडे कधीच जाणार नाहीस ते?"
"मी नाई सांगनार.
तूच सांग तिला. मी तिच्याशी बोलनार पन नाई."
"तू बोलली नाही
तर तिला कसे कळणार की तू तिच्याशी बोलत नाहीस आणि घरी पण येत नाहीस." रडणे थांबले.
थोडा विचार केला आणि ती आमच्या घरातून गेली. दोन मिनिटात परत आली आणि म्हणाली,
"मी सांगितलं तिला की मी तुज्याशी बोलनार नाई आनी त्यांच्या घरी पण जानार नाई."
"मग तू प्रनु
दीदी आणि चैतू दीदीशी (तिच्या आते बहिणी) कशी खेळणार?" विचार करून ती म्हणाली,
"मी नाई त्यांच्याशी खेलनार. मी तुज्याशी खेलनार."
"पण त्यांनी खेळायला
बोलावले तर?"
ही परत वर जाऊन आली.
"मी निमा आत्याला सांगितलं की प्रनु दीदी आणि चैतू दीदी नि खेलायला बोलावलं तरी
मी येणार नाई." "आणि त्यांच्याकडे चिकन केले कि ते तुला खायला बोलावणार.
मग तू काय करणार? मग तर तुला जावेच लागणार."
चिकन प्राणप्रिया
.. पण यावेळेला अपमान जर जास्तच झोम्बालेला .. परत वरची एक फेरी झाली आणि येउन म्हणाली,
" मी तिला सांगितला की चिकन खायला बोलावलं तरी मी येणार नाई." मी विचारले
की "चिकन तर तुला आवडते ना? मग ते खायला का जात नाहीस?"
ती म्हणाली,
" मग ती तुज्या म्याव कडे जा म्हणाली ना. मग मला नको त्यांचे चिकन. तू मला चिकन
देशील?" अच्छा .. म्हणजे म्याव चे नाव भांडणात का घेतले? हा खरा मुद्दा होता.
काही दिवसांनी ती परत
निमाच्या घरी जायला लागली. एक दिवस मी विचारले. "काय ग, निमा आत्याशी भांडण झालेले
ना? मग तिच्या घरी आता कशी गेलीस?"
"कारण का तिने
मला चिकन खायला बोलावलेलं ना?. मग ते चिकन उरणार ना? म्हणून मी खायला गेली."
"पण तू तिला सांगितलेलं
ना की मी चिकन खायला बोलावलं तरी येणार नाही." थोडा विचार करून मग मला वेड्यात
काढत ती म्हणाली, "अर्रे, कारण का ती त्या दिवशी बोल्ली ना की येऊ नको म्हणून.
आज नाई बोल्ली ना. म्हणून मी आज गेली. त्या दिवशी कुठे गेली मी तिच्याकडे?"
What a logic ???