चित्रपट :
"घरोंदा" गाणे : तुम्हे हो ना हो, मुझ
को तो इतना यकीन है
Dear Friends, हे गाणे
वाचताना आणि ऐकताना मला जे जाणवले ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
माझे मन तुझ्याकडे ओढ
घेते आहे पण मला ते प्रेम आहे याची खात्री नाही. नव्हे नव्हे ... ते प्रेम नाहीच
याची मला खात्री आहे. तरी ही माझ्या मनात हे असे का घडतेय? या संभ्रमित अवस्थेचे
यथार्थ वर्णन गुलझारजीनी या कवितेमध्ये केले आहे. वाचल्यावर मला तरी ही सरळसोट कविता
आणि फक्त कविताच वाटते आणि कविता म्हणूनच मनाला भावते. पण जयदेवजींचा स्पर्श होताच
सुरेल गाणे बनून आपल्यापुढे येते.
आपण कोणाच्याही घरी
जातो तेंव्हा प्रथम त्यांच्या घराची बेल वाजवतो. हे गाणे सुरु होतानाच
"तुम्हे हो ना हो" या शब्दांनंतर आणि "मुझ को तो" नंतर एक
मोठ्ठा pause (मोकळा अवकाश) सोडलाय आणि त्यामध्ये नेमका या "बेल" चा
आवाज टाकला आहे (नीट ऐका _ तो "डिंग डॉँग" सदृश Violin स्वर).
ऐकणारा लगेच काळीज उघडून गाण्याकडे पाहू लागतो.
गाणे सुरु होताच
कवितेमधले "नही है नही है" असे थेट अर्थाचे शब्द .. जयदेवजींनी
त्यामधे देखील किंचितसा pause सोडून एकदम सुंदर परिणाम साधलाय. प्यार
"नही है" की " है" ही अस्पष्टता, तिच्या मनातला हा संभ्रम
लगेच आपल्यापर्यंत पोहोचवून जातात. नीट ऐकले की लक्षात येते .."मुझे
प्यार तुमसे नही है नही ____ है" असे शब्द कानावर पडतात. पहिल्याच ओळीत
pause नंतर येणारा "है" शब्द आलापांमध्ये असा हेलकावत येतो की "नही
है" चा परिणाम पुसला जाऊन "है" चा परिणाम शिल्लक राहतो आणि आपली
खात्री पटते " मुझे प्यार तुमसे है". पण ..... दुसऱ्या ओळीमध्ये pause
नंतर येणारा "है" .... हा खिळ्यावर हातोडा ठोकल्यासारखा येतो आणि लगेच
थांबतो. आपण पुन्हा संभ्रमात ... की नक्की "है"? का "नही
है"?
दोन्ही ओळीत येणारा
"प्यार" हा शब्द नीट ऐकला तर लक्षात येते की पहिल्या ओळीत साधा सरळ आणि
सौम्य गोड असणारा "प्यार" असा उच्चार दुसऱ्या ओळीत (प्या sss र)
झोपाळ्यावर वर खाली हिंदोळल्यासारखा आलाय आणि त्यामुळे लडिवाळपणे आपल्या मनाला
बिलगून जातो.
गाणे खूप जुने आहे.
आताच्या पिढीतील किती जणांनी ऐकले आहे? त्यांना हे बारकावे जाणवले आहेत का?
किंबहुना असे बारकावे असतात याची त्यांना कल्पना आहे का? आणि असे बारकावे आपले
मित्र, नातेवाईक अशा सारख्यांपर्यंत पोहोचावे असे आपल्याला वाटते का? आपण ते
पोहोचवतो का? माहिती नाही. मला हे आपल्यापर्यंत पोहोचवावे असे वाटले, मी
लिहिले. सर्व गाणे बारकाव्यांसहित लिहायचे तर तुम्हाला कितपत आवडेल? आज काल
वाचायला इतका वेळ आहे का कोणाकडे ? म्हणूनच मी फक्त गाण्याच्या
सुरुवातीबद्दल लिहिलेय. आणि ते सुद्धा मला जाणवलेले एक दोन बारकावे _! तुम्ही
या गाण्यात असेच काही बारकावे अनुभवले असतील तर जरूर लिहा.
तुम्हे हो ना हो, मुझ
को तो __ इतना यकीन है
मुझे प्यार ___ तुम से
___ नहीं है नहीं __ है
No comments:
Post a Comment