Thursday 11 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग शेवटचा




जानेवारी १९९८ - हिमालयाचे आमंत्रण


जानेवारीचा पहिलाच आठवडा _ मी घरात दिवाणखान्यात सोफ़ावर डोळे बंद करून बसलो होतो. समोर एक धिप्पाड आकृती दिसू लागली. भगवी छाटी नेसलेला एक नाथपंथी डोळ्यांसमोर अवतीर्ण झाला. मनात शब्द उमटले "जालंदरनाथ"! भरदार देहयष्टी, दाढीमिश्यांनी भरलेला भारदस्त तेजःपुंज चेहरा _ 
गळ्यात, हातात रुद्राक्षमाळा _ शब्द उमटले "चल, आता तुझे इथे काय काम? इथले काम संपले. चल आता हिमालयात _".

माझ्या नजरेत पाणी तरळले. ज्या आमंत्रणाची वाट साधक जन्मोन्जन्म करतो, ते आमंत्रण इतक्या सहजपणे पदरात पडले? नजरेसमोर आई-बाबा आले. मी उत्तरलो, "आज मी घर सोडलं तर हे घर कोलमडून पडेल. या घरात कमावता मी एकटाच आहे. डोक्यावर कर्ज आहे. आईबाबांचं पुढच आयुष्य कस जाईल? मी मुक्त आहे, हे मी जाणतो. कारण मी कर्ता करविता नाही. 
जो कर्ता करविता आहे तोच आई बाबांची काळजी करेल आणि घेईल. पण लौकिक जगात तुमच्या मुलाचा बदलौकिक होईल. लोकांनी मला नावे ठेवली तर चालेल पण तुमच्या भक्तीची फळे माझ्या आईबाबांच्या त्रासात नसावी. अन्यथा लोकांना वाटेल, तुमची भक्ती करणाऱ्याचे आई-वडील असेच वाऱ्यावर सोडले जातात. लोकांनी भक्ती, श्रद्धा, विश्वास यांना नावं ठेवलेली मला नकोत. ते इथे वळावेत ही माझी इच्छा आहे. याउपर आपली आज्ञा असेल त्याप्रमाणे मी करेन."

डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. नाथांचा चेहरा समाधानाने हसला. माझ्या पाठीवरून डावा हात फिरवला. "तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. तथास्तु!" 
उजवा हात आशिर्वाद देण्यासाठी उचलला.

डोळे उघडले तेंव्हा अविरत अश्रू झरत होते. माझे उत्तर योग्य की अयोग्य _ काळच ठरवेल.



समाप्त


No comments: