Monday, 8 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १६




१९९७ - कोहं


आता ध्यानामध्ये मन अधिकाधिक एकाग्र होऊ लागले.

एक दिवस ध्यानाला बसलेला असताना समोर अक्कलकोट येथील स्वामींचे मंदिर दिसू लागले. निर्गुण पादुका जेथे आहेत ते अक्कलकोट येथील स्थान .... त्या स्थानाच्या डाव्या बाजूला असलेल्या जाळीच्या दरवाजापाशी मी उभा होतो. माझ्या समोरच्या जाळीच्या दरवाजामागे बायका, मुले आणि त्यांच्यामागे इतर लोकांची गर्दी होती. साधारण आरती झाल्यानंतरचे वातावरण होते. मी आणि माझ्यामागाचे (जे मला दिसत नव्हते पण जाणवत होते) तसेच समोरचे .. असे आम्ही सारे जण जाळीचे दरवाजे उघडण्याची वाट पहात होतो. माझ्या बाजूने असलेल्यांमध्ये मी रांगेत पहिला होतो. विचार करत होतो _ दरवाजा उघडला की जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे.

समोरचा दरवाजा उघडला. मनात म्हटले की "आता त्या बायका स्वामींचे दर्शन घेऊन माझ्या उजव्या बाजूच्या दरवाजाने बाहेर पडणार". त्या बायका आत आल्या, पण निर्गुण पादुकांकडे  न जाता माझ्या दिशेने आल्या. निर्गुण पादुकांच्या जागी काहीच नव्हते. ती जागा रिकामी होती. त्या बायका समोर येउन माझ्या पायावर डोके ठेऊन नमस्कार करून बाहेर पडू लागल्या. मला समाजत नव्हते की काय चालले आहे. मी मागे वळून पाहीले. माझ्यापाठीमागे अत्यंत तेजस्वी अशा संन्याशांची रांग उभी होती. ते सारे उजवा हात आशीर्वादपर उभा करून शांत उभे होते. तुळतुळीत गोटा_ भगवी छाटी/ कफनी _ दिव्य तेज _ माझे माझ्या हाताकडे लक्ष गेले. तोही आशीर्वाद देण्यासाठी उभा होता _ अगदी त्या संन्याशांप्रमाणेच _! कोण आहेत हे ? आणि त्याहीपेक्षा महत्वाचे की  ..... कोण आहे मी? कोहं ... कोहं ...कोहं ....कोहं ...




No comments: