Wednesday, 10 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १८






१३ डिसेंबर  ..... 

ध्यानाला बसल्यावर ...
समोर अद्भुत प्रकाश दिसू लागला. पांढरा शुभ्र आणि सोनेरी किरण मिश्रित _ !
एक कमळ समोर अवतीर्ण झाले. ते उमलताच त्यात ब्रह्मदेव बसलेले दिसले. 
ते प्रचंड आकाराचे कमळ व त्यात बसलेले ब्रह्मदेव  काही क्षणानंतर माझ्या दिशेने येऊ लागले. 
जसजसे ते अधिकाधिक जवळ येऊ लागले, आकार लहान होत गेला. थोड्या वेळाने लक्षात आले कि त्याचा रोख माझ्या छातीच्या दिशेने होता. हलकेच ते लहान होऊन माझ्या छातीत डाव्या बाजूला शिरले व हृदयात विराजमान झाले. 

१४ डिसेंबर  ..... 

ध्यानाला बसल्यावर ...
समोर अद्भुत प्रकाश दिसू लागला. पांढरा शुभ्र, सोनेरी किरण आणि निळसर छटा _ !
त्यात दोन आकृत्या अवतीर्ण झाल्या. एक पुरुष एक स्त्री _
दुरून अस्पष्ट दिसत होत्या. पण रेखीव होत्या. 
त्या एकमेकांच्य दिशेने हलकेच सरकल्या _ तरंगत तरंगत एकमेकात मिसळल्या. आता समोर एकाच आकृती होती; अर्धा पुरुष अर्धी स्त्री  ... डावा भाग स्त्री ... उजवा भाग पुरुष _
आता परत ते वेगळे होऊ लागले. थोड्या अंतरावर जाऊन थांबले. काही क्षणानंतर परत एकत्र झाले आणि शब्द कानावर पडले "अर्धनारीनटेश्वर"! आता आकृती स्पष्ट दिसत होती, विष्णू आणि लक्ष्मी _
एकूण तीन वेळा ते दूर जाऊन पुन्हा अर्धनारीनटेश्वर या रुपात दिसले. तिसऱ्यांदा एकत्र झाल्यावर हलकेच माझ्या दिशेने येऊ लागले. लहान लहान होत माझ्या हृदयात विलीन झाले. 

 डिसेंबर  ..... 

ध्यानाला बसल्यावर ...
मी जिथे बसलो होतो त्या बैठकीच्या खाली सपाट जमीन होती. पण मला वेगळंच दिसू लागले. मला दिसले कि मी एका प्रचंड मोठ्या शिळेवर बसलो आहे. माझ्या कमरेला व्याघ्रचर्म गुंडाळलेलं  आहे. मला पाठीमागे आणखीन दोन हात आहेत. एका हातात डमरू आहे. उजवीकडे त्या शिळेत खोवून एक त्रिशूल उभा आहे. मागच्या डाव्या हातात शंख आहे. गळ्यात एक जाडजूड साप/ नाग आहे. डोक्यावर जटा बांधल्या आहेत. संपूर्ण शरीरावर भस्म लावलेलं आहे. त्याचे पट्टे आहेत. जटामधुन पाण्याची एक धार निघाल्याची जाणीव आहे. पण पाणी दिसत नाहीय. कपाळावर मधोमध तिसरा डोळा _ चारही बाजूनी उंच कातळ वरवर गेलेत.

सगळीकडे शांतता आहे. आजवर अनेक ठिकाणी शांतता अनुभवली पण कितीही शांत वातावरण असले तरी तिथे अत्यंत सूक्ष्म नाद ऐकू यायचाच. ही शांतता मात्र खऱ्या अर्थाने नीरव होती. सूक्ष्मातले सूक्ष्म, अगदी अणुवर अणु आपटल्याचादेखील नाद नाही.  वातावरण स्तब्ध _तिथे प्रकाश नाही पण तरीही काळोखही नाही. जणू काळ गोठून गेलाय _ श्वासोश्वासाचाही आवाज नाही _ श्वासही स्तब्ध _ बंद पडलाय ? की कधी चालूच झाला नव्हता? ना कसली जाणीव ना नेणीव _ शिळेवरून डावा पाय खाली सोडून _ उजवा पाय दुमडून मी ध्यानस्थ बसलेला _ पण ही अवस्था तरी अस्तित्वात आहे का इतकं सार गोठलेले _ किती काळ लोटला कुणास ठावूक _ कारण तिथे काळ नावाचं काही अस्तित्वही जाणवत नव्हत.

अचानक डमरुचा कडकडाट, तडतडाट सुरु झाला. शंखाचा नाद ऐकू आला. पुन्हा सार शांत _ मूळ स्थितीत _ आणि मग .... शब्द ऐकू आले _ ऐकू आले की सुरु झाले? ते शरीरात उत्पन्न होत होते की वातावरणात _ त्याचं उगमस्थान कुठे होत _ असं वाटत होत की सारीकडून ते शब्द उमटत आहेत. कणाकणात उमटत आहेत _ सारे कण एक बनलेत आणि  ..... ते जे काही एक आहे त्यात ते शब्द उमटत आहेत. किंबहुना ते जे काही एक आहे ते फक्त त्या शब्दांचा उमटणारा नाद आहे. 

अहं शिवं ... अहं शिवं ...अहं शिवं .... 

अनाहत उमटणारे ते शब्द फक्त अस्तित्वात आहेत. किंबहुना फक्त नाद _ 

अहंशिवंअहंशिवंअहंशिवंअहं .… 

दोन नाद _  अहं आणि शिवं _ आता एकत्र झालेत. 

शिवंअहंशिवंअहंशिवंअहंशिवं .… 

शब्द एकेमेकात विलीन होत चाललेत.

शिवोहंशिवोहंशिवोहंशिवोहं .… 

नाद बदलत चाललेत. 

सोहंसोहंसोहंसोहंसोहंसोहं ……………………………………………………………
………………………………………………… ………………………………. 





No comments: