Saturday 6 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १४


१९९७ - नामःस्मरण


याच काळात मी श्री तीर्थक्षेत्र पावस येथे पोचलो. परमहंस श्री स्वामी स्वरुपानंदांचे निवासस्थान _ स्वामी ज्या खाटेवर झोपत त्यासमोर बसलो होतो. स्वामी स्वरूपानंद हे नामःस्मरणाचे अंतिम टोक _ असा योगी होणे नाही. त्यांना विनंती केली की नामःस्मरणाबाबत काही शिकवावे. काही नवीन ज्ञान माझ्या पदरात टाकावे.

त्या काळापर्यंत नामःस्मरणाचे अनेक अद्भुत अनुभव गुरुकृपेने प्राप्त झाले होते. अंगावरची कातडी नाममय झालेली _ रक्तप्रवाहातून रक्ताऐवजी नाम वाहात आहे _ शरीराचा कण अन कण नाममय झालेला _ यासारखे नाना अनुभव घेतले होते. एक प्रकारचा अहंकार झाला होता _ नामाचे सारे प्रकार आत्मसात केले असल्याचा _ ! जिभेच्या टोकापासून सुरु होऊन मेंदूपर्यंत तसेच जिभेच्या टोकापासून हृदयापर्यंत, बेम्बीपर्यंत किंवा शरीराच्या खालच्या टोकापर्यंत त्याची तार कशी काम करते हे गुरुमाउलीने दाखवले होते. यापेक्षा आणखी काही शिल्लक असेल असे वाटत नव्हते. त्याबाबत किंचितही शंका मनात नव्हती. पण त्या दिवशीचा अनुभव आगळा-वेगळा होता.

मी प्रार्थना करताना डोळे मिटलेले होते. प्रार्थना संपताक्षणी जाणवले की ........ मी नाकातून जो श्वास घेतो आहे तो श्वास नसून नाम आहे. बाहेरच्या हवेतील नाम नाकातून आत शिरत होते व तसेच नाकातून बाहेर पडत होते. हवा नामाचा आकार धारण करून आत बाहेर करत होती. मी श्वास घेत नसून नाम घेत आहे याची जाणीव होत होती. हलके हलके लक्षात आले की हे कसे व कधी शक्य होते.

त्यादिवशी "मला नामःस्मरण कळते" या अहंकाराची शकले उडाली. किंबहुना "मला काही कळते" या अहंकाराची शकले उडाली.





No comments: