Wednesday, 2 April 2014

एका योग्याची डायरी - भाग ५

|| श्री स्वामी समर्थ ||

आता आरती, भजन यांचा विचार करू.

भजन आणि आरती हे दोन्ही मुख्यतः सामुहीक स्वरूपात केले जाणारे साधनाप्रकार आहेत. या दोन्ही प्रकारांमध्ये साथीला टाळ, चिपळ्या, पेटी (Harmonium) आणि तबला/ मृदंग/ ढोलक अशी वाद्ये असतात. मात्र हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत.

भजन हे देवाला आळवण्यासाठी केले जाते. त्यात बरेचदा कधी स्पष्ट तर कधी अस्पष्ट स्वरुपात मागणे मागितलेले असते. तर कधी कधी परिस्थितीवरचे भाष्य असते. साधारणतः अभंग हा प्रकार यात प्रामुख्याने दिसून येतो. अभंगांव्यतिरिक्त ओव्या आणि भारुडासारखी देवावर रचलेली गीतेदेखील भजनातच समाविष्ट करता येतात. हा देवासमोर बसून सादर करायचा अविष्कार आहे.

आरती ही देवाची स्तुती आणि कौतुक असते किंवा त्याने जे जे केले त्याबद्दल त्याचे आभार स्वरूपी वर्णन असते. त्यात सहसा देवाचे श्रेष्ठत्व किंवा त्याची महानता वर्णन केलेली असते. यात देवाचे शारीरिक किंवा अध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन असते. कधी कधी कौटुंबिक वर्णनही यात असते. उदाहरणार्थ - पार्वतीच्या आरतीमध्ये गणपती, कार्तिकेय, महादेव यांची नावे समाविष्ट असणे.

या दोन्ही साधनांमध्ये सामुहीक नाद हा अत्यंत महत्वाचा असतो. व्यवस्थित निर्माण झालेला नाद निसर्गातील Positive कणांना समूहाकडे खेचून घेतो. उदाहरण द्यायचे झाले तर आपण एकेकटे एखाद्या छोट्याशा चुंबकासारखे असतो. प्रत्येकाचे वैयक्तिक बल / बळ हे १० एकक असेल तर २५ जणांचे एकत्रित बळ २५० एकक बनते. हे एकत्रित बळ जास्त वेगाने आणि दूरवरचे कण आकर्षित करू शकते.
मात्र कधी कधी असे नाद हे नाद न राहता उन्माद बनतात. ज्याला उन्माद होतो त्याला आपण कोणी देवस्वरूप झाल्याचा भास होतो. ज्यांना असा उन्माद होत नाही त्यांना ही व्यक्ती काही विशेष आहे असे वाटू लागते. आणि ..... आरती बाजूला राहून व्यक्तिस्तोम वाढू लागते.

या दोन्ही प्रकारांमध्ये एक कमतरता असते. तुम्ही आरती आणि भजन केलेत की जोपर्यंत त्या समूहाबरोबर असता, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या शरीरात आणि आजूबाजूच्या वातावरणात Positive Energy जाणवते. मात्र तुम्ही तिथून घरी गेलात की ही Energy झपाट्याने कमी झालेली आढळते. भजन किंवा आरतीच्या ठिकाणी उत्पन्न वा जमा झालेली Energy तुम्ही वैयक्तिक स्वरुपात किती शोषून घेऊ शकता (सोप्या शब्दात – शरीरात किंवा मनात भरून घेऊ शकता) यावर त्या भजन किंवा आरतीचा तुमच्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो. बरेचदा आरती खूप छान झाली असे वाटते पण जीवन फारसे बदलत नाही. मग भजन किंवा आरती यांना महत्व नाही का? .... महत्व आहे .... भजन किंवा आरती हे वैयाक्तिक साधनेला उभारणी देण्याचे काम करतात. याला English मध्ये Boosting किंवा Charging असे म्हणता येईल.

श्री. सिद्धेश धुमे यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे गेल्या चार भागात थोडेसे विषयांतर होऊन मूळ विषय बाजूला पडला. खरे तर हे विषय खूप विस्तीर्ण आहेत आणि त्यांच्या विस्तारात प्रत्येकाला रस असेलच असे नाही. अगदी मोजक्या शब्दांमध्ये आणि थोडक्यात आपण हे विषय Cover करण्याचा प्रयत्न केला. ज्यांना विस्तारपूर्वक Discussion करायचे आहे किंवा काही मते पटली नाहीत, ते कधीही ब्लॉगवर किंवा FB वर लिहू शकतात. मलाही माझे ज्ञान वृद्धिंगत करण्यास आवडेल.

जे विषयांतर झाले ते चांगल्यासाठीच असे मी मानतो. त्या योग्याचे काही अनुभव हे आत्तापर्यंत सादर केलेल्या लिखाणाला पुष्टी देणारे ठरतील असा माझा विश्वास आहे. आपल्यासमोर काही तरी GREAT किंवा भव्य दिव्य असे ठेवण्यासाठी हे अनुभव नाहीत. तसेच कुणाचा बडेजाव मांडण्यासाठीही नाहीत. जर कुणी अभ्यासू स्वतःच्या अनुभवाविषयी शंकीत झाला असेल किंवा विश्लेषण करू इच्छित असेल तर त्याला तुलना / विश्लेषण करणे सोपे जावे म्हणून हे लिहिले आहे हे कृपया लक्षात घ्यावे.


Let us start the diary of his Experience.

No comments: