Friday 11 April 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग ८



१९९५ - श्री ज्ञानेश्वर महाराज

ज्ञानेश्वरी वाचत होतो. मनात आपोपाप अर्थ उमटत होता. ज्ञानेश्वरी लिहिताना त्यांना काय नेमके सांगायचे होते ते आपोआप मनाला उमजत होते. तसेच आज विशिष्ठ ओवीचा ... कोणत्याही संदर्भात संबंध जोडून सांगितला जाणारा अर्थ ... हा कसा चुकीचा आहे आणि त्यामुळे मार्ग कसा चुकतो हे समजत होते. साधी सोपी सरळ ज्ञानेश्वरी ... तिचा गूढ अर्थ शोधण्यात वेळ घालवून लोकांनी गहन करून टाकली.

निसर्गाचे काही नियम आहेत. कोणता नियम कोठे लागू पडतो, कोणती गोष्ट कोणत्या ठिकाणी वापरावी याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

ज्ञानेश्वरी वाचून झाली आणि पसायदान सुरु झाले. सावकाश वाचताना त्याचा ओळीमागून ओळ ... अर्थ ध्यानात येऊ लागला. सुंदर अनुभव होता. त्या काळात भोवताली एक आवरण अनुभवत होतो. मन एकदम मऊ झाले होते. जणू दुधात भिजले होते. जणू माउली माझ्याकडून ज्ञानेश्वरी जगवून घेत होती.

एक दिवस ... नेहमीप्रमाणे कामावरून उशीरा परत येताना ... लोकलच्या दरवाजात उभा होतो. आकाशाकडे पहात.  गाडी बऱ्यापैकी रिकामी होती. गाडीने मुंब्रा स्टेशन सोडले. दुरवर डोंगरांची रांग घसरली होती. हिरवीगार झाडी पसरलेली पाहत होतो. एका मग्न क्षणी ... मला सारे जग परमेश्वराने व्यापलेले दिसू लागले. प्रत्येक वस्तू .. अगदी अणु रेणू त्याने कसा व्यापला आहे ते उमजू लागले. मनात .. कि कानात .... कोणीतरी बोलले ....

व्यापीले अवघे जीवाणू |
तैसे व्यापीयले अणु रेणू |
कवणे सांगावे कवणु |

आता मी ध्यानाला बसू लागलो. चित्त आपोआप   एकाग्र होऊ लागले. भोवतीचे माउलींचे आवरण विरळ होत गेले. काही दिवसांनी नवे आवरण जाणवू लागले.


No comments: