Sunday, 30 November 2014

माझ्या आयुष्यात आलेली एक सुंदर परी .. आश्लेषा


भाग १ : लपंडाव


"ए म्याव ... मी किचनमध्ये लपनार. तू मला हॉलमध्ये आणि बेदलुममध्ये शोधायचं हां."
"ए म्याव ... आपन आओ मीना खेलू या का?"
"ए म्याव ... सांग ना ... मी पानाला कोन्ता कलर देऊ?"
"ए म्याव ... तू आमच्याकडे कधी ऱ्हायला येनार?"

आज अशी अनेक वाक्ये आठवत आहेत. भोवताली पुष्कळ प्रसंग फेर धरून नाचत आहेत आणि कानात तिचे गोड शब्द "ए म्याव ... ए म्याव ..." गुंजन करत आहेत. एकेका शब्दाचा उच्चार विचारपूर्वक, स्पष्टपणे आणि अत्यंत धीमेपणाने करत बोलण्याची तिची शैली मनात रुतून बसली आहे. माझ्यावर असलेले तिचे निर्व्याज प्रेम मला आजही संभ्रमात टाकते. कुणास ठाऊक पण कोणत्यातरी पुर्वजन्माचा ऋणानुबंध घेऊन आश्लेषा जन्माला आली इतके नक्की! 

२००७ मधली गोष्ट आहे. मी आणि हरदत्तमामा एकाच इमारतीमध्ये राहत होतो. त्याचे घर पहिल्या मजल्यावर तर आमचे तिसऱ्या .... त्याचा मुलगा, सिद्धेश आणि माझा स्नेहसंबंध हा भावापेक्षा खूप वेगळ्या पातळीवरचा आहे. आमच्यामधला जिव्हाळा, प्रेम हे शब्दातीत आहे. आश्लेषा ... सिद्धेशची मुलगी ... जन्मली तेंव्हा सिद्धेश नोकरीनिमित्त इंग्लंडमध्ये रहात होता. आश्लेषा .... तिची आई आणि आजी-आजोबा-आत्या यांच्यासह राहत होती. रोज कामावरून घरी परत येताना पहिले त्यांच्या घरी जाऊन आश्लेषासोबत थोडा वेळ घालवून मग जेवायला घरी येत असे. जेवण झाल्यावर परत खाली जाऊन तिच्याबरोबर खेळण्यात माझा वेळ कसा जाई काही कळत नसे. ती झोपली की मी घरी परतत असे. तान्हे बाळ होती ती ... तेंव्हा इतर लहान मुलांप्रमाणे गुदगुल्या करणे, डोके अंगावर घासणे असे प्रकार केले की तीसुद्धा सर्वांना प्रतिसाद देत असे. पण आमचा खेळ वेगळाच चाले. ती ज्या बेडवर असे त्याच्या कोणत्यातरी बाजूला खाली लपून मी मांजराचा आवाज करत असे आणि ती तो आवाज शोधण्याचा प्रयत्न करत असे. त्या दिशेला कुशीवर वळण्याचा प्रयत्न करत असे. आणि मी दिसलो की खुदकन हसत असे. तिला मांजरांचा आवाज करणारी बरीच खेळणी मी आणून दिली होती. ती जशी मोठी झाली तशी मग माझी ओळख "म्याव काका" अशीच झाली. आणि मग तिच्याबरोबर खेळता खेळता मी तिचा काका न राहता तिच्या वयाचा मित्र झालो आणि काका गळून नुसता "म्याव" राहिला. 

ती थोडीशी मोठी झाली तसा आमचा लपंडाव खऱ्या अर्थाने रंगू लागला. मी लपलो की ती घरभर शोधत असे आणि नाही सापडलो की अस्वस्थ होऊन मग रडवा चेहरा करून "म्याव तू कुठे आहे?" असे ओरडत फिरत असे. घरातले कुणीतरी मग तिला हळूच कानात मी लपलेली जागा सांगत असे. मग मी सापडलो की तिचे वाक्य ठरलेले असे. "म्याव असे नाही करायचे हा. तू मी सांगते तिथे लपायचे." मग माझी लपायची जागा ती सांगायची. इकडे तिकडे शोधण्याचे नाटक करून मला एकदम अचूक हुडकून काढायची आणि एकदम खुश होऊन जायची. 

तिची लपण्याची पाळी आली की आणखीन मजा यायची. ती सरळ जाहीर करायची, "ए म्याव ... मी किचनमध्ये लपनार. तू मला हॉलमध्ये आणि बेदलुममध्ये शोधायचं हां. मग मी नाही सापडली की तू मला हाक मारायची. मग मी तुला सांगेन .... मी किचन मधे आहे मग तू मला किचन मधे शोधायचं. पण मला आउट नाही करायचं हा. मग तू हरलास की मी बाहेर येणार. OK?" मग ती लपायची ठरल्याप्रमाणे सगळे पार पडायचे आणि ती जिंकायची.

कधी कधी मी थेट ती लपलेल्या जागी जाऊन तिला आउट केले की मग रुसून बसायची, " म्याव ... तू चीटिंग करतो. तू पयले मला बेदलुममधे आणि किचनमधे शोधल नाही." मग परत माझ्यावर डाव येत असे आणि तिला हाक मारत घरभर फिरावे लागत असे.

कधी कधी मी मुद्दाम हॉलमध्ये टाईम पास करायचो. मग ती किचनमधून हळूच बाहेर यायची आणि मी दिसलो की म्हणायची, "ए म्याव, मला बेदलुममधे शोध ना."

कधी मी बराच वेळ मुद्दामच तिला हाक मारत नसे. मग ती बेडरूममधून ओरडून सांगायची, "ए म्याव, मी बेदलुममधे कपटामागे लपलीय का विचार ना?" किंवा "ए म्याव, मी बेदलुममधे खिडकीत लपलीय का विचार ना?"

या साऱ्या लपंडावामधे तिचा हा असा निरागसपणा खूप उठून दिसत असे. आजही तिची निरागसता तशीच टिकून आहे. ही निरागसता हा तिचा स्थायी स्वभाव आहे.


------X------O------X------



No comments: