केतन भाई माझ्यासाठी कायमचे genius no.1 बनले याला आणखीन बरीच कारणे आहेत. केतन भाईंच्या अनेक कथा मनात फेर धरून आहेत. त्या साऱ्या इथे सांगणे शक्य नाही. पण वानगीदाखल आणखी दोन उदाहरणे सांगितल्याशिवाय राहवत नाही.
शेअर मार्केट मध्ये खरेदीच्या टिप्स देणारे भरपूर लोक होते, आजही आहेत. पण घेतलेले शेअर कधी विकावे याचे अभ्यासपूर्वक अचूक आडाखे/ अंदाज बांधणारे मला फार क़्वचितच आढळले. जास्तीत जास्त लोक वाट बघत बसतात. भाव वर जातात आणि खाली येतात. लोक पुन्हा भाव वर जातील म्हणून वाट पाहत राहतात. कधी भाव वर खाली होत राहतो आणि एक दिवस खाली येतो तो वर जात नाही.
पण केतन भाई मात्र विक्रीची वेळ अचूक साधत. रु.२५ किमतीला खरेदी केलेला शेअर रु.४५-४६ झालेला असे. मार्केट मध्ये बातमी असे कि भाव रु.५० ओलांडून जाणार. ६०-७०-७५ आकडे ऐकू येत. केतन भाई मात्र शांतपणे ४३-४४ पासून शेअर विकायला सुरुवात करीत. ४६-४७ पर्यंत सर्व शेअर विकून मोकळे होत आणि अभ्यासपूर्वक शोधलेल्या दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीकडे वळत. विचारले कि सांगत "भाव वरती जाणार असेल तर जाऊ दे. पण माझ्या अभ्यासाप्रमाणे शेअर overpriced झाला आहे." आणि गम्मत म्हणजे भाव ४७-४८ किंवा फार तर ५० पर्यंत जाऊन खाली कोसळत असे. लोक मग तो शेअर खाली येताना केतन भाईंनी विकला त्यापेक्षा खालच्या भावात विकत असत. असा अभ्यासू माणूस मला तरी नंतर एखाद दुसराच आढळला.
केतन भाईंच्या दूरदृष्टीचा मला आणखी एक अनुभव आला. १९९४ ची गोष्ट आहे. तेंव्हा Mutual Funds भारतात आपले पाय रुजवू पाहत होते. एक दिवस मी त्यांना Mutual Funds बद्दल बोलताना ऐकले. ते सांगत होते कि सर्वसामान्य माणसांनी आता Mutual Funds कडे वळायला हवे. हे उद्याचे मार्केट आहे. छोट्या गुंतवणूकदारांसाठी हा एक छान उपयुक्त पर्याय असून त्यांनी शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्यापेक्षा १५-२० वर्षांचा काळ नजरेसमोर ठेवून Mutual Funds मध्ये नियमितपणे पैसे गुंतवले पाहिजेत. शेअर बाजार येत्या १०-१२ वर्षात हलके हलके Indian Institutional आणि Foreign Institutional गुंतवणूकदारांच्या हातात जाणार आहे. पुढच्या १५ वर्षात शेअर बाजार खरोखरच institutional गुंतवणूकदारांच्या हातात गेलेला दिसून आला. छोट्या गुंतवणूकदारांना थेट गुंतवणुकीमध्ये तोटेच जास्त सहन करावे लागले किंवा घेतलेल्या शेअरशी लग्न करून त्यांना घरात ठेवावे लागले. मात्र योग्य Mutual Funds मधील गुंतवणुका त्या मानाने बऱ्यापैकी सुरक्षित असल्याचे अभ्यास सांगतो. माझ्या Genius च्या यादीतील आणखीन एक व्यक्ती श्री. जुझर गाबजीवाला हे देखील Mutual Funds मधील नियमित गुंतवणुकीला प्राधान्य देताना मला आढळले. थोड्या फार फरकाने त्यांचे म्हणणे देखील केतन भाईंप्रमाणच आहे.
आजच्या परिस्थितीचे अचूक भाकीत करणारे अनेक असतील. पण २० वर्षांपूर्वी तसे कोणी केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. मी आजपर्यंत केतन भाईंसारखा दुसरा genius पाहिलेला नाही. इतका अभ्यासू, अचूक निदान करणारा, भविष्याची अप्रतिम जाण असणारा आणि सर्वांकडून आदर मिळवून या साऱ्याचा कुठेही गर्व नसणारा असा माणूस माझ्या पाहण्यात तरी नंतर आला नाही. केतन भाई माझ्यासाठी तरी नेहमीच आदर्श नं. १ राहिले आहेत.
केतन भाई .... तुम्हाला मनःपूर्वक सलाम!
No comments:
Post a Comment