असाच एक दिवस __
त्या दिवशी गाडीत शिरल्यावर धक्काबुक्की करून मी जागा पकडली आणि जरा निवांत बसल्यावर आलेले विचार ....
आज मला अत्यंत गरज होती ती या जागेची _ खूप दमलो होतो. ही जागा मिळवण्यासाठी मी कोणत्याही ठरला जाऊ शकतो, हे आजूबाजूला पाहिल्यावर माझ्या लक्षात आले आहे. पण आता उशीर झालाय. मी धडपड करून, धक्काबुक्की करून ही जागा ताब्यात घेतली तेंव्हा मी इतर कोणाचा हक्क हिरावून घेत असेन असा विचार मला स्पर्श देखील करू शकला नाही. रांगेत माझ्यापुढे असणारे अजून उभे आहेत आणि मी आरामात बसलो आहे. मी दमलो होतो ... सत्य आहे. पण या रांगेत माझ्यापेक्षा जास्त दमलेला कोणी असू शकेल हे माझ्या का लक्षात आले नाही? जर असा कुणी असेल तर त्याच्या हक्कांपासून मी त्याला वंचित ठेवले आहे हे निश्चित आहे.
एखाद्या आत्यंतिक गरजेपोटी आपण इतरांचा हक्क हिरावून घेतो. त्यांच्या गरजा जाणून घेणे तर दूरच, पण तसा विचार देखील मनाला स्पर्शून जात नाही. त्या क्षणाला आपली सारासार विचारशक्ती क्षीण झालेली असते; विवेक संपलेला असतो; सद्सद्विवेक बुद्धी लोप पावलेली असते. इतरांचा हक्क हिरावून आपण तणाव मुक्त होतो. पण नंतर आपली प्रतिक्रिया काय असते?
आपल्यातले काही इतरांच्या गरजेचा विचार करतात आणि त्यांच्याबरोबर जागा (हक्क) विभागून घेतात. पण अशा रीतीने वाटणी करताना इतरांवर उपकार करत असल्याचा अविर्भाव त्यांच्या वागण्यात प्रकट होतो. जेंव्हा तुम्ही मिळवल तेंव्हा तो तुमचा हक्क म्हणून स्वीकारलेत ना? मग इतरांकडे हस्तांतरित करताना मात्र दात्याच्या भूमिकेत शिरता? हे योग्य आहे?
काहींना तर इतरांच्या गरजांचा विचार करण्याची देखील आवश्यकता वाटत नाही. ते स्वतःच्या आरामदायी अवस्थेवर इतके फिदा असतात कि इतरेजन त्यांना तुच्छ वाटतात.
एकदम पहिल्या वेळी मन सावध असते. ते तुम्हाला जाणीव करून देते _ इतरांच्या हक्कांची! पण मनाकडे दुर्लक्ष केले जाते. आरामदायी अवस्थेवर लक्ष केंद्रित केले जाते. हलके हलके मनाची ही जाणीव / टोचणी देखील क्षीण होत जाते. इतरांचा हक्क हिसकावताना मन आपल्याला सावध करत नाही. डार्विनचा सिद्धांत आहे _ ज्या अवयवाचा वापर केला जात नाही तो गळून जातो; नष्ट होतो. मनाचा तो सावध करणारा विशिष्ट कप्पा बंद होतो _ कायमचा! आणि मग असे हिसाकावणे म्हणजे स्वतःचा हक्क कमावणे वाटू लागते.
आज सर्वत्र अशीच परिस्थिती बनत चालली आहे.
ज्या क्षणाला तुम्ही relax होता त्याच क्षणाला विचार करा.
आजूबाजूला एखादा गरजू असू शकेल.
त्यालाही नितांत गरज असेल.
त्याची निकड समजून घ्या.
त्याला शोधा _त्याला ओळखा _ आणि त्याचा हक्क त्याला द्या.
No comments:
Post a Comment