बुधवार दि. २२-०५-२०१३
२४-०५-२०१३ माझ्या आईचा ७५वा वाढदिवस _ त्याचा छोटासा घरगुती कार्यक्रम रविवार, दि. २६ रोजी करण्याचे योजिले होते. त्या तयारीत असतानाच संध्याकाळी whats app वर बातमी वाचली. माझी वर्गमैत्रीण सुवर्णा देशमुखची आई वारली. सुवर्णाच्या आईला भेटायचे राहून गेले. आईच्या आजारपणात सुवर्णाला धीर देण्यासाठी देखील भेटू शकलो नाही.
शनिवार दि. २५-०५-२०१३
गेले २ दिवस माझे विचार आमच्या दोघांच्या आयांभोवातीच घोटाळत होते. आज सकाळी ट्रेनमध्ये एकामागोमाग ओळी सुचत गेल्या. ट्रेनमध्ये एका सुरेख कवितेने आकार घेतला. पण ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत स्मरणशक्तीने दगा दिला. त्यातले आठवले तेव्हढे लिहून काढले. आता तुमच्यासमोर तेच पेश करतोय.
आई
चालता चालता तीन शब्द ... पडले माझ्या कानी
गोठून गेलो उत्तर ऐकून ... डोळा आले पाणी
पुसत होता कोणी कोणा ... "कशी असते आई"
पुसणाऱ्याला सांगत होती ... कुणी एक बाई
नवजात शिशुसाठी ... गाते अंगाई
शी काढा .. शु पुसा .. आई बनते दाई
बालपणी माई ... तशी कुमारपणी ताई
तरुणपणी शिंगे फुटताच ..... आई वाटते बाई
लहानपणी गोष्टी आणि बालपणी मस्ती
मुले तरुण होतात तेंव्हा .... आई एकटीच द्रष्टी
आई असते घरी तरी नजर खिळली दारी
सुखरूप यावी मुले ... हीच काळजी उरी
भरलेल्या घरात ... कोणी राहते का उपाशी
मुले अजून जेवली नाहीत ... आई वेडीपिशी
सारी सृष्टी मुलांमध्ये ... दृष्टी तिची अटळ
नजरेमधून ओघळ होतात ... जगामधले बदल
दिवस सरतात भराभरा ... मुले होतात मोठी
डोंगराएव्हढी माया तेंव्हा दिसू लागते छोटी
आभाळाची माया सोडून झेप घेतात नभी
परत येईल पाखरू म्हणून आई दारात उभी
दूरदेशी पाखरू ... इथे आई दुःखी कष्टी
कढत अश्रू डोळ्याआड ... शीतल राखी दृष्टी
शेवटी ती म्हणाली ... "एकच तुला सांगते"
"आई जाणण्यासाठी ... पहिले आई व्हावे लागते"
खळकन खळले पाणी ... कसे सांगू बाई
मनात म्हटले "चुकलीस... आधी गमवावी लागते आई"
No comments:
Post a Comment