Thursday 4 July 2013

तुमको देखा तो ये खयाल आया



गझलची खासियत ही आहे की त्यात एकाच अक्षराचे उच्चार कधी तोंडाच्या पुढच्या भागातून तर कधी घशातून केले जातात. तसेच अक्षरांमधल्या आणि शब्दांमधल्या जागा कशा घेतल्या जातात यावरही ती गझल मनाला भावणे अवलंबून असते.

"  तुमको देखा तो ये खयाल आया "   ही जगजीत सिंग यांची एक सोपी आणि सरळ वाटणारी (?) गाजलेली गझल. मला त्यात काय गमले ते मी इथे सांगायचा प्रयत्न करतोय. प्रयत्न अशासाठी की गझल वेगवेगळ्या मैफिलीत पुन्हा पुन्हा ऐकताना, तिच्यामधल्या अनेक नवीन जागा जाणवत राहतात. पण मी फक्त मूळ गाण्याबद्दल लिहिणार आहे.

जगजीत आणि चित्राच्या हुंकारांनी गाण्याची सुरुवात होते. सुरुवातीलाच चित्राने जी तान घेतली आहे ... जवाब नाही! त्यानंतरचे तिचे .... हुं हुं हुं .. हुं हुं ..एखाद्या किनऱ्या घंटेसारखे कानामध्ये गुंजन करते. किती वेळा rewind करून ते ऐकले असेल गणतीच नाही. आणि तिचा आवाज ऐकून आता यानंतर जगजीत यापेक्षा चांगली काही करामात दाखवू शकेल असे वाटले नाही. पण जसे जसे गाणे पुढे सरकू लागते तसे .... एक एक लाजवाब क्षण कानात रुंजू लागतात. संपूर्ण गीत एका मुलायम स्वरात गाताना काही शब्द आणि अक्षरे ठळक उच्चारून मस्त परिणाम साधलाय. जितके गुण जगजीत सिंग यांना तितकेच संगीतकार कुलदीप सिंग यांनादेखील दिले पाहिजेत.


तुमको देखा तो ये खयाल आया
जिंदगी धूप तुम घना साया

सुरुवातीलाच देखा चा "खा" इतका मस्त घेतलाय आणि खयाल शब्दाचा उच्चार करताना "ख" आणि "याल" मध्ये जी त्याने जी जागा घेतली आहे ती अप्रतिम . . "देखा" आणि "खयाल" हे दोन्ही शब्द जवळजवळ एकामागोमाग येतात. पण देखा मधील ख ठळक (तोंडातून) उच्चारून आणि खयाल मधला ख (घशाजवळून) एखाद्या पिसासारखा अलगद सोडून दिलाय. "साया" शब्दाचा उच्चार इतका मुलायम झालाय की जणू दुधावरची सायच !


आज फिर दिलने इक तमन्ना की
आज फिर दिलको हमने समझाया

"आज फिर" हे शब्द दोन्ही ओळीत आहेत. पहिल्या ओळीत वरच्या आणि दुसऱ्या ओळीत खालच्या सुरात हे शब्द आलेत. ऐकताना एकदम सहज म्हटल्यासारखे वाटतात. पण "फिर" चा उच्चार करताना र असा सोडलाय की ती जागा पकडणे अशक्यप्राय वाटते. दोनी ओळीत दिल हादेखील common शब्द आहे. पण दोन्ही वेळी "ल" चा उच्चार वेगळा केलाय. पहिला "ल" सहज सोडलाय तर दुसरा "ल" काळजात ठककन ठोका देऊन जातो. समझाया मध्ये "झा" वर केलेला आघात देखील हृदयात घुसतो.


तुम चले जाओगे तो सोचेंगे
हमने क्या खोया हमने क्या पाया

गाण्यात पहिली ओळ दोनदा आहे ती वेगवेगळ्या सुरावटीत .... पहिलि ओळ ऐकताना एक प्रकारचा बेफिकीरपणा वाटतो. तर दुसरी ओळ काळजाला सर्र्र्कन स्पर्शून जाते. दोन्ही ओळी या मुळातच वेगवेगळ्या लयीत असल्या तरी हा फरक "तो सोचेंगे" या दोन शब्दांच्या उच्चारावेळी "तो" आणि "सो" यात दुसऱ्या वेळी जो किंचित जास्त वेळ दिलाय त्याने आलाय.

"हमने क्या खोया हमने क्या पाया" ही तर एकदम झकास ओळ आहे. दोन वेळा येणारा हमने हा शब्द ... त्यातला "ह" कसा उच्चारालय ते खास अनुभवायची गोष्ट आहे. पहिला हमने तोंडातून आणि दुसरा घशातून तसेच ते अलगद सोडून दिलेले "खोया" आणि "पाया" शब्द ...


हम जिसे गुनगुना नही सकते
वक़्तने ऐसा गीत क्यू गाया

इथेही "हम" चा (खास करून "ह" ऐका) उच्चार एकदम गंभीर करून जातो आणि पुढच्या वाक्याची तयारी करून जातो. "जिसे" शब्द दुसऱ्यांदा उच्चारताना घेतलेली फिरकी तर "क्या बात है"!  "सकते" शब्दाचा उच्चार करताना "स" आणि "क" चा उच्चार तर ऐकणेबल आहे. "वक़्तने ऐसा" पर्यंत एकदम मुलायम असणारा स्वर .... गीत मधल्या "गी" वर आघात देऊन मस्त परिणाम साधलाय.

मित्रांनो मी यातल्या काही जागाच लिहिल्यात पण तुम्हाला आणखी काही गमले असेल तर जरूर कळवा आणि हो .... तुम्हाला भावलेले एखादे दुसरे गाणे असेल तर जरूर लिहा.




No comments: