Tuesday, 9 July 2013

गुरुदत्तचे चित्रपट - एक योगायोग


गुरुदत्तच्या चित्रपटात तीन वेळा त्याच्या चित्रपटाची सहनायिका (किंवा Vamp)  त्याच्या पुढच्या चित्रपटाची नायिका बनली. 

१९५१ साली गुरुदत्तने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट _ बाझी! यात नायक होता देव आनंद आणि कल्पना कार्तिक नायिका ... पण बाझी चे नाव काढले की कल्पना कार्तिक आठवते का हो?   "तदबीर से बिगडी हुई तक़दिर बना ले" म्हणत डोलणारी आणि ते खास शब्द "ए हेयsss  हे हेय sss" ... गीता बाली झटकन समोर येते. 

गुरुदत्तने दिग्दर्शित केलेला पुढचाच चित्रपट "जाल" _ साल १९५२ _ नायक परत त्याचा परममित्र देव आनंद आणि आता नायिका गीता बाली! "चोरी चोरी मेरी गली आना हैं बुरा" ,"ये रात ये चांदनी फिर कहा "  , " दे भी चुके हम दिल नजराना" अशी सुरेल गाणी तिच्या वाट्याला आली होती. 

१९५४ मध्ये निर्माता आणि दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेत शिरून त्याने पहिला चित्रपट काढला _ "आर पार" .... नायक पण तो स्वतःच होता तर नायिका होती श्यामा . "ये लो मैं हारी पिया", "कभी आर कभी पार", "सुन सुन सुन सुन जालीमा" अशी एक से बढकर एक गाणी तिच्या तोंडी होती. पण भाव खाऊन गेली ती क्लब डान्सर शकीला _ चणे तोंडात टाकत उभा असलेला गुरुदत्त .. आणि त्याच्यासमोर क्लबमध्ये  बसलेल्यांना मदहोश नजरेने घायाळ करत सळसळत नाचणारी शकीला _ "बाबुजी धीरे चलना प्यार में sss ".  दुसऱ्या कडव्यानंतर "बडे धोके हैं ... बडे धोके हैं इस राह में" हें गाताना गुरुदत्तकडे तिने टाकलेला खुनशी कटाक्ष आणि नजर ..लाजवाब ! परिणाम ???  १९५६ _ निर्माता गुरुदत्त _ चित्रपट  सी आय डी _  नायक देव आनंद आणि नायिका?? ...... शकीला !

१९५६ साली आलेला "सी आय डी" हा एक मैलाचा दगड _ अप्रतिम गाणी, अप्रतिम छायाचित्रण, सुंदर रहस्यकथा _ पण इथेही योगायोग पहा. नायिका शकीलावर चित्रित केलेली "लेके पहला पहला प्यार", "बुझ मेरा क्या नाम रे" ही सर्वांगसुंदर गाणी मात्र तिच्या तोंडी नाहीत. आशा भोसलेंच्या आवाजामधले  थोडेसे उदासवाणे "लेके पहला पहला प्यार" आणि  "आंखो ही आंखो में" हें देव आनंद बरोबरचे अशी दोनच गाणी शकीलाच्या वाट्याला आलीत.

शकीलाबरोबर यात सहनायिका वहिदा रेहमान होती. थोडीशी खलनायकी छटा असलेली भूमिका तिच्या वाट्याला आली होती. आणि गाणी म्हणाल तर क्या बात हैं _ "जाता कहा हैं दिवाने" आणि "कही पे निगाहे कही पे निशाना" ... दोन्ही भावखाऊ गाणी _ आणि वहिदाची अप्रतिम अदाकारी! परिणाम पुन्हा तोच _ 

पुढचे चित्रपट _ प्यासा", "कागज के फुल"  _ निर्माता + दिग्दर्शक + नायक गुरुदत्त _ नायिका  ???वहिदा रेहमान _ आणि पुढे "चौदहवी का चांद", "साहब, बीबी और गुलाम" मध्ये गुरुदत्त - वहिदा जोडी कायम राहिली. 



No comments: