Thursday 18 July 2013

योद्धा - PREQUEL

शैली,

काल आणि आज, किती फरक पडला आहे. कालची हसतमुख मी आज गप्प असते. सदाफुली म्हणून ओळखली जाणारी मी कोमेजून चालले आहे. प्रत्येक जण विचारतो आहे, "काय झालं?" काय उत्तर द्यायचं तेच कळत नाही. काल सर्वांची दुःख माझी होती. मी त्यांच्या दुःखात सहभागी व्हायचे. त्यांना हसवायचे आणि मीही हसायचे. मला वैयक्तिक दुःखे होती. पण ती कधी मी मोठी मानली नाहीत. मग आज असं काय आभाळ कोसळलं?

खूप विचार केला आणि छोटेसे सत्य लक्षात आले. काल मी सुखाची चव चाखली नव्हती. मी विसरले होते कि सुख नावाचे काही अस्तित्वात असते. वेदना सहन करीत जगणे अंगवळणी पडले होते. त्यामुळे इतरांच्या वेदना मी समर्थपणे समजू शकत होते, हाताळू शकत होते. त्यात सहभागी होऊ शकत होते. मग माझ्या आयुष्यात तू आलास. मी तुझ्या प्रेमात पडले रे! आणि माझ्या लक्षात आलं कि तुही माझ्यावर प्रेम करतोस. खूप आनंद झाला. आपले असे हक्काचे कोणी आहे याची जाणीव झाली. सुख म्हणजे नेमकं काय याची चव चाखायला मिळाली. 

पण तुझ्या तोंडून कधी माझ्यावरील प्रेमाचा उच्चार झाला नाही. माझे कान आणि मन, दोन्ही तुझ्या तोंडून ते शब्द कधी येतात याची आतुरतेने वात पाहत होते. शेवटी मलाच प्रेमाचा उच्चार करावा लागला. आणि तेंव्हाच मला कळले कि तू खरच माझ्यावर प्रेम करत आहेस. पण प्रेमाचा उच्चार का करायचा हे तुझ्या लक्षात येत नव्हते. एखाद्यावर प्रेम करत असाल तर ते तुमच्या शब्दातून व कृतीतून प्रकट करायला हवे.  अरे, अप्रकट प्रेम हे समोरच्याला संभ्रमात पाडू शकते. 

आपल्याकडे  प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द किंवा स्पर्श हेच दोन उपाय असतात. बाकी भेटी देण्यासारखे सारे उपचार, ज्यांना एकमेकांमध्ये प्रेम नाही ... फक्त स्वार्थ आहे, असे लोकदेखील अमलात आणतात. मग त्यांच्यातल्या आणि आपल्यातल्या फरकाला ठळकपणे दाखविणाऱ्या याच दोन गोष्टी आहेत.

आज मात्र मला फार वाईट वाटत आहे. काल मी सुखी नव्हते. त्यामुळे इतरांच्या सुखाला आपलं मानत होते. त्यातच समाधान मानत होते. आज मात्र मला अचानक सुख हाती लागलं आहे. आणि आता ते हरवत चालले आहे कि काय, अशी शंका मनात येऊ लागली आहे. मन त्या भयाने दाटून चालले आहे. हे गवसलेले सुख गेले तर ती वेदना पचविणे मला जमणार नाही म्हणूनच मी कोमेजून चालले आहे.

मला अशी शंका वाटते कारण _ तुझा अबोला _ मला असह्य होतो आहे. विचारलेल्या प्रश्नाचं जेव्हढ्यास तेव्हढे उत्तर देणे, आपणहून न बोलणे, न भेटणे .... साधी फोनवरून विचारपूस करायला देखील तुला सवड नाही? हे सारे मला असह्य होते आहे. याची मला सवय नव्हती. अरे तुझ्या गोड आवाजाची मला इतकी सवय लावलीस आणि आज अचानक बोलेनासा झालास. माझं काही चुकलं का? कि मी नकोशी झालेय? तू बोलल्याशिवाय मी काही समजूच शकत नाही. तू दूर जाण्याच्या कल्पनेनेदेखील माझा जीव कासावीस होतो. सारे विचारतात, "काय झालं? तू इतकी गप्प का झालीस?" मी काय सांगणार  त्यांना _! आज मी माझ्या आयुष्यात स्वतःला कोलमडताना पाहते आहे.  तुझ्याकडे आधारासाठी पाहिलं तर तू त्रयस्थासारखा वागतो आहेस. अशाने मी अधिकाधिक खचते आहे. 

तुझ्या वागण्याने मी क्षणाक्षणाला कणाकणाने खचत चालले आहे. असं कणाकणाने झिजण्यापेक्षा एखादा मोठा घाव घालून मला तोडलंस तर ते सहन करणं मला जास्त आवडेल. मला असे घाव जिव्हारी झेलण्याची सवय आहे. पण असं जीव लावून मग समोरच्याला रडविणे चांगले नाही. तुला काय हवाय ते निश्चित कर आणि ते स्पष्टपणे मला सांग. 

Hope you will understand me as always. 

तुझी,
मना

No comments: