Monday 1 July 2013

योद्धा

प्रिय मना, 

आयुष्यात अनेक छोट्या छोट्या गोष्टी घडतात. काही चांगल्या, काही वाईट _ ! माणूस नेहमी चांगल्या गोष्टी अल्प-काळ लक्षात ठेवतो. वाईट गोष्टी मात्र त्याच्या कायम स्मरणात राहतात. विशेषतः आपली प्रिय व्यक्ती आपल्या मनासारखी  वागत नसेल तर फार राग येतो. पण प्रत्यक्षात या गोष्टी खूप क्षुल्लक असतात. यांना कवटाळून जगणे शक्य नसते.

आपली प्रिय व्यक्ती हसतमुख असली कि किती बरं वाटतं. पण जर ती गंभीर झालेली दिसली कि लगेच काही serious झाले आहे असे गृहीत धरायचे नसते.  त्याही व्यक्तीला मन असते. तिची स्वतंत्र मते असतात. तिच्या मनावरही काही आघात होऊ शकतात. माझ्यासारखा एखादा वर्षानुवर्षे आघात सहन करूनही हसत राहतो. त्याचा परिणाम एखाद्या क्षणी तो गंभीर होण्यासारखा असू शकतो. वर्षानुवर्षे वाहणारी जखम असते ती _! एका दिवसात बरी होईल?

साधं बोट कापलं तर आमटी भात कालवताना बोटाला झोंबते. पण म्हणून कोणी आमटी घेणे सोडत नाही. तू म्हणशील, "चमचा वापरा". पण ज्यांची चमचा घेण्याची ऐपत नसते त्यानां हातच  वापरावा लागतो. अशा वेळी वेदना चेहऱ्यावर उमटली तर समोरच्याने मानसीक तणाव घ्यायचा का हसून धीर द्यायचा _ जखमेवर फुंकर मारायची?

वेडे, आयुष्याच्या वाटेवर चालताना अशा अनेक छोट्या मोठ्या वेदना सहन कराव्या लागतात. त्या आपल्या आपल्यालाच सहन कराव्या लागतात. समोरच्याच्या वेदना आपण घेऊ शकत नाही कि आपल्या त्याला देऊ शकत नाही. आपण समोरच्याला मलमपट्टी करायची असते. त्याच्या जखमेवर मायेची फुंकर घालायची असते. वेदना मात्र त्याची त्यालाच सहन करावी लागते. 

मला जे काही होतंय, ते का होतंय, हे प्रत्येकाला कळू शकते. खरं तर प्रत्येकाला ते माहिती असतं. त्याच्याच कृतीत ते दडलेलं असतं. पण ते नेमकं नंतर समजतं. आधी माहिती झालं तर तो ते टाळू शकतो. कमीत कमी तसा प्रयत्न तरी करू शकतो.

माझी सोबत करायची असेल तर लक्षात ठेव ... मी जे करतो त्याचे परिणाम भोगायची माझी नेहमी तयारी असते. माझं आयुष्य मला जगायचं ते योद्धा म्हणून ... माझ्यावर येणारे बाण झेलताना कितीही वेदना झाल्या तरी त्या मीच सहन करेन. पण ढाल म्हणून कोणाला समोर उभे करणे मला जमणार नाही. तुला बनायचे असेल तर माझी सारथी हो, माझे बाण माझा रथ चालवून चुकव पण ढाल बनून झेलू नकोस. माझा स्वाभिमान दुखावला जाईल.

या अशा गोष्टींना पर्याय नसतो. त्या घडणारच _ थोडा राग येणारच. आपल्या प्रिय व्यक्तीच्या वेदना आपण वाटून घेऊ शकत नाही, या अगतिकतेमुळे वाईटही वाटणार. अशा वेळी आपलं हास्य समोरच्या व्यक्तीला किती आनंददायी ठरतं याची तुला कल्पना येणार नाही. हसून पाहा _ मग कळेल. वेडे तुझं हसणं हे माझं औषध, माझं सर्वस्व आहे. जशी तू माझं  हसणं पाहून  सर्व दुःखद क्षणांना विसरतेस, नवीन क्षणांना धैर्याने सामोरी जातेस तसेच माझेही आहे. त्या हसण्याने जगण्याची उमेद, उत्साह मिळतो. मग माझ्याकरता तुला इतकं नाही जमणार?

तुझा,
शैली 

No comments: