Friday, 5 July 2013

Genius - Ketan C. Sheth - part 1



१९९० पासून मी शेअर बाजारात आहे. तीन वेगवेगळ्या नोकऱ्या झाल्या. या तीनही ठिकाणी काम करताना पुष्कळ माणसे आयुष्यात आली. चांगली-वाईट, प्रामाणिक- फसवे _ पण ज्या माणसांनी मला प्रभावित केले अशी फक्त चार माणसे.

     श्री. केतन शेठ
     श्री. अर्जन गुरुबक्षांनी
     श्री. भरत गाला
     श्री. जुझर गाबाजीवाला 

या माणसांबरोबर काम करायची संधी मिळाली आणि बरेच काही अनुभवायला मिळाले. या सर्वांची प्रभुत्व निरनिराळ्या क्षेत्रात, काम करायची शैली भिन्न _ पण हे सारे मला जिनियस वाटतात. म्हणूनच आज त्यांच्याबद्दल थोडेसे ......

श्री. केतन शेठ

मला आजही पहिली भेट आठवतेय. मी नोकरीच्या शोधत होतो. राममामाचा  मित्र, चंद्रेश गरोडिया याच्या ओळखीने शेअर मार्केटच्या अवाढव्य इमारतीत (१९९० साली इतक्या मोठ्या इमारती मोजक्याच होत्या) रूम ८०१ मध्ये जेमतेम ७ x ५ च्या ऑफिसमध्ये बसलेले केतनभाई .. चन्द्रेशकडून आलाय कळल्यावर कसलीही मुलाखत न घेता "कल से आ जाओ" इतकेच बोलून वर्तमानपत्र वाचनात मग्न झाले. तेंव्हा मला जाणवले नव्हते की आपण कोणासमोर उभे आहोत. हजारो दलालांपैकी एक इतकीच माफक प्रतिक्रिया माझी होती. 

तेंव्हा केतनभाई, अनिल मिठालाल (हे एक मिठ्ठास  व्यक्तिमत्व, इतका गोड स्वभावाचा आणि तलम हृदयाचा दलाल मी अजून तरी पहिला नाही) या शेअर दलालाची institutional division सांभाळत होते. SBI, UTI, LIC, BOI CBI अशा त्या काळातल्या सर्व मोठ्या institutes मधून सौदे होत होते. त्या institutes मध्ये सौद्याची contract notes द्यायला जायचो तेंव्हा केतनभाईकडून आलोय समजल्यावर जी वर्तणूक मिळायची ती पाहता कुणातरी मोठ्या माणसाकडे नोकरी करतोय के समजायला लागले. कधी कधी Fund Managers आणि त्यांचे वरिष्ठ आपल्या केबिनबाहेर येऊन  केतन भाईंची आवर्जून चौकशी करायचे. नंतर केतन भाईबद्दल जसे जसे इतरांकडून ऐकत गेलो तसे त्यांच्याबद्दल आदर वाढतच गेला. 

केतन भाई स्वतः research analysist होते. ते Enam Securities या शेअर मार्केटमधील एका प्रसिद्ध कंपनीच्या research wing शी जोडलेले होते. अनिल मिठालाल यांचे  clients  तर केतन भाई कोणता शेअर घेतात आणि विकतात ते सांगण्यासाठी आम्हाला पैसे द्यायला तयार होते. काही जणांनी तर मला केतन भाई Institutes ना कोणती कंपनी सुचवतात ते सांग आणि त्याबद्दल तुला काय हवे ते माग इथपर्यंत लालूच दाखवली. 

तेंव्हा मार्केटचे सौदे ring मध्ये होत. प्रत्येक दलालाच्या ऑफिसमध्ये एका speaker वर सौद्यांची commentary चालू असे. केतन भाई फोनवर बोलताना लोक चालूगिरी करत. भिंतीवरच्या speaker वरचे सौदे ऐकण्याच्या बहाण्याने ते केतन भाईच्या केबिनजवळ जात आणि केतन भाई फोनवर काय बोलतात ते ऐकायचा प्रयत्न करीत. एखाद्या कंपनीचे नाव जरी कानावर पडले तर लोक स्वतःला धन्य समजत असत. 

लोकांचे जाऊ द्या, पण केतन भाई ना मी genius का  म्हणतो याचा एक किस्सा सांगतो. आजही मला एक प्रसंग आठवतोय. मार्केट सुरु व्हायचे होते. मी त्यांच्या केबिनमध्ये त्यांच्यासमोरच बसलो होतो. केतन भाई वर्तमानपत्र वाचत बसले होते. मधले कुठले तरी पान वाचताना अचानक त्यांनी वर्तमान पत्र खाली ठेवले. घाईघाईत फोन उचलला आणि ring मध्ये सौदे करायला जाणाऱ्या माणसाला त्यांनी कोणते तरी शेअर विकायला सांगितले आणि समोर दुसरे कोणते तरी शेअर घ्यायला सांगितले. (बहुदा कोणत्या तरी रंगांच्या कंपन्या होत्या) परत वर्तमानपत्र उचलून वाचन सुरु. पाच दहा मिनिटात मार्केट सुरु झाले. मार्केट सुरु होऊन साधारण दोन तासांनी विकलेल्या शेअरचा भाव अचानक झर्रकन खाली गेला आणि घेतलेल्या शेअरचा वर जाऊ लागला. जाssssदूsssss ? 

मार्केट संपल्यावर मी त्यांना विचारले की त्यांनी ते सौदे कशावरून ओळखले. त्यांनी मला वर्तमानपत्रामधली कुठल्या तरी आतल्या पानावरची एक बातमी दाखवली. त्यात गुजरातमध्ये एका कंपनीच्या गोदामाला आग लागून माल जाळून खाक झाल्याची एक फार तर चार ओळींची बातमी होती. ही वार्ता आणि त्याचे विश्लेषण मार्केट मध्ये पसरायला दोन तासापेक्षा जास्त वेळ जावा लागला. तिथे इतकी छोटी बातमी अचूक टिपणारे आणि एका क्षणात तिचे विश्लेषण करणारे केतन भाई माझ्यासाठी कायमचे genius no.1 बनले.


क्रमशः

No comments: