Sunday 7 July 2013

गाणे : चांगले आणि वाईट - १


मी गाणे कसे ऐकतो?


अनेक जण गातात. कुणाचे गाणे लोकांना आवडते तर कुणाचे आवडत नाही. पण एखाद्याचे गाणे आवडले म्हणजे ते चांगले आणि नाही आवडले तर खराब असे असते का? चांगले आणि वाईट गाणे कशाला म्हणावे? हे कसे ठरवले जाते? असे चांगले वाईट ठरवणाऱ्या लोकांना गाण्यातले खरेच कळते का?

बहुतेक लोक स्वतःला सामान्य समजतात आणि साधारणतः एक प्रश्न विचारतात चांगले गाणे कसे ओळखायचे. कठीण प्रश्न आहे नाही? मला नाही असे वाटत. उलट उत्तर एकदम सोपे आहे. त्यासाठी भरपूर आणि विविध प्रकारचे गाणे ऐकत राहा. एखादे किंवा एखाद्याचे गाणे आवडले म्हणून परत परत तेच ऐकत राहिलात तर तुम्ही त्यातच अडकाल. तुम्हाला त्या गाण्यातले नेमके काय आवडले ते शोधा. त्यातली एखादी जागा, तान, चाल, लय, शब्द नेमके काय भावले?आणि मग ते पकडून इतर गाणी ऐका. 

सर्वसाधारण असे म्हटले जाते कि जास्तीत  जास्त वाईट ऐकलेत कि आपोआप चांगले काय ते कळू लागते. पण असे नाही. जास्तीत जास्त गाणे ऐका. चांगले वाईट ठरवू नका. ऐकता ऐकता आपोआप समजू लागते _ सामान्य काय _ चांगले काय _ वाईट काय! 

प्रथम सामान्य गायन किंवा गाणे म्हणजे काय ते समजून घ्या आणि मग गाणे ऐका. जे ऐकले ते सामान्यतः कसे असते एखाद्या माहितगाराकडून  समजून घ्या आणि जे ऐकलेत ते त्याच्याशी ताडून पहा. 

आपण सामान्य गायन याप्रकाराचे एक उदाहरण पाहू. सारी गायकी सहसा बाराखडीमधील  "अ, आ, इ, ई, उ, ओ ..." अशा स्वरांवर, उच्चारांवर आधारित आहे. वानगी दाखल आपण "आ" चा उच्चार पाहू. 

बहुसंख्य सामान्य गायक तोंड पूर्ण उघडत नाहीत. त्यामुळे "आ" चा उच्चार कित्येकदा "अ"शी (ओठ अपुरे उघडल्यास) किंवा "ऑ" शी (ओठांचा चंबू केल्यास)  मिळताजुळता होतो. परिणामी घेतलेला आलाप हा "मितवा ssssss" असा न येता "मितवअ ssssss"किंवा  "मितवॉ ssssss" असा येतो. 

काही गायक तर अनुनासिक गातात. त्यांचा "आ" चा उच्चार  हा "आं" असा होत असतो. आणि मग तान देखील जाते ती "आं sssss" या अंगानेच _!

कधी तरी ऐकायला बरे वाटले तरी "मितवा ssssss" चा आपल्यावर होणारा परिणाम हा "मितवअ ssssss" , "मितवॉ ssssss" किंवा  "मितवां ssssss" याने साधला जात नाही. मनाला काही तरी राहून गेल्याचे सतत जाणवते. चांगल्या गायकाचे वैशिष्ट्य असते कि तो शब्दांचा उच्चार समजून घेतो, स्पष्ट शब्दात गातो आणि ते लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतो.

स्पष्ट उच्चार आणि ठळकपणे  मांडलेले आकार_उकार_इकार हे चांगल्या गाण्याचे एक लक्षण आहे.

उदाहरण द्यायचे तर पंडीत कुमार गंधर्वांचे "अजुनी रुसुनी आहे"  हे गाणे ऐका. त्यातला "रुसुनी" चा उच्चार पहा. "खुलता कळी खुले ना" यात "ना" नंतरचा आलाप किंवा "पाकळी हलेना" यात "पा" नंतरचा थरथराट ऐका. गाण्यात वर सांगितलेल्या "अ, आ, इ, ई, उ, ओ" या स्वरांशी ते कसे खेळले आहेत ते अनुभवून पहा. 
किंवा 
पंडीत कुमार गंधर्वांचेच आणखीन एक "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी"  हे गाणे ऐका. या गाण्यातले "आssssssss" हे आलाप ऐका.  मग "आ" चा उच्चार कळेल आणि चांगले गाणेही आपोआप कळेल.



No comments: