Tuesday, 2 July 2013

जीहाल - ए - मिस्कीन ... मुकोन बेरंजीस

चित्रपट - गुलामी
गीतकार - गुलझार
संगीतकार - लक्ष्मीकांत प्यारेलाल
गाणे चित्रित आहे - मिथुन आणि अनिता राज

या गाण्याचा अर्थ मी अनेक वेब साईटवर पहिला पण गाण्याची अचूक शब्द रचना मला कुठेही दिसली नाही. म्हणून मी मला भावलेला अर्थ मांडत आहे. परिस्थिती अशी आहे की अनिता सारी नाती आणि गाव सोडून मिथुन बरोबर निघालीय. त्यामुळे दुःखी आहे. मिथुन खुशमिजाझ व्यक्तिमत्व .. पण तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे. सतत तिला खुश ठेवायचा प्रयत्न करतोय. तो तिच्याशी किती एकरूप झालेला आहे या त्याच्या एकतर्फी प्रेमाची कहाणी हे गाणे सांगते. गाण्याची सुरुवात पर्शिअन कवी अमीर खुस्रो याच्या ओळीने झालीय.

जीहाल - ए - मिस्कीन ... मुकोन बेरंजीस
बेहाल - ए - हीज्रा ... बेचारा दिल हैं

मी उर्दू किंवा पर्शिअन मधला जाणकार नाही. पण या भाषा समजणाऱ्या कोणी कोणी मला जे अर्थ सांगितले ते असे आहेत.

जीहाल = जहाल/ तीव्र/ खूप/ टोकाचा/ अत्यंत 
मिस्कीन = गरीब 
(याचा गाण्यातला उच्चार मिस्की किंवा मस्ती असा आहे)
मुकोन = करू नकोस
बेरंजीस = खेचाखेच/ द्वंद्व/ ओढाताण 
बेहाल = न घरका ना घाटका 
(अमीर खुस्रोच्या  मूळ गझलमध्ये "बा हाल" असा शब्द आहे. यात "बा" याचा अर्थ मराठीतल्या "चुकूनमाकून" शी मिळता जुळता आहे. "बा हाल" = चुकूनमाकून सध्याची स्थिती असा अर्थ होतो. मी इथे उच्चाराप्रमाणे शब्द घेतला कारण मला तो अर्थ भावला.)
हिज्रा - ना नर ना नारी असा मधला 
(गाण्यातला उच्चार हिज्रा असला तरी अमीर खुस्रोच्या मूळ गझलमध्ये हा शब्द "हिज्र" = विरह, वियोग या अर्थाने आला आहे. मी इथे उच्चाराप्रमाणे शब्द घेतला कारण मला तो अर्थ भावला.)

हे सारे याचे शब्दार्थ झाले. प्रश्न असा आहे हि भावार्थ काय? उर्दूमध्ये शेर बरेचदा फिरवून लिहिले जातात. मी हे उलटे फिरवून  वाचले आणि मला असे वाटले की मला अर्थ गवसला.

बेचारा दिल हैं  ... बेहाल - ए - हीज्रा ...  जीहाल - ए - मिस्कीन ... मुकोन बेरंजीस

ज्याच्यापाशी काहीही नव्हते आणि कुणीही नाही (अत्यंत गरीब) असे माझे बिचारे हृदय ...एखाद्या गरीबाकडे काहीही नसल्याने जसे त्याला कोणीही विचारात नाही तसे हे माझे हृदय होते.  ते आता माझे राहिले नाही. तुझ्या हृदयाशी पूर्णपणे एकरूप झाले आहे. आणि तुझे लक्षच नाही आहे. तू तुझ्या दुःखात असल्याने तुझ्या हे लक्षात येत नाही आहे. धड न माझे न धड तुझे अशी त्याची हिजाड्यासारखी अवस्था झाली आहे. तो जसा पूर्ण पुरुष किंवा पूर्ण स्त्री नसतो तशी या हृदयाची अवस्था झाली आहे. तुझ्याशी एकरूप झाल्याने ते माझे असून माझे राहिले नाही आणि तू पूर्ण स्वीकार न केल्याने ते तुझे असून पूर्णपणे तुझेही झालेले नाही. स्वीकार अस्वीकार याच्यामध्ये त्याची ओढाताण होतेय. त्याची अशी खेचाखेच करू नकोस. त्याचा स्वीकार कर. पुढच्या ओळींचा विचार करताच लक्षात येते की हाच अर्थ सुसंगत आहे.

सुनाई देती हैं जिसकी धडकन
तुम्हारा दिल या हमारा दिल हैं

माझे हृदय तुझ्या हृदयाशी इतके एकरूप झालेय की मला जो आवाज ऐकू येतोय तो माझ्या हृदयाचा आहे की तुझ्या तेच समजेनासे झाले आहे. पुढच्या ओळींमध्ये याची आणखीन फोड करून सांगितली आहे.

वो आ के पहलुमे ऐसे बैठे
के शाम रंगीन हो गयी हैं
जरा जरासी खिली तबियत
जरासी गमगीन हो गयी हैं

तू माझ्या शेजारी बसल्याने हि संध्याकाळ खूप रंगीबेरंगी झाली आहे. माझे हृदय खूप आनंदित झाले आहे. पण जरी माझे हृदय तुझ्या हृदयाच्या सहवासात (एकरूपतेमुळे) आनंदाने फुलून आले असले तरीही तुझे हृदय दुःखी असल्याने माझे हृदय दुःखीही आहे. त्यामुळे माझे हृदय एकाच वेळी "खिली तबियत" आणि "गमगीन" असे दोन्ही अनुभव घेत आहे.

कभी कभी शाम ऐसे ढलती
के जैसे घुंघट उतर रहा हैं
तुम्हारे सीनेसे उठता धुंआ
हमारे दिलसे गुजर रहा हैं

हे कडवे म्हणजे एक सुरेख जमलेली भट्टी आहे. यात दोन रूपके आहेत "शाम" आणि "घुंगट" ... संध्याकाळ हि प्रेमीजनांची भेटण्याची वेळ असते तर त्यानंतर येणारी रात्र ही मिलनाची (घुंगट उठण्याची) रम्य घडी असते. घुंगट के पीछे काय आहे ते तो हटेपर्यंत गुलदस्त्यात असते. तसेच तुझ्या हृदयावरचा घुंगट हलकेच दूर होऊ लागलेला आहे आणि माझ्या तुझ्याशी एकरूप झालेल्या हृदयाला त्यात दडलेली वेदना समजते आहे. तुझे हृदय दुःखाने जळत आहे आणि माझे हृदय देखील त्या जळण्यात सामील आहे. म्हणूनच त्या आगीने निर्माण झालेला धूर माझ्या हृदयातूनच येत आहे.

ये शर्म हैं या हया हैं क्या हैं
नजर उठाते ही झुक गयी हैं
तुम्हारी पलकोसे गिर के शबनम
हमारी आंखोमे रुक गयी हैं

माझ्याकडे पाहिल्यावर तुझी नजर लगेच खाली वळतेय ती कशामुळे? ही तुझी झुकलेली  नजर तुझे  गुपीत  मला  सांगते  आहे  कि  तुला  माझी  भावना  कळली  आहे. तू लाजून (शर्म) खाली पाहत आहेस की माझ्या नजरेतल्या प्रेमळ भावाने तू अवघडली (हया) आहेस? की तू  तुझी  वेदना  लपवण्यासाठी  अवघडून नजर  खाली  करते  आहेस. वेडे मी तुझ्याशी इतका समरस झालोय ही आता हा देह सुद्धा तुझ्या देहाशी एकरूप झालाय. तुझ्या वेदनेचे अश्रुबिंदू मला पहाटेच्या दवबिंदुप्रमाणे भासतात. तुझ्या नजरेशी एकरूप झालेले माझे डोळे ते अश्रू तिथेच थोपवत आहेत. मला तुझ्या नजरेत अश्रू पाहणे शक्य नाही. तुझी वेदना मी संपवू इच्छितो. माझ्या प्रेमात झोकून दे आणि आनंदित राहा.



1 comment:

Unknown said...

Hya gitache bol farach apratim ahetach pan tu khulavun sangitalela arth far sundar ahe