Tuesday 2 July 2013

डाव मांडताना

पापणीत अलगद टिपले मुक्या भावनांना
काल तुला पाहिले मी … डाव मांडताना

ओंजळीत मोती बनला तुझा अट्टहास
ना कळले प्रीत ही बनली कधी माझा श्वास
पाहिलेस का तू मजला … श्वास कोंडताना
काल तुला पाहिले मी ......

अव्हेरिले मीच मला मी कोण दिशे जावे
परत पुन्हा मागे वळणे कुणा शक्य व्हावे
कालचक्र पिळते हृदया … उलट फिरविताना
काल तुला पाहिले मी ......

काजळी बने ही वात दिवा लावताना
काळीज हे काळे पडले प्रीत चेतताना
का जळी न मीन मी झालो … दव हे सांडताना
काल तुला पाहिले मी ......                                 

ओसरली लाट कशी ही पुन्हा उसळू पाहे
गीत विरून वाऱ्यावरती मुका उगी राहे
स्वप्न पुन्हा सत्यामधले … स्वप्न लोचनांना
काल तुला पाहिले मी ...... डाव मांडताना
पापणीत अलगद टिपले मुक्या भावनांना


1 comment:

Unknown said...

Varil geet vachatana mala ekadam ek geet athavale
Tu pahile me nadichya kinari...