Friday, 10 July 2015

एका योग्याची डायरी - Faith & Reality



December 16, 2001

Faith & Reality are two base on which our life exists.

We think.

We do things based on what we think.

For every thought, we assume some reality as a base.

The reality is not our experience. It is something that is passed to us through someone else. We never check, whether the thought passed to us is true or false. We have faith on the person who passes it to us and we accept it. We call someone “Mother”, because the lady and others inform us about it. We never check whether it is true or false. This is “FAITH”. It may or may not be truth.

We think on what we know.

We think that what we know is truth.

We think that what we know as a truth does exist.

We think that our thoughts are based on the truth.

We repeat the thoughts again and again.

We do things based on our thoughts and we experience that the results of our KARMA are as per what we were informed.

Further we experience that our thoughts and experiences are as much as same to others. We think that all of us are right. Our faith increases that, the reality experienced by us does exist and it is the truth & only truth.

Truth has always a proof. The truth, which is assumed, is not the truth and is a reality. In my world, so & so lady is my mother. For me, this is reality. My thoughts about her are based on this reality. Similarly the other relationships are developed in my life, which are reality but accepted by me as truth.

The entire world is based on this kind of reality, which never exists.

Resulting, all our assumptions are wrong. Our thoughts are developed on this reality which never exists.  The thoughts are developed on wrong base. Again resulting, all thoughts are my imaginations and not the truth. We are living in the darkness of this reality.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

Someday someone enters in our life and who has a light in his hand. A clear path is visible in this light. We experience newly that that the reality is not 100% truth or not even 50% truth. We are shocked. Till the person having light in his hand is with us, we travel on right path. Our life becomes smooth.

A day arrives, light gets off. We are again in the darkness of the old reality. Now the person holding light in his hand is also lost in so-called reality as there is no more light in his hand.

When we were walking through the light, we had experienced many good things. Now we wish those things back in our life. So we start looking for a person having light in his hand. We wait for him to arrive in our life and show us path.

Most of us go to a person about whom this reality world informs us that he has light in his hand. Sometimes the person is right sometimes wrong.

Again now all above things are based on the so-called “Reality” or on the experience about the existing world, which we think or rather we assume as a truth.

The normal/ regular light existing in this world is different that of the one we experienced with that person. Both lights are part of this existing world. One is true light other is reality.

Once we experience the true light, we are suppose to search this true light.

All of us are running through the real world. But after experiencing the true light, most of us are losing the path again and again. The only way to survive is to become a true light ourselves.

Everyone has got light inside us. But all are searching the light outside.

I have seen the light. I had been a part of that light and now back to make others like me. My powers were limited comparing to those of yours. But still i reached there first, just because I studied and am studying all of you.

For this, first, you have to realise the difference in the so-called real world and the true world. 

You should know the difference in the light of this world and the true light. The knowledge is not sufficient. You have to experience this. You have to increase the range of experience and then only it will be a start of becoming light yourself.

I wish that all of you become lights and others walk in correct path through that light.

With Lots of LOVE

Sunday, 3 May 2015

वासना आणि प्रेम



वासना आणि प्रेम यात फार सूक्ष्म रेषा आहे. जगात प्रत्येक जण स्वतःच्या भावनांना उदात्त प्रेम समजत असतो. मग खरे प्रेम आणि वासना यात फरक कसा ओळखावा?

दोन्हीमध्ये एक समान धागा आहे. ती म्हणजे कोणत्या तरी गोष्टीची भूक किंवा तृष्णा ....!

वासना असेल तर तृप्ती कधीच होत नाही. मन आणि शरीर सारखे सांगत असते "आणखीन पाहिजे .... आणखीन पाहिजे". कधी एकदा आपल्या वासनेची पुर्ती होते ही घाई लागलेली असते.

प्रेमाला मात्र संयमाची जोड असते.

वासना संभ्रमित असते आणि हक्क गाजवते तर प्रेम विश्वास देते.

वासना आपल्याला स्वतःला काय हवे तेव्हढेच पाहते. प्रेम स्वतःचा विचार करत नाही. सर्वांना काय हवे याचा विचार करते.

वासना व्यसनाला जन्म देते. एकदा तृप्ती झाली तरी थोड्या वेळात लगेच पुन्हा तृष्णा लागणे हे वासनेचे लक्षण आहे. पुन्हा पुन्हा तृष्णापुर्तीची आस लागणे यालाच व्यसन म्हणतात. माणसाला कितीही मिळाले तरी पुनः पुन्हा तेच तेच हवे असते .. परत परत तो त्याचाच विचार करत असतो. एखाद्या ठिकाणी आपल्याला हवे ते आहे हे समजले कि माणसे अक्षरश तिथून ओरबाडून आपली तृष्णा पुरवायचा प्रयत्न करतात. त्यांना याचे भान नसते कि समोर वस्तू आहे, निसर्ग आहे, व्यक्ती की शक्ती... फक्त आपले शरीर आणि मन यापलीकडे विचाराची धाव जात नाही. वस्तू तुटून जात असते, व्यक्ती मोडून पडत असते, निसर्गाचा संहार होत असतो, शक्तीचा क्षय होत असतो. समोरच्याने कितीही सांगितले तरी आपण काय करतोय हे भान नसते. पण याची पर्वा न करता ती वस्तू, व्यक्ती शक्ती नष्ट होईपर्यंत शोषण करत आपली तृष्णापुर्ती करण्यात माणसे मग्न असतात.

प्रेमात माणूस इतरांना काय देऊ शकतो याचा विचार करतो. आपल्याकडे नसेल तर कुठून तरी ते इतरांना मिळावे याचा विचार करत असतो. आपल्या वाट्याला जे आणि जितके येते त्याचा आदरपूर्वक स्वीकार करून ते आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्वांना वाटून देत असतो. जो जितका वाटत जातो त्याला तितके परत मिळत जाते. कधी कधी तर इतके मिळते की वाटूनही पुन्हा झोळी भरलेलीच राहते.

प्रेमाची अत्यंत उत्कट अवस्था म्हणजे राधा  आणि मीरा ... एकीला सुरुवातीला थोडा काळ थेट सहवास मिळाला आणि त्यावर तिने उरलेले आयुष्य समाधानात काढले. दुसरीला प्रत्यक्ष सहवास किती मिळाला? मात्र तरीही ती प्रेमात बुडून राहिली. दोघींनीही कृष्णाला कधीही धमकी दिली नाही की मला तू अमुक दिले नाहीस तर मी तमुक करेन किंवा मला हे मिळाले नाही तर मी काही तरी करून घेईन. प्रेमाचा आधार असतो ... विश्वास ! तिथे धमकी नसते ... खात्री असते. जे माझे आहे ते मला आज ना उद्या मिळेल याची जाणीव असते आणि ते मिळेपर्यंत थांबायची तयारी असते.

प्रेम आणि वासना दोन्हीचा मार्ग काट्याकुट्यामधून जातो.... वेदनामय असतो.

वासना असेल तर माणूस समोरच्याकडे रडून, भीक मागून, धाक दपटशा दाखवून, भावूक होऊन, भावनात्मक धमक्या देऊन आपली मागणी रेटत राहतो. आपली वेदना हीच सर्वात श्रेष्ठ .. आणि तिच्यापुढे सर्व जग थिटे आहे हे स्वतःशीच घोकत असतो आणि समोरच्याला पटवून देत राहतो.

प्रेम मात्र माणसाला ताकद देते. कितीही वेदना झाली तरी चेहऱ्यावरचे हसू कायम असते ... मनापासून असते आणि मुख्य म्हणजे आपण काही जगावेगळे करतोय असा अविर्भाव, अभिमान यांचा लवलेशही नसतो. याचे अंतिम टोक म्हणजे आईचे प्रेम, गुरुचे प्रेम ... यात काहीही मिळवण्याची इच्छा नसते. लेकराने लाथ मारली तरी "सुखी राहा" हेच शब्द उमटतात.

आपण कसे आहोत काय वागतो आहोत हे प्रत्येकाने डोळसपणे पाहिले आणि अभ्यासले तर आपले आपल्या जोडीदारावर, मित्रावर, मैत्रिणीवर, नातेवाईकांवर प्रेम आहे की वासना हे प्रत्येकाला समजू शकेल. पण घोडे अडते ते इथेच ... डोळे उघडून माझ्या स्वतःकडे पहायची माझी तयारी आहे का?



Saturday, 11 April 2015

परी

 

बालपणीच्या ठळकपणे आठवणाऱ्या मैत्रिणी तीनच .. चित्रा, अपर्णा आणि ती ..! चित्रा, अपर्णा आणि मी शिशुवर्गापासून दहावीपर्यंत एकाच वर्गात ... चित्राची आई आमची शिक्षिका तसेच या दोघींचे लहानपणापासून घरी जाणे येणे असल्याने मैत्री होती. पण  तिची ओळख मात्र खूप नंतर झाली. तिची माझी पहिली भेट केंव्हा झाली? आठवत नाही. सातवीत असताना शिष्यवृत्ती परीक्षेच्या वर्गात बहुदा पहिल्यांदा तिला पहिले असावे. तो वर्ग आमच्याच घरी भारत असे. चित्रा, अपर्णा आणि ती .. अशा तीनच मुली त्या वर्गात होत्या. बाकी सारे मुलगे...

 

कसे ते नेमके आठवत नाही पण तिचे वडील आणि माझे वडील बऱ्यापैकी जवळचे मित्र बनले होते. दोघांनाही एक दुसऱ्याच्या पाल्याचे कौतुक होते. त्या काळात ती बरेचदा आजारी असायची. आमच्याही घरात कुणाचे न कुणाचे आजारपण चालू असायचे. Common family doctor असल्याने बरेचदा दवाखान्यात भेट व्हायची. आजारपणामुळे असेल पण ती फारशी बोललेली आठवत नाही. पण तरीही ती माझ्या स्मृतीत शिरली. मला आजही आठवतात ते तिचे एखाद्या बाहुलीसारखे गोबरे गाल .. निमुळती हनुवटी .... चेहरा भरून पाझरत राहणारा गोडवा .... नजरानजर झाल्यावर चेहऱ्यावर हलकेच फुलत जाणारे गोंडस स्मित आणि या साऱ्यावर कडी करणे डोळे ... देवापुढच्या निरांजानासारखे  ... शांत, मंद ... मला तेंव्हाही वाटे आणि आजही वाटते, जगात परी वगैरे काही असेल तर ती अगदी अशीच असेल. अभ्यासात हुशार होती आणि हो ... ती नृत्यही शिकत होती. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात तिने नृत्य केलेले मला चांगलेच आठवते. फार वर्षांनी समजले कि त्याची choreography देखील तिनेच केली होती.

 

शिष्यवृत्तीचे वर्ग संपले. शाळेत एकाच वर्गात असूनही भेटी तर फारश्या नव्हत्याच. समोरासमोर आलो तरी ओळखीच्या हास्याची देवाण घेवाण ... त्यापलीकडे फार तर "कशी/ कसा  आहेस?" अशा चौकशीपलीकडे फारसे बोलणे जायचे नाही. पण आमचे वडील कुठे न कुठे तरी भेटत आणि मग घरात तिचा उल्लेख होई. बाबा कौतुकाने तिचे नाव घेत. बाबाच्या रूपाने स्मृतीपटलावर तिचे कोंदण हे गोंदण बनून गेले. 

 

दिवस पाखरासारखे उडून गेले. शाळा संपली. मित्र परिवार विखुरला गेला. कॉलेज ही संपले आणि आता सारेच पांगले. नोकरी धंद्यात सारे कुठे कुठे पसरले काही पत्ता लागेना. वर्षे सरली आणि एक दिवस काही शाळासोबात्यांनी पुनर्भेटीचा सोहळा करायचे ठरवले. कोण कसे असेल, किती बदलले असेल .. मनात हुरहूर होती. एकेका मित्र मैत्रिणीला शोधत आणि आमंत्रणे देत फिरताना परत तिची भेट झाली. ती तशीच होती. चेहरा फक्त जरासा प्रौढ आणि प्रगल्भ .. बाकी काही फरक नाही. तसेच गोबरे गाल, तोच गोडवा, तेच गोंडस स्मित आणि ... तेच डोळे ... निरांजानासारखे ... शांत, मंद ... वाटले हिला पटकन पंख फुटतील आणि ही उडायला लागेल. मी एकदम लहान झालो आणि समोर परी उभी असल्याचा भास झाला.  

 

माणसाचा चेहरा कधी कधी फसवा असतो. पण आता गेल्या काही वर्षात पुनर्भेट सोहळे, वार्षिक सहली या निमित्ताने भेटी झाल्या आणि माझ्या लक्षात आले. हा चेहरा फसवा नाही. हे व्यक्तिमत्व दिसते तसेच आहे. एखाद्या परीसारखे ... !

 

आम्हा सर्व बाल मैत्र आणि मैत्रिणींच्या लाडक्या परीचा आज वाढदिवस_! किर्ती तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! तुझे जीवन सर्वांगाने असेच फुलत जावो. आणि तुझा गोडवा असच सर्वांमध्ये झिरपत जावो या तुला शुभेच्छा !

Sunday, 4 January 2015

कैफियत : १ जानेवारी

अतुल खरे, सुहास खरे, अरुण सिंह, अपर्णा वाघ कुलकर्णी, कीर्ती तुंगारे कुलकर्णी, किशोर मगर, यतीन देव या मित्र आणि मैत्रिणींना सस्नेह अर्पण,

परवा ३१ डिसेंबर, मी थोडी घेतली होती,  मला अजिबात चढली नव्हती. फक्त झोपेचा अंमल जरा जास्तच होता. पण तुम्ही म्हणता तर मला जास्त पण झाली असेल.

त्याचं काय झालं. १ जानेवारीला सकाळी आमचे शाळकरी मित्र मैत्रिणींचे गेट टुगेदर होते. ३१ डिसेंबरची पार्टी खूप उशिरा संपली. रात्री बिलकुल झोप न झाल्याने डोळ्यावर झापड येत होती. पण गेट टुगेदरला न जाणे बरे दिसले नसते. पहिलेच गेट टुगेदर ... आम्ही खूप वर्षांनी भेटत होतो. एक दोघे सोडले तर मला कुणाचीच नावे आणि चेहरे आठवत नव्हते. हॉलमध्ये शिरताच मी जरा डोळे ताणून पहिले. बरेच जण जमले होते. ओळखीचे कोणी दिसत नव्हते. एक कोपऱ्यातला कोच पाहून मी तिथे थोडा वेळ ताणून द्यायचे ठरवले. कोचावर जाऊन बसलो. अगदी आडवे होणे बरे दिसणार नाही म्हणून कोचाच्या मागे हात टाकून थोडा तिरपा झालो आणि डोळे मिटले.

जेमतेम काही सेकंद झाले असतील, कुणीतरी खांद्याला हात लावला. मी डोळे उघडले. समोर दोघे तिघे उभे होते ... की तिघे चौघे होते? ...  नक्की कळत नव्हते. मला अजिबात चढली नव्हती. डोळ्यावर जबरदस्त झापड येत होती.

"ए शैल्या, ओळखल का?"

काय सांगायचं? चेहरा काही नीट दिसत नव्हता. काही तरी नाव घ्यायचे आणि फजिती व्हायची. खरे बोललेले चांगले. मी मुंडी हलवली आणि थोडा अडखळत म्हणालो "खरेच ... मी ओळखले नाही.". "अगदी बरोबर ओळखलेस. मी अतुल खरेच आहे. नाव सांगून वर ओळखले नाही म्हणतोस? तुझा गमत्या स्वभाव बदलला नाही."

आयला ... मी बुचकळ्यात पडलो. काय नाव ओळखले? मी तर काहीच नाव घेतले नाही. ३१ ची जास्त झाली की काय? याला का मला?  छे छे ..असं कसं होईल. मी थोडीशीच घेतलेली. मला अजिबात चढली नव्हती. मी आपला उगाचच हसलो.

"याला ओळखला का?" बाजुच्याकडे बोट दाखवत तो म्हणाला.

मी उभा राहिलो आणि निरखून पाहण्याचा प्रयत्न केला. मला चेहरेच धुरकट दिसत होते तर मी काय सांगणार. काही बोललो आणि याने परत माझी टर खेचत म्हणाला "बरोबर ओळखलस" तर काय करणार. उगाच आपलं याला वाटेल की मला चढलीय. मी आपली मुंडी नकारात्मक हलवली.

"अरे हा सिंह."

थोडा हादरलो. सिंह ?? आजूबाजूला बघितले. नाही .., जंगल नव्हते, हॉलच होता. सिंह दोन पायांवर उभा असल्यासारखा वाटला. आयाळ पण दिसत नव्हती. 

असेल. माणसाळला असेल. नाना पाटेकरने चित्ता, वाघ पाळलेत. मी बघितलाय तो सिनेमा. तसाच असेल हा. मी जरा एक पाऊल मागे आलो. सिंहच तो शेवटी ... रिस्क नको. पण हा आमच्या गेट टुगेदर मध्ये कसा?

मी विचारले "हा काय करतोय इथे?"

तो म्हणाला, "अरे हा आयुर्वेदिक डॉक्टर आहे. लोकांना जीवन दान द्यायचे पवित्र काम करतो."

मी परत बुचकळ्यात .. सिंह शिकार करायचे सोडून जीवनदान देतोय? गडबड आहे काहीतरी!

"थांब मी आणखी एकाला घेऊन येतो. बघ ओळखतोस का."

तो गेला पण मला दोघे जाताना दिसले. एकाचे दोन दिसतात का मला? मी थोडीशीच घेतलेली. मला काही चढली नाहीय. आता सिंहाशी काय बोलायचे? त्याला मराठी कळत असेल का? तेव्हढ्यात सिंह चक्क मराठीत बोलला "कसा आहेस तू?" मी उडालोच.

"मजेत. तू कसा आहेस? तुझी डॉक्टरकी कशी चाललीय?"

"अरे मी डॉक्टर नाही. तो सिंह डॉक्टर आहे. तो गेला अतुलबरोबर. मी खरे आहे .. सु ख ."

सिंह गेलेला ऐकून बरे वाटले. असेल माणसाळलेला   ..पण आपण रिस्क कशाला घ्यायची? आणि हा काय म्हणाला?  मी खरे सुख आहे. सुख कधीपासून बोलायला लागले. गडबड आहे. मी थोडीशीच घेतलेली. मला काही चढली नाहीय.

म्हटले सुख कसे दिसते ते तरी पाहू. मी चेहरा बघायचा प्रयत्न केला. धुरकट धुरकट ... म्हटले बरोबर .. सुख असेच अस्पष्ट असते. तेव्हढ्यात कुणीतरी खांद्यावर हात ठेवला. "अरे शैलेश, मला ओळखलेस की नाही?" मी वळलो. काही दिसत नव्हते नीटसे. आता मी गप्प राहायचे ठरवले. फक्त मुंडी हलवली ... "नाही" म्हणून.

"अरे मी वाघ. आता तरी ओळख पटतेय का? खूप वर्ष झाली ना चेहऱ्यात थोडा फरक पडणारच."

मी उडायचा बाकी राहिलो. मघाशी सिंह भेटला आता वाघ ... आणि डरकाळी फोडायचे सोडून मराठीत बोलतो ... तेसुद्धा बायकी आवाजात?

विचार करा तुमच्या समोर वाघ आला आणि तुमच्या खांद्यावर पंजा ठेऊन उभा राहिला आणि म्हणाला "मी वाघ". तुम्ही काय कराल ...? मी तेच केले. मी आपला कसनुसा हसलो. हळूच खांदा वाघाच्या पंजाखालून काढून घेतला. वाघ काही तरी बोलला. मी आपला सुन्न मनाने कसनुसा हसत राहिलो. समोर साक्षात वाघ आल्यावर दुसरे काय करणार .. नाही का?

"हिला ओळखलेस का?" मी अजून विचारात की वाघाचा आवाज इतका बायकी का? आणि आता हा कोण नवीन प्राणी? मी आपले त्या प्राण्याकडे पाहायचा क्षीण प्रयत्न केला. म्हटले "वाघीण का?"

वाघ हसला आणि म्हणाला" मस्करी कसली करतोस रे? ही आपली किर्ती."

आयला आपली? आपली किर्ती कधीच नव्हती. अपकिर्तीचा जास्त ... किर्ती कधी आपल्या जवळपास सुद्धा फिरकली नाही. म्हटले की चला ... किर्ती असते तरी कशी ते पाहू. काही नीटसे दिसेना. जरा दोन पावले पुढे जाऊन चेहरा पाहायचा प्रयत्न केला तशी तिने वाकडे तोंड केले आणि नाकावर रुमाल ठेऊन मारक्या म्हशीसारखी बघत निघून गेली. मी मनात म्हटले "माझ्याशी असे फटकून वागणारी म्हणजे नक्की किर्तीच असणार." बाजूला पाहिले. वाघ पण निघून गेला होता. सुख पण गर्दीत कुठेतरी हरवले होते.

चला .. आता जरा एक डुलकी काढू. कोचावर बसून मान मागे टेकली आणि डोळे मिटले. तेव्हढ्यात मघाशी आलेला आवाज परत आला. "ए शैल्या, झोपतो काय? याला ओळखतोस का?"

"क क कोणाय?"  मी धडपडून उठलो. कसाबसा उभा राहिलो. समोर पाहिले. दोघे जण उभे होते. हलत होते सारखे. मी म्हटले, "स्थिर उभे राहा ना म्हणजे मला दिसेल नीट?"

तो म्हणाला, "ए शैल्या, तूच नीट उभा राहा आणि बघ याला."

मी डोळे ताणून बघायचा प्रयत्न केला. दिसला एकदाचा पण चेहरा मात्र धुक्यात घुसलेला. धुरकट धुरकट.

"हा कोण?"

"अरे हा मगर"

मी खल्लास ... अरे हे गेट टुगेदर आहे की प्राणी संमेलन? सिंह काय .. वाघ काय .. आणि आता मगर? आणि तो मगर की ती मगर? शाळेत असताना बहुदा "ती मगर" असे शिकवलेले ... आणि हा तो मगर? असेल मगरीचा नवरा असेल. पण मगरीला तर सतत पाणथळ जागा लागते.

मी आजूबाजूला पाहिले. हॉलच होता. कुठे पाणथळ जागा दिसली नाही. मी विचारले," हा कुठून आला?"

"टिटवाळ्याहुन ... " 

मग बरोबर ... तिथे  गणपती देवळाच्या बाजूला तलाव आहे ना. हा तिथेच रहात असणार. मी हळूच विचारले, "याने काय खाल्ले का? नाश्ता वगैरे झाला का याचा?" हो भुकेजला असेल तर उगाच रिस्क नको. मागच्या मागे सटकू .. याचा काय भरोसा?

मगर बहुदा गहिवरला. केवळ मीच त्याची अशी चौकशी केली असावी. "हो हो पोटभर नाश्ता झालाय. आता डायरेक्ट जेवण."

मी जेवणापर्यंत थांबायचं, हा बेतच रद्द केला. चला ... सटकू आत्ताच.

दुरून एक उंच काठी हलत डुलत आली. समोर येऊन उभी राहिली. लांबून काठी वाटली पण जवळ आल्यावर लक्षात आले .. एक खांब होता. खांबाला हात फुटले. आपले दोन्ही हात माझ्या हातात घेऊन खांब प्रेमळपणे म्हणाला, " कसा आहेस तू? मला ओळखलस की नाही."

खांबाला मी ओळखलेला. पण तोंडून शब्द फुटेना. मी फक्त मान होकारार्थी हलवली. पण बहुदा ती नकारार्थी हलली असावी.
"अरे आपण नेहमी एकत्र असायचो. मी देव."

मला एकदम भरून आलं. खरय ... कोण्णि नव्हता माझ्याबरोबर पण देव नेहमी होता. हा नक्कीच देव. खांबातून बाहेर आलेला नरसिंह तोच हा. मी पटकन त्याला पाया पडलो. हात जोडून उभा राहिलो. मला एकदम आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे स्मरण झाले.  खून, बलात्कार, दरोडे इत्यादी इत्यादी .... लोक माजलेत .. म्हणतात ... देव नाही आहे इथे.

मी भरलेल्या डोळ्यांनी म्हटले," अरे तुझी रोज आठवण येते रे. तू आहेस कुठे?"

तो म्हणाला," मी हल्ली दुबईला असतो. कालच आलो इथे."

मग बरोबर ... तरीच दुबईला सगळी सुबत्ता आहे. आणि इथे रावणराज चालू आहे. पण मनाला एक उभारी आली. आता देव आलाय. सगळे काही ठीक होईल.

तेव्हढ्यात तो म्हणाला, "उद्या परत जाणार."

मी रडवेला झालो आणि म्हणालो," अरे, म्हणजे आमची सुटका नाहीच का? तू आलास तर जरा सगळं ठीक करून जा ना." मला एकदम चक्कर आली आणि भडभडून आले.

पुढचे काही आठवत नाही नीटसे ... पण कुणी कुणी बोलत होते ... "त्याला जरा जास्तच झालीय."  "त्याला चढलीय."  "एक नंबरचा बेवडा आहे."

माझ्या भावना त्यांच्यासाठीच होत्या ना? त्यांच्यासाठीच माझ्या डोळ्यात पाणी आले ना? आणि तेच मला असे बोलतात? मी थोडीशीच घेतली होती,  मला अजिबात चढली नव्हती. फक्त झोपेचा अंमल जरा जास्तच होता. तुम्ही म्हणता तर मला जास्त पण झाली असेल.

पण तुम्हाला म्हणून सांगतो. यापुढे मी गेट टुगेदरला जाणार नाही. खरे सुख काय बाहेरही मिळेल. किर्ती ही भेटेल. देव तर इथे नसतोच. तिथे प्राणी येतात. जीवाला धोका. रिस्क कशाला घ्यायची? नाही का?




Friday, 26 December 2014

माझ्या आयुष्यात आलेली एक सुंदर परी .. आश्लेषा


भाग २ : राग

आश्लेषाला जेंव्हा इतरांचा राग यायचा तेंव्हा त्यांच्या तक्रारी करायची एकमेव हक्काची जागा होती .... तिचा "म्याव". मग ती तक्रार कधी तिच्या आईची असायची तर कधी तिच्या आजी आजोबांची, वडिलांची ... आणि मग ती पक्के ठरवून माझ्याकडे यायची. "मी तिच्याशी बोलनार नाई. तू पण बोलू नको."
एकदा तर काही तरी कारणाने तिला घराचे कोणीतरी ओरडले. ती सरळ आमच्या घरी आली आणि रडत रडत म्हणाली, " मी आता त्यांच्या घरी जानार नाई. ते लोक मला ओरडतात."
"अग, पण ते तुझेसुद्धा घर आहे न?"
"नाई. आता ते माझ घर नाई."
"मग तुझ घर कुठल?"
डोळे पुसत आमच्या घराकडे बोट दाखवून म्हणाली, "हे माझ घर आहे."
"अग, पण तुझा ड्याडी तर त्या घरी राहतो ना? मग तू इथे ड्याडी शिवाय राहणार का?" ती रडणे थांबवून विचारात पडली. सिद्धेशवर तिचे अतोनात प्रेम ... काय करायचे प्रश्न पडला.
परत रडवेल्या सुरात म्हणाली "तू त्याला पण इथे राहायला सांग."
"अग, पण तिथे त्याचे आई बाबा राहतात ना? मग तो त्यांना सोडून इथे कसा राहील? तुला कसा तुझा ड्याडी पाहिजे तसा तो तर त्याच्या ड्याडीबरोबर राहणार ना?" आता रडणे पूर्ण थांबले. प्रश्न काही सुटत नव्हता. विचार चालू होता. "मग ते मला ओरडले तसं तू पण त्यांना ओरड. मग मी जाईन त्यांच्याकडे."
"मी त्यांना ओरडलो आणि ते मला म्हणाले की .... "आम्हाला ओरडणार तर तू आमच्या घरी येऊ नको" ..... तर मग आपण कसे भेटणार आणि खेळणार."
आता हा मोठा लफडा झाला. रडणे पूर्ण थांबले. पण माघार कशी घ्यायची? "मग मी ड्याडी ला सांगेन त्यांना ओरडायला." प्रश्न मिटला. संध्याकाळी सिद्धेश येईपर्यंत मुक्काम आमच्या घरी _!

आमच्या वरच्या मजल्यावर तिची आत्या राहते. एकदा आश्लेषाचा आणि तिचा काही कारणावरून वाद झाला. आणि ती आश्लेषाला खोट खोट म्हणाली. " मग तू आमच्याकडे येऊ नकोस. जा तुझ्या म्यावकडे."
आश्लेषा खाली आली आणि मला पाहिल्यावर रडायला लागली. मी विचारले "काय झाले?" "निमा आत्या म्हणाली तू आमच्याकडे येऊ नको. म्यावकडे जा. मी आता त्यांच्याकडे कदीच नाई जानार."
"मग तू तिला सांगितलास का की तू तिच्याकडे कधीच जाणार नाहीस ते?"
"मी नाई सांगनार. तूच सांग तिला. मी तिच्याशी बोलनार पन नाई."
"तू बोलली नाही तर तिला कसे कळणार की तू तिच्याशी बोलत नाहीस आणि घरी पण येत नाहीस." रडणे थांबले. थोडा विचार केला आणि ती आमच्या घरातून गेली. दोन मिनिटात परत आली आणि म्हणाली, "मी सांगितलं तिला की मी तुज्याशी बोलनार नाई आनी त्यांच्या घरी पण जानार नाई."
"मग तू प्रनु दीदी आणि चैतू दीदीशी (तिच्या आते बहिणी) कशी खेळणार?" विचार करून ती म्हणाली, "मी नाई त्यांच्याशी खेलनार. मी तुज्याशी खेलनार."
"पण त्यांनी खेळायला बोलावले तर?"
ही परत वर जाऊन आली. "मी निमा आत्याला सांगितलं की प्रनु दीदी आणि चैतू दीदी नि खेलायला बोलावलं तरी मी येणार नाई." "आणि त्यांच्याकडे चिकन केले कि ते तुला खायला बोलावणार. मग तू काय करणार? मग तर तुला जावेच लागणार."
चिकन प्राणप्रिया .. पण यावेळेला अपमान जर जास्तच झोम्बालेला .. परत वरची एक फेरी झाली आणि येउन म्हणाली, " मी तिला सांगितला की चिकन खायला बोलावलं तरी मी येणार नाई." मी विचारले की "चिकन तर तुला आवडते ना? मग ते खायला का जात नाहीस?"
ती म्हणाली, " मग ती तुज्या म्याव कडे जा म्हणाली ना. मग मला नको त्यांचे चिकन. तू मला चिकन देशील?" अच्छा .. म्हणजे म्याव चे नाव भांडणात का घेतले? हा खरा मुद्दा होता.
काही दिवसांनी ती परत निमाच्या घरी जायला लागली. एक दिवस मी विचारले. "काय ग, निमा आत्याशी भांडण झालेले ना? मग तिच्या घरी आता कशी गेलीस?"
"कारण का तिने मला चिकन खायला बोलावलेलं ना?. मग ते चिकन उरणार ना? म्हणून मी खायला गेली."
"पण तू तिला सांगितलेलं ना की मी चिकन खायला बोलावलं तरी येणार नाही." थोडा विचार करून मग मला वेड्यात काढत ती म्हणाली, "अर्रे, कारण का ती त्या दिवशी बोल्ली ना की येऊ नको म्हणून. आज नाई बोल्ली ना. म्हणून मी आज गेली. त्या दिवशी कुठे गेली मी तिच्याकडे?" What a logic ???



Sunday, 30 November 2014

माझ्या आयुष्यात आलेली एक सुंदर परी .. आश्लेषा


भाग १ : लपंडाव


"ए म्याव ... मी किचनमध्ये लपनार. तू मला हॉलमध्ये आणि बेदलुममध्ये शोधायचं हां."
"ए म्याव ... आपन आओ मीना खेलू या का?"
"ए म्याव ... सांग ना ... मी पानाला कोन्ता कलर देऊ?"
"ए म्याव ... तू आमच्याकडे कधी ऱ्हायला येनार?"

आज अशी अनेक वाक्ये आठवत आहेत. भोवताली पुष्कळ प्रसंग फेर धरून नाचत आहेत आणि कानात तिचे गोड शब्द "ए म्याव ... ए म्याव ..." गुंजन करत आहेत. एकेका शब्दाचा उच्चार विचारपूर्वक, स्पष्टपणे आणि अत्यंत धीमेपणाने करत बोलण्याची तिची शैली मनात रुतून बसली आहे. माझ्यावर असलेले तिचे निर्व्याज प्रेम मला आजही संभ्रमात टाकते. कुणास ठाऊक पण कोणत्यातरी पुर्वजन्माचा ऋणानुबंध घेऊन आश्लेषा जन्माला आली इतके नक्की! 

२००७ मधली गोष्ट आहे. मी आणि हरदत्तमामा एकाच इमारतीमध्ये राहत होतो. त्याचे घर पहिल्या मजल्यावर तर आमचे तिसऱ्या .... त्याचा मुलगा, सिद्धेश आणि माझा स्नेहसंबंध हा भावापेक्षा खूप वेगळ्या पातळीवरचा आहे. आमच्यामधला जिव्हाळा, प्रेम हे शब्दातीत आहे. आश्लेषा ... सिद्धेशची मुलगी ... जन्मली तेंव्हा सिद्धेश नोकरीनिमित्त इंग्लंडमध्ये रहात होता. आश्लेषा .... तिची आई आणि आजी-आजोबा-आत्या यांच्यासह राहत होती. रोज कामावरून घरी परत येताना पहिले त्यांच्या घरी जाऊन आश्लेषासोबत थोडा वेळ घालवून मग जेवायला घरी येत असे. जेवण झाल्यावर परत खाली जाऊन तिच्याबरोबर खेळण्यात माझा वेळ कसा जाई काही कळत नसे. ती झोपली की मी घरी परतत असे. तान्हे बाळ होती ती ... तेंव्हा इतर लहान मुलांप्रमाणे गुदगुल्या करणे, डोके अंगावर घासणे असे प्रकार केले की तीसुद्धा सर्वांना प्रतिसाद देत असे. पण आमचा खेळ वेगळाच चाले. ती ज्या बेडवर असे त्याच्या कोणत्यातरी बाजूला खाली लपून मी मांजराचा आवाज करत असे आणि ती तो आवाज शोधण्याचा प्रयत्न करत असे. त्या दिशेला कुशीवर वळण्याचा प्रयत्न करत असे. आणि मी दिसलो की खुदकन हसत असे. तिला मांजरांचा आवाज करणारी बरीच खेळणी मी आणून दिली होती. ती जशी मोठी झाली तशी मग माझी ओळख "म्याव काका" अशीच झाली. आणि मग तिच्याबरोबर खेळता खेळता मी तिचा काका न राहता तिच्या वयाचा मित्र झालो आणि काका गळून नुसता "म्याव" राहिला. 

ती थोडीशी मोठी झाली तसा आमचा लपंडाव खऱ्या अर्थाने रंगू लागला. मी लपलो की ती घरभर शोधत असे आणि नाही सापडलो की अस्वस्थ होऊन मग रडवा चेहरा करून "म्याव तू कुठे आहे?" असे ओरडत फिरत असे. घरातले कुणीतरी मग तिला हळूच कानात मी लपलेली जागा सांगत असे. मग मी सापडलो की तिचे वाक्य ठरलेले असे. "म्याव असे नाही करायचे हा. तू मी सांगते तिथे लपायचे." मग माझी लपायची जागा ती सांगायची. इकडे तिकडे शोधण्याचे नाटक करून मला एकदम अचूक हुडकून काढायची आणि एकदम खुश होऊन जायची. 

तिची लपण्याची पाळी आली की आणखीन मजा यायची. ती सरळ जाहीर करायची, "ए म्याव ... मी किचनमध्ये लपनार. तू मला हॉलमध्ये आणि बेदलुममध्ये शोधायचं हां. मग मी नाही सापडली की तू मला हाक मारायची. मग मी तुला सांगेन .... मी किचन मधे आहे मग तू मला किचन मधे शोधायचं. पण मला आउट नाही करायचं हा. मग तू हरलास की मी बाहेर येणार. OK?" मग ती लपायची ठरल्याप्रमाणे सगळे पार पडायचे आणि ती जिंकायची.

कधी कधी मी थेट ती लपलेल्या जागी जाऊन तिला आउट केले की मग रुसून बसायची, " म्याव ... तू चीटिंग करतो. तू पयले मला बेदलुममधे आणि किचनमधे शोधल नाही." मग परत माझ्यावर डाव येत असे आणि तिला हाक मारत घरभर फिरावे लागत असे.

कधी कधी मी मुद्दाम हॉलमध्ये टाईम पास करायचो. मग ती किचनमधून हळूच बाहेर यायची आणि मी दिसलो की म्हणायची, "ए म्याव, मला बेदलुममधे शोध ना."

कधी मी बराच वेळ मुद्दामच तिला हाक मारत नसे. मग ती बेडरूममधून ओरडून सांगायची, "ए म्याव, मी बेदलुममधे कपटामागे लपलीय का विचार ना?" किंवा "ए म्याव, मी बेदलुममधे खिडकीत लपलीय का विचार ना?"

या साऱ्या लपंडावामधे तिचा हा असा निरागसपणा खूप उठून दिसत असे. आजही तिची निरागसता तशीच टिकून आहे. ही निरागसता हा तिचा स्थायी स्वभाव आहे.


------X------O------X------



Sunday, 2 November 2014

तुम्हे हो ना हो_ मुझ को तो _ इतना यकीन है



चित्रपट : "घरोंदा"         गाणे : तुम्हे हो ना हो, मुझ को तो इतना यकीन है
Dear Friends, या गाण्याचे पहिले कडवे ऐकताना मला जे जाणवले ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

मुझे प्या ssss र .... तुम से ....  नहीं है .... नहीं है
मगर मैंने ये राज अब तक ना जाना
के क्यों .... प्यारी लगती है, बातें तुम्हारी
मैं क्यों तुम से मिलने का ढूँढू बहाना

पहिल्या दोन ओळी आणि नंतरच्या दोन ओळी .. ऐकायला similar वाटत असल्या तरी तशा त्या नाहीत. पहिल्या दोन ओळी ज्या स्वरात आहेत त्यापेक्षा किंचित वरचा स्वर पुढच्या दोन ओळीत आहे. पहिली आणि तिसरी ओळ यातदेखील tune मध्ये सूक्ष्म फरक आहे. पहिल्या ओळीत "प्यार" शब्दातला आलाप अंगावर मोरपीस फिरवून जातो. या ओळीत नंतर तीन pause आहेत. तिसऱ्या ओळीत "के क्यो .... प्यारी लगती” असा एकच pause आहे. बाकीची ओळ मनात शिरते ती roller coaster सारखी वर खाली लाडीक आंदोलने घेतच!

"मुझे प्यार .. तुम से ..  नहीं है .. नहीं है” या ओळीत “नही है" या शब्दांचा उच्चार करताना "नही" मधल्या "ही" वर जोर देत त्याचा किंचित ठळक उच्चार करत खेचलाय आणि "है" हा मुलायमपणे सोडलाय. एखादी गोष्ट कशी आहे ते समजूनदेखील जेंव्हा ती स्वीकारायला मन नकार देते तेंव्हा ते असेच वागते नाही का?

"मगर मैंने ये राज अब तक ना जाना" ही ओळ खरे तर नंतरच्या ओळींशी संबंधित आहे. या ओळीनंतर घेतलेला किंचित pause हा ती ओळ आधीच्या "मुझे प्यार तुम से नहीं है, नहीं है" या ओळीला जोडून आल्यासारखी वाटते. आणि मनाची द्विधा अवस्था परत एकदा घट्ट होते. "मगर मैंने ___" ही ओळ अशी वर आणि खाली दोन्ही ठिकाणी जोडली गेल्यामुळे ऐकताना होणारा परिणाम एखाद्या suspense film सारखा होतो.

पहिल्या आणि तिसऱ्या ओळींच्या शेवटी येणारे "जाना" आणि "बहाना" हे शब्द रुना लैलांनी असे उच्चारलेत की ते ऐकणेबलच आहेत. "जाना" हा असा अलगद सोडलाय .. जणू हवेवर तरंगत येणारे पीस आहे आणि "बहाना" शब्द हा लाटांवर वाहात असल्यासारखा मनात तरंग उठवतो आणि आपण जणू उंचावलेल्या लाटेवर स्वार झालोत असे feeling देतो.

कभी मैंने चाहा, तुम्हे छू के देखू
कभी मैंने चाहा, तुम्हे पास लाना
मगर फिर भी
मगर फिर भी इस बात का तो यकीन है
मुझे प्यार तुम से नहीं है, नहीं है

प्रेमात भिजलेले मन जेंव्हा स्वप्न बघते तेंव्हा ते उंच आभाळात झेप घेते. पण खात्री नसलेले मन लगेच जमिनीवर उतरते. तसेच "बहाना" नंतरचे शब्द "कभी मैंने चाहा" एकदम उंच झेप घेतात आणि "तुम्हे छू के देखू" _ "कभी मैंने चाहा" _ "तुम्हे पास लाना" अशा गिरक्या घेत घेत खाली उतरतात. "मगर फिर भी" ला पूर्ण खाली पोचतात आणि मनाला परत शंकांच्या घेऱ्यात उतरवतात. शंकेला दृढता देण्यासाठी "मगर फिर भी" हेच शब्द परत किंचित वरच्या दिशेने स्वरांवर स्वार होतात आणि "मुझे प्यार तुम से नहीं है, नहीं है" या ओळीवर येऊन स्थिरावतात.

ता. क.

"मगर फिर भी इस बात का तो यकीन है" ही ओळ मी जेंव्हा जेंव्हा ऐकतो तेंव्हा तेंव्हा ही pure कविता असल्याची माझी खात्री पटते. या ओळीतला "तो" शब्द मीटरमध्ये बसवण्यासाठी संगीतकाराला बरीच कसरत करावी लागली असावी असा माझा कयास आहे. हा शब्द काढला असता तर ओळ मीटरमध्ये perfect बसली असती. पण "तो" या शब्दामुळे “यकीन” शब्दाला दृढता मिळते. त्यामुळे हा शब्द अपरिहार्य आहे असे माझे मत आहे. म्हणूनच संगीतकार जयदेव यांना सलाम!


Sunday, 26 October 2014

तुम्हे हो ना हो _ मुझ को तो _ इतना यकीन है


चित्रपट : "घरोंदा"         गाणे : तुम्हे हो ना हो, मुझ  को तो इतना यकीन है
Dear Friends, हे गाणे वाचताना आणि ऐकताना मला जे जाणवले ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

माझे मन तुझ्याकडे ओढ घेते आहे पण मला ते प्रेम आहे याची खात्री नाही. नव्हे नव्हे ... ते प्रेम नाहीच याची मला खात्री आहे. तरी ही माझ्या मनात हे असे का घडतेय? या संभ्रमित अवस्थेचे यथार्थ वर्णन गुलझारजीनी या कवितेमध्ये केले आहे. वाचल्यावर मला तरी ही सरळसोट कविता आणि फक्त कविताच वाटते आणि कविता म्हणूनच मनाला भावते. पण जयदेवजींचा स्पर्श होताच सुरेल गाणे बनून आपल्यापुढे येते.

आपण कोणाच्याही घरी जातो तेंव्हा प्रथम त्यांच्या घराची बेल वाजवतो. हे गाणे सुरु होतानाच "तुम्हे हो ना हो" या शब्दांनंतर आणि "मुझ को तो" नंतर एक मोठ्ठा pause (मोकळा अवकाश) सोडलाय आणि त्यामध्ये नेमका या "बेल" चा आवाज  टाकला आहे (नीट ऐका _ तो "डिंग डॉँग" सदृश Violin स्वर). ऐकणारा लगेच काळीज उघडून गाण्याकडे पाहू लागतो. 

गाणे सुरु होताच कवितेमधले "नही है नही है" असे थेट अर्थाचे शब्द  ..  जयदेवजींनी त्यामधे देखील किंचितसा pause सोडून  एकदम सुंदर परिणाम साधलाय. प्यार "नही है" की " है" ही अस्पष्टता, तिच्या मनातला हा संभ्रम लगेच आपल्यापर्यंत पोहोचवून जातात. नीट ऐकले की लक्षात येते   .."मुझे प्यार तुमसे नही है नही  ____ है" असे शब्द कानावर पडतात. पहिल्याच ओळीत pause नंतर येणारा "है" शब्द आलापांमध्ये असा हेलकावत येतो की "नही है" चा परिणाम पुसला जाऊन "है" चा परिणाम शिल्लक राहतो आणि आपली खात्री पटते " मुझे प्यार तुमसे है". पण ..... दुसऱ्या ओळीमध्ये pause नंतर येणारा "है" .... हा खिळ्यावर हातोडा ठोकल्यासारखा येतो आणि लगेच थांबतो. आपण पुन्हा संभ्रमात ... की  नक्की "है"? का "नही है"? 

दोन्ही ओळीत येणारा "प्यार" हा शब्द नीट ऐकला तर लक्षात येते की पहिल्या ओळीत साधा सरळ आणि सौम्य गोड असणारा "प्यार" असा उच्चार दुसऱ्या ओळीत (प्या sss र) झोपाळ्यावर वर खाली हिंदोळल्यासारखा आलाय आणि त्यामुळे लडिवाळपणे आपल्या मनाला बिलगून जातो.

गाणे खूप जुने आहे. आताच्या पिढीतील किती जणांनी ऐकले आहे? त्यांना हे बारकावे जाणवले आहेत का? किंबहुना असे बारकावे असतात याची त्यांना कल्पना आहे का? आणि असे बारकावे आपले मित्र, नातेवाईक अशा सारख्यांपर्यंत पोहोचावे असे आपल्याला वाटते का? आपण ते पोहोचवतो का?  माहिती नाही. मला हे आपल्यापर्यंत पोहोचवावे असे वाटले, मी लिहिले. सर्व गाणे बारकाव्यांसहित लिहायचे तर तुम्हाला कितपत आवडेल? आज काल वाचायला इतका वेळ आहे का कोणाकडे ? म्हणूनच मी फक्त गाण्याच्या सुरुवातीबद्दल लिहिलेय. आणि ते सुद्धा मला जाणवलेले एक दोन बारकावे _! तुम्ही या गाण्यात असेच काही बारकावे अनुभवले असतील तर जरूर लिहा.

तुम्हे हो ना हो, मुझ  को तो __ इतना यकीन है
मुझे प्यार ___ तुम से ___ नहीं है नहीं __  है



Thursday, 11 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग शेवटचा




जानेवारी १९९८ - हिमालयाचे आमंत्रण


जानेवारीचा पहिलाच आठवडा _ मी घरात दिवाणखान्यात सोफ़ावर डोळे बंद करून बसलो होतो. समोर एक धिप्पाड आकृती दिसू लागली. भगवी छाटी नेसलेला एक नाथपंथी डोळ्यांसमोर अवतीर्ण झाला. मनात शब्द उमटले "जालंदरनाथ"! भरदार देहयष्टी, दाढीमिश्यांनी भरलेला भारदस्त तेजःपुंज चेहरा _ 
गळ्यात, हातात रुद्राक्षमाळा _ शब्द उमटले "चल, आता तुझे इथे काय काम? इथले काम संपले. चल आता हिमालयात _".

माझ्या नजरेत पाणी तरळले. ज्या आमंत्रणाची वाट साधक जन्मोन्जन्म करतो, ते आमंत्रण इतक्या सहजपणे पदरात पडले? नजरेसमोर आई-बाबा आले. मी उत्तरलो, "आज मी घर सोडलं तर हे घर कोलमडून पडेल. या घरात कमावता मी एकटाच आहे. डोक्यावर कर्ज आहे. आईबाबांचं पुढच आयुष्य कस जाईल? मी मुक्त आहे, हे मी जाणतो. कारण मी कर्ता करविता नाही. 
जो कर्ता करविता आहे तोच आई बाबांची काळजी करेल आणि घेईल. पण लौकिक जगात तुमच्या मुलाचा बदलौकिक होईल. लोकांनी मला नावे ठेवली तर चालेल पण तुमच्या भक्तीची फळे माझ्या आईबाबांच्या त्रासात नसावी. अन्यथा लोकांना वाटेल, तुमची भक्ती करणाऱ्याचे आई-वडील असेच वाऱ्यावर सोडले जातात. लोकांनी भक्ती, श्रद्धा, विश्वास यांना नावं ठेवलेली मला नकोत. ते इथे वळावेत ही माझी इच्छा आहे. याउपर आपली आज्ञा असेल त्याप्रमाणे मी करेन."

डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. नाथांचा चेहरा समाधानाने हसला. माझ्या पाठीवरून डावा हात फिरवला. "तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. तथास्तु!" 
उजवा हात आशिर्वाद देण्यासाठी उचलला.

डोळे उघडले तेंव्हा अविरत अश्रू झरत होते. माझे उत्तर योग्य की अयोग्य _ काळच ठरवेल.



समाप्त


Wednesday, 10 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १८






१३ डिसेंबर  ..... 

ध्यानाला बसल्यावर ...
समोर अद्भुत प्रकाश दिसू लागला. पांढरा शुभ्र आणि सोनेरी किरण मिश्रित _ !
एक कमळ समोर अवतीर्ण झाले. ते उमलताच त्यात ब्रह्मदेव बसलेले दिसले. 
ते प्रचंड आकाराचे कमळ व त्यात बसलेले ब्रह्मदेव  काही क्षणानंतर माझ्या दिशेने येऊ लागले. 
जसजसे ते अधिकाधिक जवळ येऊ लागले, आकार लहान होत गेला. थोड्या वेळाने लक्षात आले कि त्याचा रोख माझ्या छातीच्या दिशेने होता. हलकेच ते लहान होऊन माझ्या छातीत डाव्या बाजूला शिरले व हृदयात विराजमान झाले. 

१४ डिसेंबर  ..... 

ध्यानाला बसल्यावर ...
समोर अद्भुत प्रकाश दिसू लागला. पांढरा शुभ्र, सोनेरी किरण आणि निळसर छटा _ !
त्यात दोन आकृत्या अवतीर्ण झाल्या. एक पुरुष एक स्त्री _
दुरून अस्पष्ट दिसत होत्या. पण रेखीव होत्या. 
त्या एकमेकांच्य दिशेने हलकेच सरकल्या _ तरंगत तरंगत एकमेकात मिसळल्या. आता समोर एकाच आकृती होती; अर्धा पुरुष अर्धी स्त्री  ... डावा भाग स्त्री ... उजवा भाग पुरुष _
आता परत ते वेगळे होऊ लागले. थोड्या अंतरावर जाऊन थांबले. काही क्षणानंतर परत एकत्र झाले आणि शब्द कानावर पडले "अर्धनारीनटेश्वर"! आता आकृती स्पष्ट दिसत होती, विष्णू आणि लक्ष्मी _
एकूण तीन वेळा ते दूर जाऊन पुन्हा अर्धनारीनटेश्वर या रुपात दिसले. तिसऱ्यांदा एकत्र झाल्यावर हलकेच माझ्या दिशेने येऊ लागले. लहान लहान होत माझ्या हृदयात विलीन झाले. 

 डिसेंबर  ..... 

ध्यानाला बसल्यावर ...
मी जिथे बसलो होतो त्या बैठकीच्या खाली सपाट जमीन होती. पण मला वेगळंच दिसू लागले. मला दिसले कि मी एका प्रचंड मोठ्या शिळेवर बसलो आहे. माझ्या कमरेला व्याघ्रचर्म गुंडाळलेलं  आहे. मला पाठीमागे आणखीन दोन हात आहेत. एका हातात डमरू आहे. उजवीकडे त्या शिळेत खोवून एक त्रिशूल उभा आहे. मागच्या डाव्या हातात शंख आहे. गळ्यात एक जाडजूड साप/ नाग आहे. डोक्यावर जटा बांधल्या आहेत. संपूर्ण शरीरावर भस्म लावलेलं आहे. त्याचे पट्टे आहेत. जटामधुन पाण्याची एक धार निघाल्याची जाणीव आहे. पण पाणी दिसत नाहीय. कपाळावर मधोमध तिसरा डोळा _ चारही बाजूनी उंच कातळ वरवर गेलेत.

सगळीकडे शांतता आहे. आजवर अनेक ठिकाणी शांतता अनुभवली पण कितीही शांत वातावरण असले तरी तिथे अत्यंत सूक्ष्म नाद ऐकू यायचाच. ही शांतता मात्र खऱ्या अर्थाने नीरव होती. सूक्ष्मातले सूक्ष्म, अगदी अणुवर अणु आपटल्याचादेखील नाद नाही.  वातावरण स्तब्ध _तिथे प्रकाश नाही पण तरीही काळोखही नाही. जणू काळ गोठून गेलाय _ श्वासोश्वासाचाही आवाज नाही _ श्वासही स्तब्ध _ बंद पडलाय ? की कधी चालूच झाला नव्हता? ना कसली जाणीव ना नेणीव _ शिळेवरून डावा पाय खाली सोडून _ उजवा पाय दुमडून मी ध्यानस्थ बसलेला _ पण ही अवस्था तरी अस्तित्वात आहे का इतकं सार गोठलेले _ किती काळ लोटला कुणास ठावूक _ कारण तिथे काळ नावाचं काही अस्तित्वही जाणवत नव्हत.

अचानक डमरुचा कडकडाट, तडतडाट सुरु झाला. शंखाचा नाद ऐकू आला. पुन्हा सार शांत _ मूळ स्थितीत _ आणि मग .... शब्द ऐकू आले _ ऐकू आले की सुरु झाले? ते शरीरात उत्पन्न होत होते की वातावरणात _ त्याचं उगमस्थान कुठे होत _ असं वाटत होत की सारीकडून ते शब्द उमटत आहेत. कणाकणात उमटत आहेत _ सारे कण एक बनलेत आणि  ..... ते जे काही एक आहे त्यात ते शब्द उमटत आहेत. किंबहुना ते जे काही एक आहे ते फक्त त्या शब्दांचा उमटणारा नाद आहे. 

अहं शिवं ... अहं शिवं ...अहं शिवं .... 

अनाहत उमटणारे ते शब्द फक्त अस्तित्वात आहेत. किंबहुना फक्त नाद _ 

अहंशिवंअहंशिवंअहंशिवंअहं .… 

दोन नाद _  अहं आणि शिवं _ आता एकत्र झालेत. 

शिवंअहंशिवंअहंशिवंअहंशिवं .… 

शब्द एकेमेकात विलीन होत चाललेत.

शिवोहंशिवोहंशिवोहंशिवोहं .… 

नाद बदलत चाललेत. 

सोहंसोहंसोहंसोहंसोहंसोहं ……………………………………………………………
………………………………………………… ………………………………. 





Tuesday, 9 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १७



१९९७ नोव्हेंबर

ध्यानाला बसल्यावर ……


माथ्याच्या ऊर्ध्वभागी गोल कमळ फुलले  होते. कमळाच्या मधोमध _ की मस्तकाच्या मधोमध _ तांबडा पदार्थ _ जसा एखाद्या खदखदणाऱ्या ज्वालामुखीच्या मधोमध असणारा लाव्हारस _ तो द्रव आहे की घट्ट _ की लिबलिबीत  ? तांबूस पिवळा _ त्यावर अधांतरी एक प्रकाशाचा स्तंभ _ दुधी रंगाचा _ की पांढरा सफेद _ त्या स्तंभावरून उर्ध्व दिशेने माझा प्रवास सुरु _ एकदम मधोमध  …. अचूकपणे _ स्तंभाच्या भोवताली कडी/ चक्रे _ जशी शनि ग्रहाच्या भोवती असतात.

त्या चक्रात _ की वावटळीत _ अत्यंत वेगात गोल गोल फिरणारे धुलीकण _ त्याचबरोबर अनेक माणसे व योगी _ ते पथभ्रष्ट झालेत (मनात कोणीतरी सांगतंय) _ मोहात अडकलेली माणसे _ किंवा आणखी कशात तरी अडकलेली _ माझा प्रवास मधल्या प्रकाश स्तंभामधून सुरूच _ वर पुन्हा एक वावटळ _ आणखी लोक _ त्यात अडकलेल्या माणसात ओळखीचे चेहरे _ मातुल गृहीचे, पितृगृहीचे नातेवाईक _ मोठे मोठे योगी, साधक _ ज्यांच्या नावाची सध्या जगात चर्चा अहे. यांनी तर प्रचंड साधना केलीय. तरीही इथेच? _ प्रवास सुरुच _ मधेच या वावटळीच्या गोलामध्ये एक निळी प्रकाशशलाका सुरु होते. ती दोन तीन कड्यांमधून वर जाऊन कड्यांच्या बाहेर जाते आणि संपते _ काय आहे ? _ प्रवास सुरूच _ कडबोळ्याप्रमाणे गोल असणारी ही कडी त्यात बरोबर मध्ये काहीही नाही. तिथून माझा प्रवास सुरूच _ अखेर या साऱ्या कड्यांना पार करून मी बाहेर _! 
इथे काहीच नाहीय.




Monday, 8 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १६




१९९७ - कोहं


आता ध्यानामध्ये मन अधिकाधिक एकाग्र होऊ लागले.

एक दिवस ध्यानाला बसलेला असताना समोर अक्कलकोट येथील स्वामींचे मंदिर दिसू लागले. निर्गुण पादुका जेथे आहेत ते अक्कलकोट येथील स्थान .... त्या स्थानाच्या डाव्या बाजूला असलेल्या जाळीच्या दरवाजापाशी मी उभा होतो. माझ्या समोरच्या जाळीच्या दरवाजामागे बायका, मुले आणि त्यांच्यामागे इतर लोकांची गर्दी होती. साधारण आरती झाल्यानंतरचे वातावरण होते. मी आणि माझ्यामागाचे (जे मला दिसत नव्हते पण जाणवत होते) तसेच समोरचे .. असे आम्ही सारे जण जाळीचे दरवाजे उघडण्याची वाट पहात होतो. माझ्या बाजूने असलेल्यांमध्ये मी रांगेत पहिला होतो. विचार करत होतो _ दरवाजा उघडला की जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे.

समोरचा दरवाजा उघडला. मनात म्हटले की "आता त्या बायका स्वामींचे दर्शन घेऊन माझ्या उजव्या बाजूच्या दरवाजाने बाहेर पडणार". त्या बायका आत आल्या, पण निर्गुण पादुकांकडे  न जाता माझ्या दिशेने आल्या. निर्गुण पादुकांच्या जागी काहीच नव्हते. ती जागा रिकामी होती. त्या बायका समोर येउन माझ्या पायावर डोके ठेऊन नमस्कार करून बाहेर पडू लागल्या. मला समाजत नव्हते की काय चालले आहे. मी मागे वळून पाहीले. माझ्यापाठीमागे अत्यंत तेजस्वी अशा संन्याशांची रांग उभी होती. ते सारे उजवा हात आशीर्वादपर उभा करून शांत उभे होते. तुळतुळीत गोटा_ भगवी छाटी/ कफनी _ दिव्य तेज _ माझे माझ्या हाताकडे लक्ष गेले. तोही आशीर्वाद देण्यासाठी उभा होता _ अगदी त्या संन्याशांप्रमाणेच _! कोण आहेत हे ? आणि त्याहीपेक्षा महत्वाचे की  ..... कोण आहे मी? कोहं ... कोहं ...कोहं ....कोहं ...




Sunday, 7 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १५




१९९७ - नाथसंप्रदाय



आता ध्यानाला बसल्यावर मला मी धुनीजवळ किंवा शेकोटीजवळ बसून चिमटा वाजवताना दिसू लागलो.

अंगावर कधी भगवी तर कधी काळी पायघोळ कफनी असे तर कधी रुद्राक्षांच्या माळा आणि नाथपंथी कफनी .... धुनीजवळ बसून कधी चिंतन करीत असे .... कधी ध्यानात मग्न झालेला असे .... तर कधी काही नामःस्मरण चाललेले असे.

मी एकटा कधीच नसे. त्या धुनिभोवती माझ्यासारखेच काही जण बसलेले असत. आमची एकाच प्रकारची साधना चाललेली असे. कधी गम्य तर कधी अगम्य भाषेत ते काही सांगत असत. आपण काय करतोय आणि ते कसे करावे हे मनात, शरीरात भरवले जात असे. 

कधी कधी समोरची व्यक्ती दिसताच मनात त्यांची नावे उमटत. ठळक आठवणारी नावे आणि शरीरयष्टी दोनच ... श्री मच्छीन्द्रनाथ आणि श्री जालन्दरनाथ ! तिसरी व्यक्ती बहुदा गोरक्षनाथ किंवा कानिफनाथ .. नक्की आठवत नाही. पण या व्यक्ती एकापेक्षा जास्त वेळा दिसल्या.

आता ध्यानामध्ये मन अधिकाधिक एकाग्र होऊ लागले.



Saturday, 6 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १४


१९९७ - नामःस्मरण


याच काळात मी श्री तीर्थक्षेत्र पावस येथे पोचलो. परमहंस श्री स्वामी स्वरुपानंदांचे निवासस्थान _ स्वामी ज्या खाटेवर झोपत त्यासमोर बसलो होतो. स्वामी स्वरूपानंद हे नामःस्मरणाचे अंतिम टोक _ असा योगी होणे नाही. त्यांना विनंती केली की नामःस्मरणाबाबत काही शिकवावे. काही नवीन ज्ञान माझ्या पदरात टाकावे.

त्या काळापर्यंत नामःस्मरणाचे अनेक अद्भुत अनुभव गुरुकृपेने प्राप्त झाले होते. अंगावरची कातडी नाममय झालेली _ रक्तप्रवाहातून रक्ताऐवजी नाम वाहात आहे _ शरीराचा कण अन कण नाममय झालेला _ यासारखे नाना अनुभव घेतले होते. एक प्रकारचा अहंकार झाला होता _ नामाचे सारे प्रकार आत्मसात केले असल्याचा _ ! जिभेच्या टोकापासून सुरु होऊन मेंदूपर्यंत तसेच जिभेच्या टोकापासून हृदयापर्यंत, बेम्बीपर्यंत किंवा शरीराच्या खालच्या टोकापर्यंत त्याची तार कशी काम करते हे गुरुमाउलीने दाखवले होते. यापेक्षा आणखी काही शिल्लक असेल असे वाटत नव्हते. त्याबाबत किंचितही शंका मनात नव्हती. पण त्या दिवशीचा अनुभव आगळा-वेगळा होता.

मी प्रार्थना करताना डोळे मिटलेले होते. प्रार्थना संपताक्षणी जाणवले की ........ मी नाकातून जो श्वास घेतो आहे तो श्वास नसून नाम आहे. बाहेरच्या हवेतील नाम नाकातून आत शिरत होते व तसेच नाकातून बाहेर पडत होते. हवा नामाचा आकार धारण करून आत बाहेर करत होती. मी श्वास घेत नसून नाम घेत आहे याची जाणीव होत होती. हलके हलके लक्षात आले की हे कसे व कधी शक्य होते.

त्यादिवशी "मला नामःस्मरण कळते" या अहंकाराची शकले उडाली. किंबहुना "मला काही कळते" या अहंकाराची शकले उडाली.





Friday, 5 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १३




१९९७ - वारकरी संप्रदाय


आता मला हाती  चिपळ्या धरल्याचा भास होऊ लागला.

सदेह वैकुण्ठागमन  केलेले तुकाराम महाराज _ यांनी भजनाची गोडी लावली.ईश्वराचे नामःस्मरण करताना किती तल्लीनता यायला हवी, हे त्यांनी शिकवले. एक दिवस नामःस्मरण करताना संपूर्ण शरीरावर नामःस्मरणाचा थर पसरल्याचे जाणवले. नंतर सारे शरीरच नामःस्मरणाने व्यापून गेले. मनात शब्द उमटले _

तुका उघडोनी डोळे पाही पाही |
पांघरले हरिनाम देही देही ||

टाळ चिपळ्या अन मृदुंग सोबती |
वाजवती सारे गण सभोवती ||

तुका म्हणे आज परब्रह्म झालो |
नाचे ब्रह्मानंदी आनंदात न्हालो ||

गाढवाला गंगेचे पाणी पाजणारे, कुत्र्यापाठी तुपाची वाटी घेऊन धावणारे संत एकनाथ .... मुंगीत देखील विठ्ठलाचे रूप पाहून पायाखाली मुंगीसुद्धा चिरडू नये म्हणून प्रत्येक पाऊल जपून टाकणारा संत रोहिदास .... तर याच्या नेमके उलट .... विठ्ठल नामात भान विसरून तल्लीन झालेले संत गोरा कुंभार .... जी भाजी पिकवतो, खातो त्यातही विठ्ठल कसा शोधावा हे सांगणारे संत चोखामेळा _ ईश्वराचे गुणगान करत फिरणारे संत नामदेव महाराज _ अशी किती तरी संत मंडळी त्यांच्या भक्तीच्या पद्धती शिकवून गेली. 


आता ध्यानाला बसल्यावर मला मी धुनीजवळ किंवा शेकोटीजवळ बसून चिमटा वाजवताना दिसू लागलो.