Saturday, 11 April 2015

परी

 

बालपणीच्या ठळकपणे आठवणाऱ्या मैत्रिणी तीनच .. चित्रा, अपर्णा आणि ती ..! चित्रा, अपर्णा आणि मी शिशुवर्गापासून दहावीपर्यंत एकाच वर्गात ... चित्राची आई आमची शिक्षिका तसेच या दोघींचे लहानपणापासून घरी जाणे येणे असल्याने मैत्री होती. पण  तिची ओळख मात्र खूप नंतर झाली. तिची माझी पहिली भेट केंव्हा झाली? आठवत नाही. सातवीत असताना शिष्यवृत्ती परीक्षेच्या वर्गात बहुदा पहिल्यांदा तिला पहिले असावे. तो वर्ग आमच्याच घरी भारत असे. चित्रा, अपर्णा आणि ती .. अशा तीनच मुली त्या वर्गात होत्या. बाकी सारे मुलगे...

 

कसे ते नेमके आठवत नाही पण तिचे वडील आणि माझे वडील बऱ्यापैकी जवळचे मित्र बनले होते. दोघांनाही एक दुसऱ्याच्या पाल्याचे कौतुक होते. त्या काळात ती बरेचदा आजारी असायची. आमच्याही घरात कुणाचे न कुणाचे आजारपण चालू असायचे. Common family doctor असल्याने बरेचदा दवाखान्यात भेट व्हायची. आजारपणामुळे असेल पण ती फारशी बोललेली आठवत नाही. पण तरीही ती माझ्या स्मृतीत शिरली. मला आजही आठवतात ते तिचे एखाद्या बाहुलीसारखे गोबरे गाल .. निमुळती हनुवटी .... चेहरा भरून पाझरत राहणारा गोडवा .... नजरानजर झाल्यावर चेहऱ्यावर हलकेच फुलत जाणारे गोंडस स्मित आणि या साऱ्यावर कडी करणे डोळे ... देवापुढच्या निरांजानासारखे  ... शांत, मंद ... मला तेंव्हाही वाटे आणि आजही वाटते, जगात परी वगैरे काही असेल तर ती अगदी अशीच असेल. अभ्यासात हुशार होती आणि हो ... ती नृत्यही शिकत होती. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात तिने नृत्य केलेले मला चांगलेच आठवते. फार वर्षांनी समजले कि त्याची choreography देखील तिनेच केली होती.

 

शिष्यवृत्तीचे वर्ग संपले. शाळेत एकाच वर्गात असूनही भेटी तर फारश्या नव्हत्याच. समोरासमोर आलो तरी ओळखीच्या हास्याची देवाण घेवाण ... त्यापलीकडे फार तर "कशी/ कसा  आहेस?" अशा चौकशीपलीकडे फारसे बोलणे जायचे नाही. पण आमचे वडील कुठे न कुठे तरी भेटत आणि मग घरात तिचा उल्लेख होई. बाबा कौतुकाने तिचे नाव घेत. बाबाच्या रूपाने स्मृतीपटलावर तिचे कोंदण हे गोंदण बनून गेले. 

 

दिवस पाखरासारखे उडून गेले. शाळा संपली. मित्र परिवार विखुरला गेला. कॉलेज ही संपले आणि आता सारेच पांगले. नोकरी धंद्यात सारे कुठे कुठे पसरले काही पत्ता लागेना. वर्षे सरली आणि एक दिवस काही शाळासोबात्यांनी पुनर्भेटीचा सोहळा करायचे ठरवले. कोण कसे असेल, किती बदलले असेल .. मनात हुरहूर होती. एकेका मित्र मैत्रिणीला शोधत आणि आमंत्रणे देत फिरताना परत तिची भेट झाली. ती तशीच होती. चेहरा फक्त जरासा प्रौढ आणि प्रगल्भ .. बाकी काही फरक नाही. तसेच गोबरे गाल, तोच गोडवा, तेच गोंडस स्मित आणि ... तेच डोळे ... निरांजानासारखे ... शांत, मंद ... वाटले हिला पटकन पंख फुटतील आणि ही उडायला लागेल. मी एकदम लहान झालो आणि समोर परी उभी असल्याचा भास झाला.  

 

माणसाचा चेहरा कधी कधी फसवा असतो. पण आता गेल्या काही वर्षात पुनर्भेट सोहळे, वार्षिक सहली या निमित्ताने भेटी झाल्या आणि माझ्या लक्षात आले. हा चेहरा फसवा नाही. हे व्यक्तिमत्व दिसते तसेच आहे. एखाद्या परीसारखे ... !

 

आम्हा सर्व बाल मैत्र आणि मैत्रिणींच्या लाडक्या परीचा आज वाढदिवस_! किर्ती तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! तुझे जीवन सर्वांगाने असेच फुलत जावो. आणि तुझा गोडवा असच सर्वांमध्ये झिरपत जावो या तुला शुभेच्छा !

No comments: