Thursday, 11 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग शेवटचा




जानेवारी १९९८ - हिमालयाचे आमंत्रण


जानेवारीचा पहिलाच आठवडा _ मी घरात दिवाणखान्यात सोफ़ावर डोळे बंद करून बसलो होतो. समोर एक धिप्पाड आकृती दिसू लागली. भगवी छाटी नेसलेला एक नाथपंथी डोळ्यांसमोर अवतीर्ण झाला. मनात शब्द उमटले "जालंदरनाथ"! भरदार देहयष्टी, दाढीमिश्यांनी भरलेला भारदस्त तेजःपुंज चेहरा _ 
गळ्यात, हातात रुद्राक्षमाळा _ शब्द उमटले "चल, आता तुझे इथे काय काम? इथले काम संपले. चल आता हिमालयात _".

माझ्या नजरेत पाणी तरळले. ज्या आमंत्रणाची वाट साधक जन्मोन्जन्म करतो, ते आमंत्रण इतक्या सहजपणे पदरात पडले? नजरेसमोर आई-बाबा आले. मी उत्तरलो, "आज मी घर सोडलं तर हे घर कोलमडून पडेल. या घरात कमावता मी एकटाच आहे. डोक्यावर कर्ज आहे. आईबाबांचं पुढच आयुष्य कस जाईल? मी मुक्त आहे, हे मी जाणतो. कारण मी कर्ता करविता नाही. 
जो कर्ता करविता आहे तोच आई बाबांची काळजी करेल आणि घेईल. पण लौकिक जगात तुमच्या मुलाचा बदलौकिक होईल. लोकांनी मला नावे ठेवली तर चालेल पण तुमच्या भक्तीची फळे माझ्या आईबाबांच्या त्रासात नसावी. अन्यथा लोकांना वाटेल, तुमची भक्ती करणाऱ्याचे आई-वडील असेच वाऱ्यावर सोडले जातात. लोकांनी भक्ती, श्रद्धा, विश्वास यांना नावं ठेवलेली मला नकोत. ते इथे वळावेत ही माझी इच्छा आहे. याउपर आपली आज्ञा असेल त्याप्रमाणे मी करेन."

डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. नाथांचा चेहरा समाधानाने हसला. माझ्या पाठीवरून डावा हात फिरवला. "तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. तथास्तु!" 
उजवा हात आशिर्वाद देण्यासाठी उचलला.

डोळे उघडले तेंव्हा अविरत अश्रू झरत होते. माझे उत्तर योग्य की अयोग्य _ काळच ठरवेल.



समाप्त


Wednesday, 10 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १८






१३ डिसेंबर  ..... 

ध्यानाला बसल्यावर ...
समोर अद्भुत प्रकाश दिसू लागला. पांढरा शुभ्र आणि सोनेरी किरण मिश्रित _ !
एक कमळ समोर अवतीर्ण झाले. ते उमलताच त्यात ब्रह्मदेव बसलेले दिसले. 
ते प्रचंड आकाराचे कमळ व त्यात बसलेले ब्रह्मदेव  काही क्षणानंतर माझ्या दिशेने येऊ लागले. 
जसजसे ते अधिकाधिक जवळ येऊ लागले, आकार लहान होत गेला. थोड्या वेळाने लक्षात आले कि त्याचा रोख माझ्या छातीच्या दिशेने होता. हलकेच ते लहान होऊन माझ्या छातीत डाव्या बाजूला शिरले व हृदयात विराजमान झाले. 

१४ डिसेंबर  ..... 

ध्यानाला बसल्यावर ...
समोर अद्भुत प्रकाश दिसू लागला. पांढरा शुभ्र, सोनेरी किरण आणि निळसर छटा _ !
त्यात दोन आकृत्या अवतीर्ण झाल्या. एक पुरुष एक स्त्री _
दुरून अस्पष्ट दिसत होत्या. पण रेखीव होत्या. 
त्या एकमेकांच्य दिशेने हलकेच सरकल्या _ तरंगत तरंगत एकमेकात मिसळल्या. आता समोर एकाच आकृती होती; अर्धा पुरुष अर्धी स्त्री  ... डावा भाग स्त्री ... उजवा भाग पुरुष _
आता परत ते वेगळे होऊ लागले. थोड्या अंतरावर जाऊन थांबले. काही क्षणानंतर परत एकत्र झाले आणि शब्द कानावर पडले "अर्धनारीनटेश्वर"! आता आकृती स्पष्ट दिसत होती, विष्णू आणि लक्ष्मी _
एकूण तीन वेळा ते दूर जाऊन पुन्हा अर्धनारीनटेश्वर या रुपात दिसले. तिसऱ्यांदा एकत्र झाल्यावर हलकेच माझ्या दिशेने येऊ लागले. लहान लहान होत माझ्या हृदयात विलीन झाले. 

 डिसेंबर  ..... 

ध्यानाला बसल्यावर ...
मी जिथे बसलो होतो त्या बैठकीच्या खाली सपाट जमीन होती. पण मला वेगळंच दिसू लागले. मला दिसले कि मी एका प्रचंड मोठ्या शिळेवर बसलो आहे. माझ्या कमरेला व्याघ्रचर्म गुंडाळलेलं  आहे. मला पाठीमागे आणखीन दोन हात आहेत. एका हातात डमरू आहे. उजवीकडे त्या शिळेत खोवून एक त्रिशूल उभा आहे. मागच्या डाव्या हातात शंख आहे. गळ्यात एक जाडजूड साप/ नाग आहे. डोक्यावर जटा बांधल्या आहेत. संपूर्ण शरीरावर भस्म लावलेलं आहे. त्याचे पट्टे आहेत. जटामधुन पाण्याची एक धार निघाल्याची जाणीव आहे. पण पाणी दिसत नाहीय. कपाळावर मधोमध तिसरा डोळा _ चारही बाजूनी उंच कातळ वरवर गेलेत.

सगळीकडे शांतता आहे. आजवर अनेक ठिकाणी शांतता अनुभवली पण कितीही शांत वातावरण असले तरी तिथे अत्यंत सूक्ष्म नाद ऐकू यायचाच. ही शांतता मात्र खऱ्या अर्थाने नीरव होती. सूक्ष्मातले सूक्ष्म, अगदी अणुवर अणु आपटल्याचादेखील नाद नाही.  वातावरण स्तब्ध _तिथे प्रकाश नाही पण तरीही काळोखही नाही. जणू काळ गोठून गेलाय _ श्वासोश्वासाचाही आवाज नाही _ श्वासही स्तब्ध _ बंद पडलाय ? की कधी चालूच झाला नव्हता? ना कसली जाणीव ना नेणीव _ शिळेवरून डावा पाय खाली सोडून _ उजवा पाय दुमडून मी ध्यानस्थ बसलेला _ पण ही अवस्था तरी अस्तित्वात आहे का इतकं सार गोठलेले _ किती काळ लोटला कुणास ठावूक _ कारण तिथे काळ नावाचं काही अस्तित्वही जाणवत नव्हत.

अचानक डमरुचा कडकडाट, तडतडाट सुरु झाला. शंखाचा नाद ऐकू आला. पुन्हा सार शांत _ मूळ स्थितीत _ आणि मग .... शब्द ऐकू आले _ ऐकू आले की सुरु झाले? ते शरीरात उत्पन्न होत होते की वातावरणात _ त्याचं उगमस्थान कुठे होत _ असं वाटत होत की सारीकडून ते शब्द उमटत आहेत. कणाकणात उमटत आहेत _ सारे कण एक बनलेत आणि  ..... ते जे काही एक आहे त्यात ते शब्द उमटत आहेत. किंबहुना ते जे काही एक आहे ते फक्त त्या शब्दांचा उमटणारा नाद आहे. 

अहं शिवं ... अहं शिवं ...अहं शिवं .... 

अनाहत उमटणारे ते शब्द फक्त अस्तित्वात आहेत. किंबहुना फक्त नाद _ 

अहंशिवंअहंशिवंअहंशिवंअहं .… 

दोन नाद _  अहं आणि शिवं _ आता एकत्र झालेत. 

शिवंअहंशिवंअहंशिवंअहंशिवं .… 

शब्द एकेमेकात विलीन होत चाललेत.

शिवोहंशिवोहंशिवोहंशिवोहं .… 

नाद बदलत चाललेत. 

सोहंसोहंसोहंसोहंसोहंसोहं ……………………………………………………………
………………………………………………… ………………………………. 





Tuesday, 9 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १७



१९९७ नोव्हेंबर

ध्यानाला बसल्यावर ……


माथ्याच्या ऊर्ध्वभागी गोल कमळ फुलले  होते. कमळाच्या मधोमध _ की मस्तकाच्या मधोमध _ तांबडा पदार्थ _ जसा एखाद्या खदखदणाऱ्या ज्वालामुखीच्या मधोमध असणारा लाव्हारस _ तो द्रव आहे की घट्ट _ की लिबलिबीत  ? तांबूस पिवळा _ त्यावर अधांतरी एक प्रकाशाचा स्तंभ _ दुधी रंगाचा _ की पांढरा सफेद _ त्या स्तंभावरून उर्ध्व दिशेने माझा प्रवास सुरु _ एकदम मधोमध  …. अचूकपणे _ स्तंभाच्या भोवताली कडी/ चक्रे _ जशी शनि ग्रहाच्या भोवती असतात.

त्या चक्रात _ की वावटळीत _ अत्यंत वेगात गोल गोल फिरणारे धुलीकण _ त्याचबरोबर अनेक माणसे व योगी _ ते पथभ्रष्ट झालेत (मनात कोणीतरी सांगतंय) _ मोहात अडकलेली माणसे _ किंवा आणखी कशात तरी अडकलेली _ माझा प्रवास मधल्या प्रकाश स्तंभामधून सुरूच _ वर पुन्हा एक वावटळ _ आणखी लोक _ त्यात अडकलेल्या माणसात ओळखीचे चेहरे _ मातुल गृहीचे, पितृगृहीचे नातेवाईक _ मोठे मोठे योगी, साधक _ ज्यांच्या नावाची सध्या जगात चर्चा अहे. यांनी तर प्रचंड साधना केलीय. तरीही इथेच? _ प्रवास सुरुच _ मधेच या वावटळीच्या गोलामध्ये एक निळी प्रकाशशलाका सुरु होते. ती दोन तीन कड्यांमधून वर जाऊन कड्यांच्या बाहेर जाते आणि संपते _ काय आहे ? _ प्रवास सुरूच _ कडबोळ्याप्रमाणे गोल असणारी ही कडी त्यात बरोबर मध्ये काहीही नाही. तिथून माझा प्रवास सुरूच _ अखेर या साऱ्या कड्यांना पार करून मी बाहेर _! 
इथे काहीच नाहीय.




Monday, 8 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १६




१९९७ - कोहं


आता ध्यानामध्ये मन अधिकाधिक एकाग्र होऊ लागले.

एक दिवस ध्यानाला बसलेला असताना समोर अक्कलकोट येथील स्वामींचे मंदिर दिसू लागले. निर्गुण पादुका जेथे आहेत ते अक्कलकोट येथील स्थान .... त्या स्थानाच्या डाव्या बाजूला असलेल्या जाळीच्या दरवाजापाशी मी उभा होतो. माझ्या समोरच्या जाळीच्या दरवाजामागे बायका, मुले आणि त्यांच्यामागे इतर लोकांची गर्दी होती. साधारण आरती झाल्यानंतरचे वातावरण होते. मी आणि माझ्यामागाचे (जे मला दिसत नव्हते पण जाणवत होते) तसेच समोरचे .. असे आम्ही सारे जण जाळीचे दरवाजे उघडण्याची वाट पहात होतो. माझ्या बाजूने असलेल्यांमध्ये मी रांगेत पहिला होतो. विचार करत होतो _ दरवाजा उघडला की जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे.

समोरचा दरवाजा उघडला. मनात म्हटले की "आता त्या बायका स्वामींचे दर्शन घेऊन माझ्या उजव्या बाजूच्या दरवाजाने बाहेर पडणार". त्या बायका आत आल्या, पण निर्गुण पादुकांकडे  न जाता माझ्या दिशेने आल्या. निर्गुण पादुकांच्या जागी काहीच नव्हते. ती जागा रिकामी होती. त्या बायका समोर येउन माझ्या पायावर डोके ठेऊन नमस्कार करून बाहेर पडू लागल्या. मला समाजत नव्हते की काय चालले आहे. मी मागे वळून पाहीले. माझ्यापाठीमागे अत्यंत तेजस्वी अशा संन्याशांची रांग उभी होती. ते सारे उजवा हात आशीर्वादपर उभा करून शांत उभे होते. तुळतुळीत गोटा_ भगवी छाटी/ कफनी _ दिव्य तेज _ माझे माझ्या हाताकडे लक्ष गेले. तोही आशीर्वाद देण्यासाठी उभा होता _ अगदी त्या संन्याशांप्रमाणेच _! कोण आहेत हे ? आणि त्याहीपेक्षा महत्वाचे की  ..... कोण आहे मी? कोहं ... कोहं ...कोहं ....कोहं ...




Sunday, 7 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १५




१९९७ - नाथसंप्रदाय



आता ध्यानाला बसल्यावर मला मी धुनीजवळ किंवा शेकोटीजवळ बसून चिमटा वाजवताना दिसू लागलो.

अंगावर कधी भगवी तर कधी काळी पायघोळ कफनी असे तर कधी रुद्राक्षांच्या माळा आणि नाथपंथी कफनी .... धुनीजवळ बसून कधी चिंतन करीत असे .... कधी ध्यानात मग्न झालेला असे .... तर कधी काही नामःस्मरण चाललेले असे.

मी एकटा कधीच नसे. त्या धुनिभोवती माझ्यासारखेच काही जण बसलेले असत. आमची एकाच प्रकारची साधना चाललेली असे. कधी गम्य तर कधी अगम्य भाषेत ते काही सांगत असत. आपण काय करतोय आणि ते कसे करावे हे मनात, शरीरात भरवले जात असे. 

कधी कधी समोरची व्यक्ती दिसताच मनात त्यांची नावे उमटत. ठळक आठवणारी नावे आणि शरीरयष्टी दोनच ... श्री मच्छीन्द्रनाथ आणि श्री जालन्दरनाथ ! तिसरी व्यक्ती बहुदा गोरक्षनाथ किंवा कानिफनाथ .. नक्की आठवत नाही. पण या व्यक्ती एकापेक्षा जास्त वेळा दिसल्या.

आता ध्यानामध्ये मन अधिकाधिक एकाग्र होऊ लागले.



Saturday, 6 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १४


१९९७ - नामःस्मरण


याच काळात मी श्री तीर्थक्षेत्र पावस येथे पोचलो. परमहंस श्री स्वामी स्वरुपानंदांचे निवासस्थान _ स्वामी ज्या खाटेवर झोपत त्यासमोर बसलो होतो. स्वामी स्वरूपानंद हे नामःस्मरणाचे अंतिम टोक _ असा योगी होणे नाही. त्यांना विनंती केली की नामःस्मरणाबाबत काही शिकवावे. काही नवीन ज्ञान माझ्या पदरात टाकावे.

त्या काळापर्यंत नामःस्मरणाचे अनेक अद्भुत अनुभव गुरुकृपेने प्राप्त झाले होते. अंगावरची कातडी नाममय झालेली _ रक्तप्रवाहातून रक्ताऐवजी नाम वाहात आहे _ शरीराचा कण अन कण नाममय झालेला _ यासारखे नाना अनुभव घेतले होते. एक प्रकारचा अहंकार झाला होता _ नामाचे सारे प्रकार आत्मसात केले असल्याचा _ ! जिभेच्या टोकापासून सुरु होऊन मेंदूपर्यंत तसेच जिभेच्या टोकापासून हृदयापर्यंत, बेम्बीपर्यंत किंवा शरीराच्या खालच्या टोकापर्यंत त्याची तार कशी काम करते हे गुरुमाउलीने दाखवले होते. यापेक्षा आणखी काही शिल्लक असेल असे वाटत नव्हते. त्याबाबत किंचितही शंका मनात नव्हती. पण त्या दिवशीचा अनुभव आगळा-वेगळा होता.

मी प्रार्थना करताना डोळे मिटलेले होते. प्रार्थना संपताक्षणी जाणवले की ........ मी नाकातून जो श्वास घेतो आहे तो श्वास नसून नाम आहे. बाहेरच्या हवेतील नाम नाकातून आत शिरत होते व तसेच नाकातून बाहेर पडत होते. हवा नामाचा आकार धारण करून आत बाहेर करत होती. मी श्वास घेत नसून नाम घेत आहे याची जाणीव होत होती. हलके हलके लक्षात आले की हे कसे व कधी शक्य होते.

त्यादिवशी "मला नामःस्मरण कळते" या अहंकाराची शकले उडाली. किंबहुना "मला काही कळते" या अहंकाराची शकले उडाली.





Friday, 5 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १३




१९९७ - वारकरी संप्रदाय


आता मला हाती  चिपळ्या धरल्याचा भास होऊ लागला.

सदेह वैकुण्ठागमन  केलेले तुकाराम महाराज _ यांनी भजनाची गोडी लावली.ईश्वराचे नामःस्मरण करताना किती तल्लीनता यायला हवी, हे त्यांनी शिकवले. एक दिवस नामःस्मरण करताना संपूर्ण शरीरावर नामःस्मरणाचा थर पसरल्याचे जाणवले. नंतर सारे शरीरच नामःस्मरणाने व्यापून गेले. मनात शब्द उमटले _

तुका उघडोनी डोळे पाही पाही |
पांघरले हरिनाम देही देही ||

टाळ चिपळ्या अन मृदुंग सोबती |
वाजवती सारे गण सभोवती ||

तुका म्हणे आज परब्रह्म झालो |
नाचे ब्रह्मानंदी आनंदात न्हालो ||

गाढवाला गंगेचे पाणी पाजणारे, कुत्र्यापाठी तुपाची वाटी घेऊन धावणारे संत एकनाथ .... मुंगीत देखील विठ्ठलाचे रूप पाहून पायाखाली मुंगीसुद्धा चिरडू नये म्हणून प्रत्येक पाऊल जपून टाकणारा संत रोहिदास .... तर याच्या नेमके उलट .... विठ्ठल नामात भान विसरून तल्लीन झालेले संत गोरा कुंभार .... जी भाजी पिकवतो, खातो त्यातही विठ्ठल कसा शोधावा हे सांगणारे संत चोखामेळा _ ईश्वराचे गुणगान करत फिरणारे संत नामदेव महाराज _ अशी किती तरी संत मंडळी त्यांच्या भक्तीच्या पद्धती शिकवून गेली. 


आता ध्यानाला बसल्यावर मला मी धुनीजवळ किंवा शेकोटीजवळ बसून चिमटा वाजवताना दिसू लागलो. 







Thursday, 4 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १२




१९९६ - गजानन महाराज आणि गाडगेबाबा

परमहंसांनी देवीच्या मातृत्वाला हात घालण्याची, हाक मारण्याची, साद घालण्याची शिकवण दिली. तिला अभिप्रेत असलेली पुत्राची हाक कशी मारावी ते शिकवले म्हणूनच तिचे हे दर्शन होऊ शकले.

नंतर  काही काळ कोणीतरी कानात जोरात ओरडायचे "गण गण गणात बोते" _ काही दिवस हे सतत चालू राहीले. अगदी कानठळ्या बसतील अशा गगनभेदी आवाजात हा जप कानात आणि मनात चालू असायचा. पण तो आवाज कधीही असह्य झाला नाही. उलट सारे आयुष्य सुसह्य झाले. त्या काळात मी सर्वांशी नेहमीप्रमाणे बोलत असलो तरी मनात चक्क "मले .. तुले .. मी नाई बा ... " अशा स्वरूपाची तुटक वाक्ये चालू असायची. त्यामुळे इतरांशी बोलताना शब्द जपून वापरावे लागायचे. कधी कधी चुकून याच भाषेत शब्द तोंडातून निसटून जायचे आणि लोक एखाद्या वेड्याकडे  पाहावे तसे माझ्याकडे पहायचे.

साधारण याच काळात संत गाडगेबाबा यांच्याही शिकवणीचा लाभ झाला. कधीही न ऐकलेली खानदेशी - वऱ्हाडी अशी कुठली तरी भाषा कानात ऐकू यायची _ मनात उमटायची. मग लोकांशी बोलताना तसेच बोलावेसे वाटायचे. बोलण्यावर खूप नियंत्रण ठेवावं लागे. मग बोलणच कमी केलं. बऱ्याच जणांना मी शिष्ट व स्वतःला शहाणा समजणारा वाटलो असेन. पण खरं कारण कसं सांगणार?

आता मला हाती  चिपळ्या धरल्याचा भास होऊ लागला.