Saturday 12 April 2014

"तनी माझ्या झिंगु लागे ..."



काल, बऱ्याच दिवसांनी ती भेटली .... पहिलाच प्रश्न .... "अरे आहेस कुठे तू? किती दिवस झाले.... तुझी कविता वाचायला मिळाली नाही. काय लिहिलयस नवीन?"

"काय ग .. या कविता तुम्ही वाचून विसरून जाता. फार तर कधी तरी FB वर एखादा लाईक मारता. कशाला लिहायचं मी? आणि लिहिलं तरी कशाला पब्लिश करायचं?"

"अरे तुला माहिती नसेल .. पण तुझ्या कविता नं ... खरच छान असतात. मला आवडतात. आयुष्य एकदम छान आहे रे .. पण तरीही कधी कधी आयुष्यात एकदम पोकळी झाल्यासारखी वाटते. सारे काही छान असूनही काही तरी कमी आहे अस वाटत. तुझी कविता वाचली की खूप छान वाटत. मन एकदम हलक होऊन जात. मनावरच मळभ एकदम हटून जात. सांग नं .. काय लिहिलयस नवीन?" 

काय सांगणार? डोंबल माझं .. काहीच सुचतं नाहीय गेले काही दिवस .. असं का होतंय? काही कळत नाहीय.

"नाही ग ... काही नवीन सुचलं नाहीय.... मनाला भिडणारा असा काही विषय नाही."

"काय फ़ेकतोयस .... अरे केव्हढे विषय आहेत. जरा आजूबाजूला बघ."  

खरच! असं काय झालाय मला .... काही सुचतंच नाहीय. किती दिवस झाले. मन कशात गुंतलंय? 

काम? ... ते तर नेहमीचाच आहे. पूर्वीही होत.
मोकळा वेळ? .... मिळतोय की. 
आजूबाजूला लक्ष? .... आहे की. 
मग? ... काय करतोय मी हल्ली? 

अरे हो! गेले काही दिवस ते "तनी माझ्या झिंगु लागे ..." मनात पिंगा घालतंय. पहिले  कविता  सुचली. नंतर गाण्याची चाल सुचली आणि ती पिच्छाच सोडत नाहीय. गेले काही महिने मी हेच गाणे सतत गातोय. त्याच्या संगीताचे सूर मनात फेर धरून नाचतायत. एखादी चांगली गायिका .. तिच्याकडून हे गाणे करून घ्यायचे ... सतत हाच विचार .... मग दुसरे काही सुचणार कसे?  मी या माझ्याच कवितेच्या की गाण्याच्या प्रेमात पडलोय. कोणताही कलाकार जेंव्हा त्यानेच निर्माण केलेल्या कलाकृतीच्या प्रेमात पडतो तेंव्हा नवनिर्मिती थांबते. ऐकलं होत .... आता पटतंय.

आता हे गाणे कधी पिच्छा सोडेल तेंव्हाच काही तरी नवीन सुचेल.  





एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग ९



१९९५ - स्वामी विवेकानंद

आता मी ध्यान एकाग्र करून बसू लागलो. चित्त आपोआप  एकाग्र होऊ लागले. भोवतीचे माउलींचे आवरण विरळ होत गेले. काही दिवसांनी नवे आवरण जाणवू लागले.

बसण्याची पद्धत सहजपणे  बदलत गेली. मी  वेगवेगळ्या मुद्रांमध्ये बसत होतो. प्रत्येक बसण्याच्या पद्धतीचे वेगवेगळे अनुभव येत होते. त्याचे फायदे आणि तोटे कोणीतरी मला सांगत होते. कानात काही ऐकू येत नव्हते. पण थेट मनात शब्द उमटत होते.

एखाद्या योग्याने कसे संयत असावे? योगांचे प्रकार कोणते? कोणत्या योग्याने कोणती साधना करावी? ध्यान कसे लावावे? कोणत्या पद्धतीचे कसे फायदे होतात आणि कोणते तोटे होतात? हे सारे कोणीतरी सांगत होते. मनात आपोआप सांगणाऱ्याचे नाव उमटत होते .... "स्वामी विवेकानंद"! मला जे उमजत होते ते बरेचदा प्रचलित गोष्टींपेक्षा खूप वेगळे होते.

त्यांनी सांगितले की "जगातले बहुतांश ज्ञान नष्ट झाले आहे. आज जे सांगितले जाते ते लोकांनी आपल्या स्वार्थापोटी मूळ ज्ञानाची केलेली भ्रष्ट नक्कल आहे. माझ्यापाशी असलेले ज्ञान हे अल्पस्वल्प आहे. त्याच्या कित्येक पटीने पसरलेला ज्ञानाचा महासागर अजून बाकी आहे."

काही दिवसात मला मी ध्यानाला बसलेला असताना चर्चमध्ये बसलेला आहे असे जाणवू लागले. 


Friday 11 April 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग ८



१९९५ - श्री ज्ञानेश्वर महाराज

ज्ञानेश्वरी वाचत होतो. मनात आपोपाप अर्थ उमटत होता. ज्ञानेश्वरी लिहिताना त्यांना काय नेमके सांगायचे होते ते आपोआप मनाला उमजत होते. तसेच आज विशिष्ठ ओवीचा ... कोणत्याही संदर्भात संबंध जोडून सांगितला जाणारा अर्थ ... हा कसा चुकीचा आहे आणि त्यामुळे मार्ग कसा चुकतो हे समजत होते. साधी सोपी सरळ ज्ञानेश्वरी ... तिचा गूढ अर्थ शोधण्यात वेळ घालवून लोकांनी गहन करून टाकली.

निसर्गाचे काही नियम आहेत. कोणता नियम कोठे लागू पडतो, कोणती गोष्ट कोणत्या ठिकाणी वापरावी याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

ज्ञानेश्वरी वाचून झाली आणि पसायदान सुरु झाले. सावकाश वाचताना त्याचा ओळीमागून ओळ ... अर्थ ध्यानात येऊ लागला. सुंदर अनुभव होता. त्या काळात भोवताली एक आवरण अनुभवत होतो. मन एकदम मऊ झाले होते. जणू दुधात भिजले होते. जणू माउली माझ्याकडून ज्ञानेश्वरी जगवून घेत होती.

एक दिवस ... नेहमीप्रमाणे कामावरून उशीरा परत येताना ... लोकलच्या दरवाजात उभा होतो. आकाशाकडे पहात.  गाडी बऱ्यापैकी रिकामी होती. गाडीने मुंब्रा स्टेशन सोडले. दुरवर डोंगरांची रांग घसरली होती. हिरवीगार झाडी पसरलेली पाहत होतो. एका मग्न क्षणी ... मला सारे जग परमेश्वराने व्यापलेले दिसू लागले. प्रत्येक वस्तू .. अगदी अणु रेणू त्याने कसा व्यापला आहे ते उमजू लागले. मनात .. कि कानात .... कोणीतरी बोलले ....

व्यापीले अवघे जीवाणू |
तैसे व्यापीयले अणु रेणू |
कवणे सांगावे कवणु |

आता मी ध्यानाला बसू लागलो. चित्त आपोआप   एकाग्र होऊ लागले. भोवतीचे माउलींचे आवरण विरळ होत गेले. काही दिवसांनी नवे आवरण जाणवू लागले.


Monday 7 April 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग ७

१९९५

नशिबाने म्हणा वा पूर्वपुण्याईने .... आयुष्यात अध्यात्मिक मार्गातली एक अधिकारी व्यक्ती आली. तिच्या पाठीमागे देवीची साडेतीन शक्तिपीठे उभी आहेत असे म्हटले जात असे. माझ्या हातून त्या व्यक्तीची काही थोडी फार सेवा घडली. मनात त्याबदल्यात काही अपेक्षा नव्हती.

असेच एकदा आम्ही सारे जेवायला बसले असताना त्या व्यक्तीने मला विचारले, "मला तुला काही तरी द्यायचे आहे. बोल तुला काय हवे - छत्री की छत्र?"

मी उत्तरलो, "मला यातले काही काळात नाही. मी जे केले ते काही मिळावे या अपेक्षेने नाही. त्यामुळे मी काही मागू शकत नाही आणि मागू इच्छित नाही."

त्या व्यक्तीने तिथे उपस्थित असलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीशी बोलून मला सांगितले, " जा .. तुला छत्र दिले."

त्या दिवसापासून मला माझ्याभोवती सतत एक आवरण जाणवत असते. मी जे काही करतो ते करण्यासाठी मला कोणी तरी सांगत असते. मला असे जाणवते की मी काही करत नाही. जे होते ते आपोआप होते.

________________________________________________________________


एक दिवस त्या व्यक्तीने मला सांगितले, " तुला खूप प्रश्न पडतात ना? जा ... तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील."

त्या दिवसानंतर मला कोणताही प्रश्न पडला की त्याचे उत्तर त्याच प्रश्नाच्या हातात हात घेऊन येते. प्रश्न हा प्रश्न राहातच नाही. इतरांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबाबत किंवा त्यांना पडणारे प्रश्नदेखील मी माझे म्हणून स्वीकारले की त्याची उत्तरे किंवा विश्लेषण लगेच समोर उभे राहते.



Sunday 6 April 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग ६



१९९४ .... जून

सर्व सोडून देऊ इच्छित होतो. देवघरासमोर बसलेला असताना तळमळीने ईश्वराला प्रार्थना केली, " कधी काळी मी जी पुण्यकर्मे केली असतील .. या जन्मात किंवा पूर्वजन्मात .. त्या सर्वांचे फळ मी आईला दान करू इच्छितो. आज ... आत्ता ... या क्षणी ... ते सर्व पुण्य आईला मिळावे जेणेकरून तिची या जीवन मृत्युच्या चक्रातून सुटका होईल. तिच्या सुटकेसाठीचे पुण्य तिला मिळाल्यावर जर काही शिल्लक असेल तर ते सर्व माझ्या वडिलांना मिळावे. आज, आत्ता, या क्षणी मी या पुण्यावर पाणी सोडून देत आहे."

तत्क्षणी माझ्या शरीरातून काही बाहेर पडल्याची जाणीव झाली. शरीर रिकामे झाल्याची जाणीव झाली. दुसऱ्याच क्षणी आत खोलवर कुठे तरी वीज चमकावी तसे झाले. शरीराला एक झोरदार झटका बसला आणि जे कमी झाले त्याच्या दुप्पट शक्ती भरल्याची जाणीव झाली.

जुलै १९९४ मध्ये पुन्हा अशीच प्रार्थना केल्यावर परत असाच अनुभव आला.

निस्वार्थी प्रार्थना केल्यास ती झटक्यात पूर्ण  होते. फळाची अपेक्षा ठेवली नाही किंबहुना मिळणाऱ्या फळाची जाणीवही नसेल तर त्या कर्माचे खूप मोठ्या प्रमाणावर फळ मिळते.

या निस्वार्थी प्रार्थना होत्या. परत काही मिळेल याची अपेक्षा किंवा शक्ती वाढणार याची जाणीव नव्हती. म्हणून पूर्ण झाल्या .... शक्ती वाढली. आता प्रार्थना केली तर शक्ती वाढते याची जाणीव आहे. मग निस्वार्थी दान होईल का? शक्ती अशी वाढणार नाही.

मी प्रार्थना थांबवली.




Wednesday 2 April 2014

एका योग्याची डायरी - भाग ५

|| श्री स्वामी समर्थ ||

आता आरती, भजन यांचा विचार करू.

भजन आणि आरती हे दोन्ही मुख्यतः सामुहीक स्वरूपात केले जाणारे साधनाप्रकार आहेत. या दोन्ही प्रकारांमध्ये साथीला टाळ, चिपळ्या, पेटी (Harmonium) आणि तबला/ मृदंग/ ढोलक अशी वाद्ये असतात. मात्र हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत.

भजन हे देवाला आळवण्यासाठी केले जाते. त्यात बरेचदा कधी स्पष्ट तर कधी अस्पष्ट स्वरुपात मागणे मागितलेले असते. तर कधी कधी परिस्थितीवरचे भाष्य असते. साधारणतः अभंग हा प्रकार यात प्रामुख्याने दिसून येतो. अभंगांव्यतिरिक्त ओव्या आणि भारुडासारखी देवावर रचलेली गीतेदेखील भजनातच समाविष्ट करता येतात. हा देवासमोर बसून सादर करायचा अविष्कार आहे.

आरती ही देवाची स्तुती आणि कौतुक असते किंवा त्याने जे जे केले त्याबद्दल त्याचे आभार स्वरूपी वर्णन असते. त्यात सहसा देवाचे श्रेष्ठत्व किंवा त्याची महानता वर्णन केलेली असते. यात देवाचे शारीरिक किंवा अध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन असते. कधी कधी कौटुंबिक वर्णनही यात असते. उदाहरणार्थ - पार्वतीच्या आरतीमध्ये गणपती, कार्तिकेय, महादेव यांची नावे समाविष्ट असणे.

या दोन्ही साधनांमध्ये सामुहीक नाद हा अत्यंत महत्वाचा असतो. व्यवस्थित निर्माण झालेला नाद निसर्गातील Positive कणांना समूहाकडे खेचून घेतो. उदाहरण द्यायचे झाले तर आपण एकेकटे एखाद्या छोट्याशा चुंबकासारखे असतो. प्रत्येकाचे वैयक्तिक बल / बळ हे १० एकक असेल तर २५ जणांचे एकत्रित बळ २५० एकक बनते. हे एकत्रित बळ जास्त वेगाने आणि दूरवरचे कण आकर्षित करू शकते.
मात्र कधी कधी असे नाद हे नाद न राहता उन्माद बनतात. ज्याला उन्माद होतो त्याला आपण कोणी देवस्वरूप झाल्याचा भास होतो. ज्यांना असा उन्माद होत नाही त्यांना ही व्यक्ती काही विशेष आहे असे वाटू लागते. आणि ..... आरती बाजूला राहून व्यक्तिस्तोम वाढू लागते.

या दोन्ही प्रकारांमध्ये एक कमतरता असते. तुम्ही आरती आणि भजन केलेत की जोपर्यंत त्या समूहाबरोबर असता, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या शरीरात आणि आजूबाजूच्या वातावरणात Positive Energy जाणवते. मात्र तुम्ही तिथून घरी गेलात की ही Energy झपाट्याने कमी झालेली आढळते. भजन किंवा आरतीच्या ठिकाणी उत्पन्न वा जमा झालेली Energy तुम्ही वैयक्तिक स्वरुपात किती शोषून घेऊ शकता (सोप्या शब्दात – शरीरात किंवा मनात भरून घेऊ शकता) यावर त्या भजन किंवा आरतीचा तुमच्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो. बरेचदा आरती खूप छान झाली असे वाटते पण जीवन फारसे बदलत नाही. मग भजन किंवा आरती यांना महत्व नाही का? .... महत्व आहे .... भजन किंवा आरती हे वैयाक्तिक साधनेला उभारणी देण्याचे काम करतात. याला English मध्ये Boosting किंवा Charging असे म्हणता येईल.

श्री. सिद्धेश धुमे यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे गेल्या चार भागात थोडेसे विषयांतर होऊन मूळ विषय बाजूला पडला. खरे तर हे विषय खूप विस्तीर्ण आहेत आणि त्यांच्या विस्तारात प्रत्येकाला रस असेलच असे नाही. अगदी मोजक्या शब्दांमध्ये आणि थोडक्यात आपण हे विषय Cover करण्याचा प्रयत्न केला. ज्यांना विस्तारपूर्वक Discussion करायचे आहे किंवा काही मते पटली नाहीत, ते कधीही ब्लॉगवर किंवा FB वर लिहू शकतात. मलाही माझे ज्ञान वृद्धिंगत करण्यास आवडेल.

जे विषयांतर झाले ते चांगल्यासाठीच असे मी मानतो. त्या योग्याचे काही अनुभव हे आत्तापर्यंत सादर केलेल्या लिखाणाला पुष्टी देणारे ठरतील असा माझा विश्वास आहे. आपल्यासमोर काही तरी GREAT किंवा भव्य दिव्य असे ठेवण्यासाठी हे अनुभव नाहीत. तसेच कुणाचा बडेजाव मांडण्यासाठीही नाहीत. जर कुणी अभ्यासू स्वतःच्या अनुभवाविषयी शंकीत झाला असेल किंवा विश्लेषण करू इच्छित असेल तर त्याला तुलना / विश्लेषण करणे सोपे जावे म्हणून हे लिहिले आहे हे कृपया लक्षात घ्यावे.


Let us start the diary of his Experience.

Tuesday 1 April 2014

एका योग्याची डायरी - भाग ४

|| श्री स्वामी समर्थ ||


जे योगी, संत, स्वामी असे थोर सत्पुरुष इतिहासात होऊन गेले त्यांना एक व्यक्ती मानता मी शक्ती मानतो. जर शक्ती नष्ट होत नाही तर ते योगी नाहीसे झालेले नाहीत. ती शक्ती ते विशिष्ट शारीरिक रूप सोडून दुसऱ्या कुठल्या तरी शक्तीत रुपांतरीत (converted) झालेली आहे. ती याच वातावरणात अस्तित्वात आहे. आपण जर शोध घेतल्यावर ती शक्ती आपल्याला सापडू शकते.

आता याचा शोध कसा घ्यायचा ?

जसे साधक या शक्तीचा शोध घेतात तसेच या शक्ती देखील साधकांचा शोध घेत असतात. साधना जेंव्हा विशिष्ट पातळीवर पोहोचते तेंव्हा अशा शक्ती पोआप त्या साधकाशी संपर्क साधतात.  "जेंव्हा योग्य शिष्य तयार होतो तेंव्हा त्याला गुरु आपणहून प्राप्त होतो” हा गुरु शिष्य संबंधातील एक निसर्गनियम आहे.

जी साधना आपण सहजपणे करू शकतो ती आपल्याला केंव्हाही अनुकूल ठरते आणि म्हणूनच तीच साधना सुरु ठेवावी. ध्यान, धारणा हे काहीसे कठीण विषय आहेत. इथे मार्गदर्शनाची गरज भासते. चूक झाल्यास विपरीत परिणाम घडू शकतात. पण आरती, जप, भजन, नामःस्मरण यासारख्या सोप्या मार्गावर प्राथमिक अवस्थेत असताना थेट मार्गदर्शनाची गरज नसते. कोणताही चांगला शिक्षक (साधक नव्हे) आपल्याला यात मार्गदर्शन करू शकतो.

आपण प्रथम नामःस्मरण पाहू. यात कशी प्रगती किंवा अधोगती होते ते अभ्यासायचा प्रयत्न करू.
Energy never get destroyed. It can be converted from one source to another. The form is changed but energy always exists.

मग आजवर ज्यांनी नामस्मरण केले ते सारे या वातावरणातच असायला हवे. ते नष्ट होऊ शकत नाही. पण विखुरलेल्या स्वरूपात आहे. वातावरणात या कणांचे समुदाय अस्तित्वात असतात. जसे काही विशिष्ट देवळात गेले कि आपल्याला खूप मंगल, प्रसन्न वाटते. तर्कही विशिष्ट ठिकाणी आपल्याला अस्वस्थ वाटते. तिथे थांबवत नाही.

हे कण Positive (मंगल) आणि Negative (अमंगल) असे दोन्ही प्रकारचे असतात. माणसांच्या आचार आणि विचारांवर त्याच्याकडे आकर्षीत होणाऱ्या कणांचा प्रकार अवलंबून असतो. साधक जेंव्हा साधना करतो तेंव्हा हेच विखुरलेले कण (नामाचेज्ञानाचे) त्याच्याभोवती जमा होतात. या कणांचा समुदाय जसा जसा वाढू लागतो तसा तसा त्याच्या भोवतीच्या वातावरणात फरक पडू लागतोचांगल्या विचाराने प्रेरित लोकांभोवती Positive कण जमा होतात आणि कुविचाराने प्रेरित लोकांभोवती Negative.  सर्वसाधारण माणसे कोणत्या ना कोणत्या प्रभावाखाली दोन्ही प्रकारचे विचार करत असतात. त्यांच्या भोवतीचे वातावरण अशा दोन्ही प्रकारच्या कणांनी भारलेले असते.

योग्य प्रकारे साधना केल्यावर अंतर्शक्ती जागृत होते. मात्र त्या शक्तीला आपण ज्या आचार विचारांची जोड देऊ, तसे तिचे रूप असते. माणसांचे आचार विचार Constructive असतील तर Positive  कण जमा होत जातात. मात्र आचार विचार Destructive असतील तर Negative कणदेखील जमा होतात. जसे चुंबकाकडे लोखंडाचा कीस आकर्षीत होतो तसे हे कण साधकाकडे आकर्षीत होतात.


आता आरती, भजन यांचा विचार करू.