Sunday 30 March 2014

एका योग्याची डायरी - भाग ३

|| श्री स्वामी समर्थ ||

आपण मागे पहिले की “आरती, जप, भजन, नामःस्मरण, ध्यान, धारणा अशी अनेक साधने आहेत. जे तुमच्या प्रकृतीशी जुळेल असे कोणतेही एक साधन निवडा.”

आता कोणते साधन माझ्या प्रकृतीशी जुळेल, याचा शोध कसा घ्यायचा?

यासाठी मी माझ्या प्रकृतीचा अभ्यास केला पाहिजे. मला सर्वप्रथम"मी" समजला पाहिजे. कोहम? या जगात सर्वांना सारे समजत असते. कोण कसा कुठे चुकतो हे सांगायला प्रत्येक जण तत्पर असतो. पण तरीही त्याचे स्वतःचे आयुष्य आनंदमय, समाधानी आणि शांत नसते. आलेल्या प्रत्येक भोगाला दोन उत्तरे आलटून पालटून सांगितली जातात.

. मी बरोबर केले होते. पण अमक्या तमक्यामुळे हे माझे चांगले होत नाही.
. मी इतके सगळे चांगले करतो तरीही माझे काही काही वाईट सतत होत असते. माझे नशीब दुसरे काय?

पण माझे काही चुकत असेल असा विचार कोणीच करत नाही. जो हा विचार आणि अभ्यास करतो त्याला निश्चित साधन शोधणे सोपे जाते. ज्याला हा अभ्यास करायचा नसतो तो कोणी तरी गुरु शोधत जातो आणि कुणाचे तरी पाय पकडून तो सांगेल ते करत राहतो.

साधनेच्या एखाद्या पातळीवर पोचलेला कोणीही गुरु होऊ शकतो का? तो आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करू शकतो का? याचे उत्तर त्याने आपल्याला कोणती साधना करायला सांगितली आणि त्या साधनेचा मला काय अनुभव आला यात शोधावे लागेल.

एखाद्या विशिष्ट साधनेवर प्रभुत्व असलेला फक्त त्या विशिष्ट साधनेचेच मार्गदर्शन करू शकतो. कारण त्याने फक्त त्या साधनेचाच अभ्यास केलेला असतो. सर्वांना तो तेच करायला सांगतो. ती साधना ज्यांच्या प्रकृतीशी जुळते त्यांना चांगले अनुभव येतात. बाकीचे आयुष्यभर वाट पाहत राहतात. आणि शेवटी नशिबाला दोष देतात. उदाहरणार्थ  : जसे एखादा रसायनशास्त्राचा पदवीधर असेल तर तो भौतिकशास्त्राचा मुलभूत (basic) अभ्यास सांगू शकेल, पण भौतिकशास्त्राचा पदवी अभ्यासक्रम शिकवू शकणार नाही. तो सर्वांना सांगेल की रसायनशास्त्र घेऊन पदवी मिळेल. परिणामी ज्यांना रसायनशास्त्र अनुकूल नसेल, समजण्यास जड असेल ते सतत नापास होत जातील.

मग खरोखर गुरु या पदाला कसे ओळखावे?

जो सतत एकच प्रकारचे शिक्षण सरसकट सर्वांना देतो तो विशिष्ट पातळीवर पोहोचलेला साधक असतो. गुरु नव्हे तर शिक्षक असतो. शिक्षक फार तर सर्व साधनांची तोंड ओळख करून देऊ शकतो. गुरूला नेहमी माहिती असते की त्याचे स्वतःचे प्रभुत्व कशात आहे आणि तो शिष्याला ते शिक्षण अनुकूल आहे की नाही हे तो जाणत असतो. जर ते अनुकूल नसेल तर शिष्याला जिथे अनुकूल शिक्षण मिळेल अशा गुरूकडे पाठवतो.

आपल्याकडे सरसकट आणखीन एक शब्द वापरला जातो "सतगुरु किंवा सदगुरू" ! ज्याला सर्व साधनांविषयी खोलवर माहिती असते आणि त्याबाबत तो मार्गदर्शन करू शकतो त्यालाच सदगुरू म्हणावे. सर्वोच्च पातळीवर असतात ते योगी, संत, स्वामी! यांचे प्रभुत्व वादातीत असते. यांच्या शक्ती अमर्याद असतात आणि ते मुक्त हस्ते त्याची उधळण करत असतात. शरीर हे यांच्यासाठी निमित्त असते. शरीर सोडल्यावर देखील हे अस्तित्वात असतात आणि शिष्य घडवत असतात. हे कसे शक्य आहे?

यासाठी निसर्गाचा आणखी एक नियम अभ्यासू. कोणतीही शक्ती कधीही नष्ट होत नाही. फक्त ती स्वरूप बदलते. Energy never gets destroyed. It can be converted from one source to another. The form is changed but energy always exists.

जे योगी, संत, स्वामी असे थोर सत्पुरुष इतिहासात होऊन गेले त्यांना एक व्यक्ती मानता मी शक्ती मानतो. जर शक्ती नष्ट होत नाही तर ते योगी नाहीसे झालेले नाहीत. ती शक्ती ते विशिष्ट शारीरिक रूप सोडून दुसऱ्या कुठल्या तरी शक्तीत रुपांतरीत (converted) झालेली आहे. ती याच वातावरणात अस्तित्वात आहे. आपण जर शोध घेतल्यावर ती शक्ती आपल्याला सापडू शकते.

आता याचा शोध कसा घ्यायचा?



No comments: