|| श्री स्वामी समर्थ ||
एका योग्याची डायरी - भाग १ वाचून, फेसबुकवर श्री.
सिद्धेश धुमे याचं एक प्रश्न आला. “What does one need to do to be able to
acknowledge and understand Indication?”
या प्रश्नाचे उत्तर वाटते तितके साधे सरळ नाही. त्याला
अनेक कंगोरे आहेत. या प्रश्नाच्या उत्तरात पुन्हा एक नवा प्रश्न उभा राहणार आणि प्रत्येक
वेळी आलेले उत्तर पुन्हा नवीन प्रश्नाकडे नेणार. जर माझी आणि "त्या"ची
Imagination, Illusion, Intuition आणि Indication
या ४ विषयांवरील चर्चा किंवा बोलणे लिहायचे ठरवले तर एक पुस्तक लिहावे लागेल.
तरीही मी थोडक्यात लिहायचा प्रयत्न करतो. या प्रश्नाचे
सरळ उत्तर आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्न पाहून एखाद्या निश्चित उपायापर्यंत पोहोचायचं
प्रयत्न प्रयत्न करू या का? सरळ उत्तर द्यायचे तर ते असे असेल …
“निसर्गाशी संपर्क, जवळीक आणि संवाद साधा !”
"पण निसर्ग म्हणजे काय? ... झाडे, आकाश, समुद्र,
दगड-धोंडे, डोंगर, हवा, वातावरण?"
"नाही. प्रत्येक सजीव आणि निर्जीव अस्तित्व
... अगदी मोठ्या ताऱ्यापासून ते माणूस, पक्षी, जनावरे, विषाणू आणि अणू - रेणूसारखे
छोटे छोटे कण .... एकत्रितपणे किंवा वेगवेगळे म्हणजेच निसर्ग होय."
“वर सांगितलेल्या सजीव आणि निर्जीव यांच्याशी संपर्क,
जवळीक आणि संवाद कसा साधायचा?”
“निसर्गाशी सहजपणे वागा.””
“निसर्गाशी सहजपणे कसे वागायचे?”
“निसर्गात घडणाऱ्या कोणत्याही प्रसंगात/ घटनेत आपला
सहभाग नोंदवू नका.”
"कशातही सहभागी व्हायचे नाही म्हणजे काहीही न
करता स्वस्थ बसायचे का? मग जगायचे कसे?"
"सहभाग नोंदवू नका आणि कशातही सहभागी न होणे यात
फरक आहे. सहभागी व्हा पण तो नोंदवू नका. हेच गीतेत सांगितले आहे. कर्म करा पण फळाची
अपेक्षा ठेवू नका."
“दैनंदिन व्यवहारात आपण पुष्कळ गोष्टींशी जोडलेले असतो. अशा वेळी स्वतःला कोणत्याही प्रसंगापासून / घटनेपासून वेगळे राखणे कसे शक्य आहे?”
“आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि नैसर्गिकपणे घडणाऱ्या
कोणत्याही घटनेला विरोध करू नका. कोणत्याही नैसर्गिक प्रतिक्रियेवर पुन्हा क्रिया करू
नका.”
“नैसर्गिक प्रतिक्रियेवर पुन्हा क्रिया करणे म्हणजे
काय?”
"निसर्गाचे काही मुलभुत नियम आहेत. कोणत्याही
वस्तूवर जोपर्यंत एखादे बाह्य बल (external force) काम (क्रिया) करत नाही तोपर्यंत
त्या अस्तित्वाची स्थिती स्थिर असते. क्रिया घडली कि आपोआप प्रतिक्रिया घडते. प्रतिक्रिया
ही नेहमी क्रियेच्या नेमक्या विरुद्ध दिशेने घडते आणि प्रतिक्रियेचा जोर/ शक्ती ही
क्रियेच्या शक्ती इतकीच असते. म्हणजेच प्रतिक्रिया ही क्रियेमुळे निर्माण झालेली शक्ती
किंवा घटना पुन्हा निसर्गात विसर्जित करते. नैसर्गिक घडलेली क्रिया नैसर्गिकपणे विसर्जित
होऊ द्या. त्यात हस्तक्षेप करू नका.
घडत असलेली कोणतीही घटना ही क्रिया आहे की प्रतिक्रिया
आहे, त्याची बल-शक्ती-दिशा काय आहे, याची माहिती नसताना केलेली कृती ही आपली चूक ठरू
शकते. एक उदाहरण पाहू.
समजा निसर्ग एक तराजू आहे. एका पारड्यात कोणीतरी क्रिया
केली. निसर्ग आपोआप दुसऱ्या पारड्यात प्रतिक्रिया ठेवतो. समजा मी असे समजलो की निसर्गाने
प्रतिक्रियेसाठी माझी निवड केली आहे आणि क्रियेचे बल-शक्ती माहिती नसताना दुसऱ्या पारड्यात
माझी प्रतिक्रिया ठेवली.
शक्यता १
- क्रियेची शक्ती १० किलो आहे. माझी प्रतिक्रिया १५ किलोची आहे. पारडे प्रतिक्रियेच्या
बाजूने झुकते आणि निसर्गाला आता माझे जास्तीचे ५ किलो क्रिया म्हणून स्वीकारावे लागतात.
शक्यता २ -
क्रियेची शक्ती १० किलो आहे. माझी प्रतिक्रिया ५ किलोची आहे. पारडे क्रियेच्या
बाजूने झुकलेले राहते आणि निसर्गाला ५ किलो प्रतिक्रिया करावी लागते.
शक्यता ३ (महत्वाची) - क्रियेची शक्ती १० किलो आहे.
माझी प्रतिक्रिया १० किलोची आहे. मात्र निसर्गाने प्रतिक्रियेसाठी माझी निवड केलेली
नाही. दुसरा कोणी येऊन त्या पारड्यात १० किलो ठेवतो. आता निसर्ग माझी प्रतिक्रिया ही
क्रिया (हस्तक्षेप) म्हणून स्वीकारतो. मला १० किलोची प्रतिक्रिया घ्यावी लागते. म्हणजेच
मी भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय हा माझे भोग वाढवणारा ठरू शकतो.
आपल्या भावना आपल्याला क्रिया आणि प्रतिक्रिया करायला
भाग पडतात आणि निसर्ग ढवळला जातो. म्हणूनच निसर्गात हस्तक्षेप करू नका आणि भावनांवर
नियंत्रण ठेवा.
“भावनांवर नियंत्रण कसे ठेवायचे?”
"मन शांत ठेवा."
“मन शांत कसे ठेवायचे?”
“विचार थांबवा. त्यांना सोडून द्या.”
“विचार ही एक सलग चालणारी प्रक्रिया आहे. ते कसे थांबवायचे?
”
“एकाच विचारावर मन केंद्रित करा. बाकीचे विचार आपोआप
सुटतील.”
“एकाच विचारावर लक्ष कसे केंद्रित करायचे?”
“मन किंवा लक्ष केंद्रित करण्यासाठी अध्यात्मात आरती,
जप, भजन, नामःस्मरण, ध्यान, धारणा अशी अनेक साधने आहेत. जे तुमच्या प्रकृतीशी जुळेल
असे कोणतेही एक साधन निवडा. मनःशांती तुम्ही काय साधन निवडता यावर अवलंबून नसते. तर
तुम्ही ती साधना कशी करता यावर अवलंबून असते. प्रत्येक साधनेला आपले स्वतःचे असे परिणाम
असतात. मात्र विशिष्ठ प्रकारे आणि विशिष्ठ वेळ साधना केली तर ते परिणाम जलद गतीने अनुभवास
येतात. अन्यथा फार कालावधी लोटावा लागतो किंवा काही जणांना कधीही परिणाम मिळत नाहीत."
मला वाटते आपण एका निश्चित उपायाकडे पोहोचलो आहोत.
नाही का?
No comments:
Post a Comment