Sunday 30 March 2014

एका योग्याची डायरी - भाग ३

|| श्री स्वामी समर्थ ||

आपण मागे पहिले की “आरती, जप, भजन, नामःस्मरण, ध्यान, धारणा अशी अनेक साधने आहेत. जे तुमच्या प्रकृतीशी जुळेल असे कोणतेही एक साधन निवडा.”

आता कोणते साधन माझ्या प्रकृतीशी जुळेल, याचा शोध कसा घ्यायचा?

यासाठी मी माझ्या प्रकृतीचा अभ्यास केला पाहिजे. मला सर्वप्रथम"मी" समजला पाहिजे. कोहम? या जगात सर्वांना सारे समजत असते. कोण कसा कुठे चुकतो हे सांगायला प्रत्येक जण तत्पर असतो. पण तरीही त्याचे स्वतःचे आयुष्य आनंदमय, समाधानी आणि शांत नसते. आलेल्या प्रत्येक भोगाला दोन उत्तरे आलटून पालटून सांगितली जातात.

. मी बरोबर केले होते. पण अमक्या तमक्यामुळे हे माझे चांगले होत नाही.
. मी इतके सगळे चांगले करतो तरीही माझे काही काही वाईट सतत होत असते. माझे नशीब दुसरे काय?

पण माझे काही चुकत असेल असा विचार कोणीच करत नाही. जो हा विचार आणि अभ्यास करतो त्याला निश्चित साधन शोधणे सोपे जाते. ज्याला हा अभ्यास करायचा नसतो तो कोणी तरी गुरु शोधत जातो आणि कुणाचे तरी पाय पकडून तो सांगेल ते करत राहतो.

साधनेच्या एखाद्या पातळीवर पोचलेला कोणीही गुरु होऊ शकतो का? तो आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करू शकतो का? याचे उत्तर त्याने आपल्याला कोणती साधना करायला सांगितली आणि त्या साधनेचा मला काय अनुभव आला यात शोधावे लागेल.

एखाद्या विशिष्ट साधनेवर प्रभुत्व असलेला फक्त त्या विशिष्ट साधनेचेच मार्गदर्शन करू शकतो. कारण त्याने फक्त त्या साधनेचाच अभ्यास केलेला असतो. सर्वांना तो तेच करायला सांगतो. ती साधना ज्यांच्या प्रकृतीशी जुळते त्यांना चांगले अनुभव येतात. बाकीचे आयुष्यभर वाट पाहत राहतात. आणि शेवटी नशिबाला दोष देतात. उदाहरणार्थ  : जसे एखादा रसायनशास्त्राचा पदवीधर असेल तर तो भौतिकशास्त्राचा मुलभूत (basic) अभ्यास सांगू शकेल, पण भौतिकशास्त्राचा पदवी अभ्यासक्रम शिकवू शकणार नाही. तो सर्वांना सांगेल की रसायनशास्त्र घेऊन पदवी मिळेल. परिणामी ज्यांना रसायनशास्त्र अनुकूल नसेल, समजण्यास जड असेल ते सतत नापास होत जातील.

मग खरोखर गुरु या पदाला कसे ओळखावे?

जो सतत एकच प्रकारचे शिक्षण सरसकट सर्वांना देतो तो विशिष्ट पातळीवर पोहोचलेला साधक असतो. गुरु नव्हे तर शिक्षक असतो. शिक्षक फार तर सर्व साधनांची तोंड ओळख करून देऊ शकतो. गुरूला नेहमी माहिती असते की त्याचे स्वतःचे प्रभुत्व कशात आहे आणि तो शिष्याला ते शिक्षण अनुकूल आहे की नाही हे तो जाणत असतो. जर ते अनुकूल नसेल तर शिष्याला जिथे अनुकूल शिक्षण मिळेल अशा गुरूकडे पाठवतो.

आपल्याकडे सरसकट आणखीन एक शब्द वापरला जातो "सतगुरु किंवा सदगुरू" ! ज्याला सर्व साधनांविषयी खोलवर माहिती असते आणि त्याबाबत तो मार्गदर्शन करू शकतो त्यालाच सदगुरू म्हणावे. सर्वोच्च पातळीवर असतात ते योगी, संत, स्वामी! यांचे प्रभुत्व वादातीत असते. यांच्या शक्ती अमर्याद असतात आणि ते मुक्त हस्ते त्याची उधळण करत असतात. शरीर हे यांच्यासाठी निमित्त असते. शरीर सोडल्यावर देखील हे अस्तित्वात असतात आणि शिष्य घडवत असतात. हे कसे शक्य आहे?

यासाठी निसर्गाचा आणखी एक नियम अभ्यासू. कोणतीही शक्ती कधीही नष्ट होत नाही. फक्त ती स्वरूप बदलते. Energy never gets destroyed. It can be converted from one source to another. The form is changed but energy always exists.

जे योगी, संत, स्वामी असे थोर सत्पुरुष इतिहासात होऊन गेले त्यांना एक व्यक्ती मानता मी शक्ती मानतो. जर शक्ती नष्ट होत नाही तर ते योगी नाहीसे झालेले नाहीत. ती शक्ती ते विशिष्ट शारीरिक रूप सोडून दुसऱ्या कुठल्या तरी शक्तीत रुपांतरीत (converted) झालेली आहे. ती याच वातावरणात अस्तित्वात आहे. आपण जर शोध घेतल्यावर ती शक्ती आपल्याला सापडू शकते.

आता याचा शोध कसा घ्यायचा?



Saturday 29 March 2014

एका योग्याची डायरी - भाग २

|| श्री स्वामी समर्थ ||

एका योग्याची डायरी - भाग १ वाचून, फेसबुकवर श्री. सिद्धेश धुमे याचं एक प्रश्न आला. “What does one need to do to be able to acknowledge and understand Indication?”

या प्रश्नाचे उत्तर वाटते तितके साधे सरळ नाही. त्याला अनेक कंगोरे आहेत. या प्रश्नाच्या उत्तरात पुन्हा एक नवा प्रश्न उभा राहणार आणि प्रत्येक वेळी आलेले उत्तर पुन्हा नवीन प्रश्नाकडे नेणार. जर माझी आणि "त्या"ची Imagination, Illusion, Intuition आणि Indication  या ४ विषयांवरील चर्चा किंवा बोलणे लिहायचे ठरवले तर एक पुस्तक लिहावे लागेल.

तरीही मी थोडक्यात लिहायचा प्रयत्न करतो. या प्रश्नाचे सरळ उत्तर आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्न पाहून एखाद्या निश्चित उपायापर्यंत पोहोचायचं प्रयत्न प्रयत्न करू या का? सरळ उत्तर द्यायचे तर ते असे असेल   …

“निसर्गाशी संपर्क, जवळीक आणि संवाद साधा !”

"पण निसर्ग म्हणजे काय? ... झाडे, आकाश, समुद्र, दगड-धोंडे, डोंगर, हवा, वातावरण?"

"नाही. प्रत्येक सजीव आणि निर्जीव अस्तित्व ... अगदी मोठ्या ताऱ्यापासून ते माणूस, पक्षी, जनावरे, विषाणू आणि अणू - रेणूसारखे छोटे छोटे कण .... एकत्रितपणे किंवा वेगवेगळे म्हणजेच निसर्ग होय."

“वर सांगितलेल्या सजीव आणि निर्जीव यांच्याशी संपर्क, जवळीक आणि संवाद कसा साधायचा?”

“निसर्गाशी सहजपणे वागा.””

“निसर्गाशी सहजपणे कसे वागायचे?”

“निसर्गात घडणाऱ्या कोणत्याही प्रसंगात/ घटनेत आपला सहभाग नोंदवू नका.”

"कशातही सहभागी व्हायचे नाही म्हणजे काहीही न करता स्वस्थ बसायचे का? मग जगायचे कसे?"

"सहभाग नोंदवू नका आणि कशातही सहभागी न होणे यात फरक आहे. सहभागी व्हा पण तो नोंदवू नका. हेच गीतेत सांगितले आहे. कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका."

“दैनंदिन व्यवहारात आपण पुष्कळ गोष्टींशी जोडलेले असतो. अशा वेळी स्वतःला कोणत्याही प्रसंगापासून / घटनेपासून वेगळे राखणे कसे शक्य आहे?”

“आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि नैसर्गिकपणे घडणाऱ्या कोणत्याही घटनेला विरोध करू नका. कोणत्याही नैसर्गिक प्रतिक्रियेवर पुन्हा क्रिया करू नका.”

“नैसर्गिक प्रतिक्रियेवर पुन्हा क्रिया करणे म्हणजे काय?”

"निसर्गाचे काही मुलभुत नियम आहेत. कोणत्याही वस्तूवर जोपर्यंत एखादे बाह्य बल (external force) काम (क्रिया) करत नाही तोपर्यंत त्या अस्तित्वाची स्थिती स्थिर असते. क्रिया घडली कि आपोआप प्रतिक्रिया घडते. प्रतिक्रिया ही नेहमी क्रियेच्या नेमक्या विरुद्ध दिशेने घडते आणि प्रतिक्रियेचा जोर/ शक्ती ही क्रियेच्या शक्ती इतकीच असते. म्हणजेच प्रतिक्रिया ही क्रियेमुळे निर्माण झालेली शक्ती किंवा घटना पुन्हा निसर्गात विसर्जित करते. नैसर्गिक घडलेली क्रिया नैसर्गिकपणे विसर्जित होऊ द्या. त्यात हस्तक्षेप करू नका.

घडत असलेली कोणतीही घटना ही क्रिया आहे की प्रतिक्रिया आहे, त्याची बल-शक्ती-दिशा काय आहे, याची माहिती नसताना केलेली कृती ही आपली चूक ठरू शकते. एक उदाहरण पाहू.

समजा निसर्ग एक तराजू आहे. एका पारड्यात कोणीतरी क्रिया केली. निसर्ग आपोआप दुसऱ्या पारड्यात प्रतिक्रिया ठेवतो. समजा मी असे समजलो की निसर्गाने प्रतिक्रियेसाठी माझी निवड केली आहे आणि क्रियेचे बल-शक्ती माहिती नसताना दुसऱ्या पारड्यात माझी प्रतिक्रिया ठेवली.

शक्यता १  - क्रियेची शक्ती १० किलो आहे. माझी प्रतिक्रिया १५ किलोची आहे. पारडे प्रतिक्रियेच्या बाजूने झुकते आणि निसर्गाला आता माझे जास्तीचे ५ किलो क्रिया म्हणून स्वीकारावे लागतात.

शक्यता २ -  क्रियेची शक्ती १० किलो आहे. माझी प्रतिक्रिया ५ किलोची आहे. पारडे क्रियेच्या बाजूने झुकलेले राहते आणि निसर्गाला ५ किलो प्रतिक्रिया करावी लागते.

शक्यता ३ (महत्वाची) - क्रियेची शक्ती १० किलो आहे. माझी प्रतिक्रिया १० किलोची आहे. मात्र निसर्गाने प्रतिक्रियेसाठी माझी निवड केलेली नाही. दुसरा कोणी येऊन त्या पारड्यात १० किलो ठेवतो. आता निसर्ग माझी प्रतिक्रिया ही क्रिया (हस्तक्षेप) म्हणून स्वीकारतो. मला १० किलोची प्रतिक्रिया घ्यावी लागते. म्हणजेच मी भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय हा माझे भोग वाढवणारा ठरू शकतो.

आपल्या भावना आपल्याला क्रिया आणि प्रतिक्रिया करायला भाग पडतात आणि निसर्ग ढवळला जातो. म्हणूनच निसर्गात हस्तक्षेप करू नका आणि भावनांवर नियंत्रण ठेवा.

“भावनांवर नियंत्रण कसे ठेवायचे?”

"मन शांत ठेवा."

“मन शांत कसे ठेवायचे?”

“विचार थांबवा. त्यांना सोडून द्या.”

“विचार ही एक सलग चालणारी प्रक्रिया आहे. ते कसे थांबवायचे? ”

“एकाच विचारावर मन केंद्रित करा. बाकीचे विचार आपोआप सुटतील.”

“एकाच विचारावर लक्ष कसे केंद्रित करायचे?”

“मन किंवा लक्ष केंद्रित करण्यासाठी अध्यात्मात आरती, जप, भजन, नामःस्मरण, ध्यान, धारणा अशी अनेक साधने आहेत. जे तुमच्या प्रकृतीशी जुळेल असे कोणतेही एक साधन निवडा. मनःशांती तुम्ही काय साधन निवडता यावर अवलंबून नसते. तर तुम्ही ती साधना कशी करता यावर अवलंबून असते. प्रत्येक साधनेला आपले स्वतःचे असे परिणाम असतात. मात्र विशिष्ठ प्रकारे आणि विशिष्ठ वेळ साधना केली तर ते परिणाम जलद गतीने अनुभवास येतात. अन्यथा फार कालावधी लोटावा लागतो किंवा काही जणांना कधीही परिणाम मिळत नाहीत."


मला वाटते आपण एका निश्चित उपायाकडे पोहोचलो आहोत. नाही का?


Wednesday 26 March 2014

एका योग्याची डायरी - भाग १

|| श्री स्वामी समर्थ ||

अध्यात्म ... परात्पर  .... पारलौकिक  .... एक अधिभौतिक अनुभव ... एक आत्मानुभव ... म्हणजे नक्की काय? ... असले सगळे शब्द फार जड जड वाटायचे मला .... कुणी शब्द फोडून  शब्दार्थ सांगायचे ... थोडे हुशार भावना जोडून भावार्थ सांगायचे ... तर कोणी फार गंभीर चेहरा करून गुढार्थ सांगायचे ....

खरच ! देव, ईश्वर, परमेश्वर इतका अवघड, गहन आहे का? मग अनेक संत, महंत यांनी तो सोपा आहे असे सांगितले आहे ते का? काय असतात हे अध्यात्मिक अनुभव ? आपल्याला जे दिसते किंवा भासते ते सत्य कसे ओळखावे? प्रश्न ... प्रश्न .... आणि फक्त प्रश्न !

पाश्चात्य देशांमध्ये संशोधन होऊन ते आपल्यापर्यंत पोहोचले कि आपण ते स्वीकारतो. अन्यथा ते संशयाच्या भोवऱ्यात फिरवत ठेवतो. प्रत्येक संशोधन हे दस्तावेजांवर आधारीत असते. प्रत्येक दस्तावेज हा कसोटीवर घासून मगच सत्य समाजला जातो. आपल्याकडे फार पूर्वी अध्यात्माशी संबंधीत दस्तावेज केले जात. नंतर त्यात भावना मिसळून कुणाचा तरी उदो उदो केला जाऊ लागला आणि निखळ प्रामाणिक लेखन मागे पडले. आज आपण हे संशोधन पाश्चात्यांकडून येण्याची वाट पहावी का? आणि अशाच एका प्रश्नांकित क्षणी मला तो भेटला.

तुमच्या आमच्यातलाच ... त्याच्याशी बोलताना, विचारांची देवाणघेवाण करताना खूप काही लक्षात आले. त्याच्याच शब्दात सांगायचे तर अध्यात्मात खूप चकवे असतात. काही खरे .. काही खोटे ... भास, आभास आणि सत्य याचा विळखा सतत पडत असतो आणि यात सत्य ओळखणे कठीण बनते.

त्याने अनुभवांना चार कसोट्या लावल्या.

1. Imagination (creation by mind) - कल्पना
आपण एखाद्या गोष्टीचा फार विचार करतो. आणि ती गोष्ट मनाचा पगडा घेते. मनाला तेच चित्र समोर दिसू लागते. Just think of  something again & again .... after some time you will find that mind will show you similar things or images which you are thinking. This is not the truth. It's imagination of your mind. या साऱ्या आपल्या कल्पना असतात. 

2. Illusion - मतीभ्रम, मिथ्य
मन हे निरंतर विचार करत असतेहे विचार मनात  वेगवेगळे  भास निर्माण करत असतात.  ऐकीव 
माहितीच्या जोरावर किंवा imagination मुळे त्या आभासाच्या प्रतिमा मनावर आघात करतात आणि जे अनुभव येतात ते illusion. हे सारे आपले भ्रम असतात.

3. Intuition - अंतःप्रेरणा
Imagination आणि illusion  च्या पातळीच्या वर आलेले अनुभव .. यात घडणाऱ्या घटनांची चाहूल लागणे, भूतकाळातील घटना समजणे, समोरच्याविषयी आपोआप माहिती कळणे यासारख्या गोष्टी समाविष्ट असतात. पण कधी कधी भूतकाळातील समजलेली घटना ही भविष्यात घडणारी असू शकते. कधी भविष्यात दिसलेली घटना प्रत्यक्षात घडतच नाही. समोरच्याविषयी समजलेली माहिती ही अचूक असतेच असे नाही. म्हणजे हेदेखील सत्य असतेच असे नाहीपण बऱ्याच अंशी सत्याकडे झुकणारे असते.

4. Indication - संकेत, इशारा, लक्षण
ईश्वर हा निसर्गात सर्वत्र आहे हे सत्य असेल तर ईश्वराकडून येणारे संकेत हे निसर्गाकडून येतात असेही म्हणता येईल. हे थेट  निसर्गाकडून  येणारे संकेत हेच संपूर्णपणे सत्य असतात. निसर्ग सर्वांशी बोलतो. त्याचे ऐकणारा कोणी नसतो. ईश्वरी संकेत सर्वांकडे येतात. त्याकडे संपूर्ण लक्ष देणारे कोणी नसतात. Imagination, Illution आणि intution या साऱ्या पातळ्यांवर मन विचारात मग्न असते. त्यामुळे या संकेतांकडे आपले लक्ष नसते. सर्व साधारण पातळीवर हे संकेत जसेच्या तसे आपण उचलू शकत नाही.

एक उदाहरण पाहू.
आपण  रस्त्यावरून चालत असतोअसंख्य वाहने हॉर्न वाजवत जात असतातपण आपले लक्ष  आपल्या सोबत चालत बोलाणाऱ्याकडे असते किंवा आपण आपल्या विचारात दंग असतो आणि हे हॉर्न कानावर पडूनही आपल्याला ऐकू येत नाहीत. ते कानावर आपटले त्तरी त्याची नोंद आपले मन घेत नाही.

आणखी एक उदाहरण पाहू.
एखादी बाई गप्पा मारत बसलेली असते. तिचे मुल बाहेरून कुठून तरी हाक मारते. आवाज खूप दुरून आलेला असतो, बारीक असतो. पण आईला ती हाक पटकन ऐकू येते. बाकीच्या बायकांना किंवा पुरुषांना ती हाक कानावर पडूनही मनापर्यंत पोहोचत नाही. म्हणजेच मन एका विशिष्ठ दिशेने जोडलेले असले की तिथले आवाज चटकन नोंदले जातात

असेच संकेतांचे आणि अनुभवाचे असते. आपल्याला आलेले अनुभव हे Indication असतील तरच स्वीकारावे. ते तर्कांच्या कसोट्यांवर क्रूरपणे घासून पाहावे. आणि मगच Indication म्हणून स्वीकारावे


त्याने या कसोट्यांवर घासून स्वीकारलेले काही अनुभव हे इतरांना तुलनात्मक अभ्यास करणे सोपे जावे म्हणून लिहून ठेवले. तेच तुमच्यासमोर एक एक करून "एका योग्याची डायरी" द्वारे अर्पण करीत आहे .... त्याचे नाव वगळून ... कारण ... त्याच्याच शब्दात 

"ज्याला अनुभव आला तो महत्वाचा नाही तर जो अनुभव आला तो महत्वाचा” ...