अतुल खरे, सुहास खरे, अरुण सिंह, अपर्णा वाघ कुलकर्णी, कीर्ती तुंगारे कुलकर्णी, किशोर मगर, यतीन देव या मित्र आणि मैत्रिणींना सस्नेह अर्पण,
परवा ३१ डिसेंबर, मी थोडी घेतली होती, मला अजिबात चढली नव्हती. फक्त झोपेचा अंमल जरा जास्तच
होता. पण तुम्ही म्हणता तर मला जास्त पण झाली असेल.
त्याचं काय झालं. १ जानेवारीला सकाळी आमचे शाळकरी मित्र मैत्रिणींचे
गेट टुगेदर होते. ३१ डिसेंबरची पार्टी खूप उशिरा संपली. रात्री बिलकुल झोप न झाल्याने
डोळ्यावर झापड येत होती. पण गेट टुगेदरला न जाणे बरे दिसले नसते. पहिलेच गेट टुगेदर
... आम्ही खूप वर्षांनी भेटत होतो. एक दोघे सोडले तर मला कुणाचीच नावे आणि चेहरे आठवत
नव्हते. हॉलमध्ये शिरताच मी जरा डोळे ताणून पहिले. बरेच जण जमले होते. ओळखीचे कोणी
दिसत नव्हते. एक कोपऱ्यातला कोच पाहून मी तिथे थोडा वेळ ताणून द्यायचे ठरवले. कोचावर
जाऊन बसलो. अगदी आडवे होणे बरे दिसणार नाही म्हणून कोचाच्या मागे हात टाकून थोडा तिरपा
झालो आणि डोळे मिटले.
जेमतेम काही सेकंद झाले असतील, कुणीतरी खांद्याला हात लावला. मी
डोळे उघडले. समोर दोघे तिघे उभे होते ... की तिघे चौघे होते? ... नक्की कळत नव्हते. मला अजिबात चढली नव्हती. डोळ्यावर
जबरदस्त झापड येत होती.
"ए शैल्या, ओळखल का?"
काय सांगायचं? चेहरा काही नीट दिसत नव्हता. काही तरी नाव घ्यायचे
आणि फजिती व्हायची. खरे बोललेले चांगले. मी मुंडी हलवली आणि थोडा अडखळत म्हणालो
"खरेच ... मी ओळखले नाही.". "अगदी बरोबर ओळखलेस. मी अतुल खरेच आहे.
नाव सांगून वर ओळखले नाही म्हणतोस? तुझा गमत्या स्वभाव बदलला नाही."
आयला ... मी बुचकळ्यात पडलो. काय नाव ओळखले? मी तर काहीच नाव घेतले
नाही. ३१ ची जास्त झाली की काय? याला का मला?
छे छे ..असं कसं होईल. मी थोडीशीच घेतलेली. मला अजिबात चढली नव्हती. मी आपला
उगाचच हसलो.
"याला ओळखला का?" बाजुच्याकडे बोट दाखवत तो म्हणाला.
मी उभा राहिलो आणि निरखून पाहण्याचा प्रयत्न केला. मला चेहरेच धुरकट
दिसत होते तर मी काय सांगणार. काही बोललो आणि याने परत माझी टर खेचत म्हणाला
"बरोबर ओळखलस" तर काय करणार. उगाच आपलं याला वाटेल की मला चढलीय. मी आपली
मुंडी नकारात्मक हलवली.
"अरे हा सिंह."
थोडा हादरलो. सिंह ?? आजूबाजूला
बघितले. नाही .., जंगल नव्हते, हॉलच होता. सिंह दोन पायांवर उभा असल्यासारखा वाटला.
आयाळ पण दिसत नव्हती.
असेल. माणसाळला असेल. नाना पाटेकरने चित्ता, वाघ पाळलेत. मी बघितलाय
तो सिनेमा. तसाच असेल हा. मी जरा एक पाऊल मागे आलो. सिंहच तो शेवटी ... रिस्क नको.
पण हा आमच्या गेट टुगेदर मध्ये कसा?
मी विचारले "हा काय करतोय इथे?"
तो म्हणाला, "अरे हा आयुर्वेदिक डॉक्टर आहे. लोकांना जीवन दान
द्यायचे पवित्र काम करतो."
मी परत बुचकळ्यात .. सिंह शिकार करायचे सोडून जीवनदान देतोय? गडबड
आहे काहीतरी!
"थांब मी आणखी एकाला घेऊन येतो. बघ ओळखतोस का."
तो गेला पण मला दोघे जाताना दिसले. एकाचे दोन दिसतात का मला? मी
थोडीशीच घेतलेली. मला काही चढली नाहीय. आता सिंहाशी काय बोलायचे? त्याला मराठी कळत असेल का? तेव्हढ्यात
सिंह चक्क मराठीत बोलला "कसा आहेस तू?" मी उडालोच.
"मजेत. तू कसा आहेस? तुझी डॉक्टरकी कशी चाललीय?"
"अरे मी डॉक्टर नाही. तो सिंह डॉक्टर आहे. तो गेला अतुलबरोबर.
मी खरे आहे .. सु ख ."
सिंह गेलेला ऐकून बरे वाटले. असेल माणसाळलेला ..पण आपण रिस्क कशाला घ्यायची? आणि हा काय म्हणाला? मी खरे सुख आहे. सुख कधीपासून बोलायला लागले. गडबड
आहे. मी थोडीशीच घेतलेली. मला काही चढली नाहीय.
म्हटले सुख कसे दिसते ते तरी पाहू. मी चेहरा बघायचा प्रयत्न केला.
धुरकट धुरकट ... म्हटले बरोबर .. सुख असेच अस्पष्ट असते. तेव्हढ्यात कुणीतरी खांद्यावर
हात ठेवला. "अरे शैलेश, मला ओळखलेस की नाही?" मी वळलो. काही दिसत नव्हते
नीटसे. आता मी गप्प राहायचे ठरवले. फक्त मुंडी हलवली ... "नाही" म्हणून.
"अरे मी वाघ. आता तरी ओळख पटतेय का? खूप वर्ष झाली ना चेहऱ्यात
थोडा फरक पडणारच."
मी उडायचा बाकी राहिलो. मघाशी सिंह भेटला आता वाघ ... आणि डरकाळी
फोडायचे सोडून मराठीत बोलतो ... तेसुद्धा बायकी आवाजात?
विचार करा तुमच्या समोर वाघ आला आणि तुमच्या खांद्यावर पंजा ठेऊन
उभा राहिला आणि म्हणाला "मी वाघ". तुम्ही काय कराल ...? मी तेच केले. मी
आपला कसनुसा हसलो. हळूच खांदा वाघाच्या पंजाखालून काढून घेतला. वाघ काही तरी बोलला.
मी आपला सुन्न मनाने कसनुसा हसत राहिलो. समोर साक्षात वाघ आल्यावर दुसरे काय करणार .. नाही का?
"हिला ओळखलेस का?" मी अजून विचारात की वाघाचा आवाज इतका
बायकी का? आणि आता हा कोण नवीन प्राणी? मी आपले त्या प्राण्याकडे पाहायचा क्षीण प्रयत्न
केला. म्हटले "वाघीण का?"
वाघ हसला आणि म्हणाला" मस्करी कसली करतोस रे? ही आपली किर्ती."
आयला आपली? आपली किर्ती कधीच नव्हती. अपकिर्तीचा जास्त ... किर्ती
कधी आपल्या जवळपास सुद्धा फिरकली नाही. म्हटले की चला ... किर्ती असते तरी कशी ते पाहू.
काही नीटसे दिसेना. जरा दोन पावले पुढे जाऊन चेहरा पाहायचा प्रयत्न केला तशी तिने वाकडे
तोंड केले आणि नाकावर रुमाल ठेऊन मारक्या म्हशीसारखी बघत निघून गेली. मी मनात म्हटले
"माझ्याशी असे फटकून वागणारी म्हणजे नक्की किर्तीच असणार." बाजूला पाहिले.
वाघ पण निघून गेला होता. सुख पण गर्दीत कुठेतरी हरवले होते.
चला .. आता जरा एक डुलकी काढू. कोचावर बसून मान मागे टेकली आणि डोळे
मिटले. तेव्हढ्यात मघाशी आलेला आवाज परत आला. "ए शैल्या, झोपतो काय? याला ओळखतोस
का?"
"क क कोणाय?"
मी धडपडून उठलो. कसाबसा उभा राहिलो. समोर पाहिले. दोघे जण उभे होते. हलत होते
सारखे. मी म्हटले, "स्थिर उभे राहा ना म्हणजे मला दिसेल नीट?"
तो म्हणाला, "ए शैल्या, तूच नीट उभा राहा आणि बघ याला."
मी डोळे ताणून बघायचा प्रयत्न केला. दिसला एकदाचा पण चेहरा मात्र
धुक्यात घुसलेला. धुरकट धुरकट.
"हा कोण?"
"अरे हा मगर"
मी खल्लास ... अरे हे गेट टुगेदर आहे की प्राणी संमेलन? सिंह काय
.. वाघ काय .. आणि आता मगर? आणि तो मगर की ती मगर? शाळेत असताना बहुदा "ती मगर"
असे शिकवलेले ... आणि हा तो मगर? असेल मगरीचा नवरा असेल. पण मगरीला तर सतत पाणथळ जागा
लागते.
मी आजूबाजूला पाहिले. हॉलच होता. कुठे पाणथळ जागा दिसली नाही. मी
विचारले," हा कुठून आला?"
"टिटवाळ्याहुन ... "
मग बरोबर ... तिथे गणपती देवळाच्या बाजूला तलाव आहे ना. हा तिथेच रहात असणार. मी हळूच विचारले,
"याने काय खाल्ले का? नाश्ता वगैरे झाला का याचा?" हो भुकेजला असेल तर उगाच
रिस्क नको. मागच्या मागे सटकू .. याचा काय भरोसा?
मगर बहुदा गहिवरला. केवळ मीच त्याची अशी चौकशी केली असावी.
"हो हो पोटभर नाश्ता झालाय. आता डायरेक्ट जेवण."
मी जेवणापर्यंत थांबायचं, हा बेतच रद्द केला. चला ... सटकू आत्ताच.
दुरून एक उंच काठी हलत डुलत आली. समोर येऊन उभी राहिली. लांबून काठी
वाटली पण जवळ आल्यावर लक्षात आले .. एक खांब होता. खांबाला हात फुटले. आपले दोन्ही
हात माझ्या हातात घेऊन खांब प्रेमळपणे म्हणाला, " कसा आहेस तू? मला ओळखलस की नाही."
खांबाला मी ओळखलेला. पण तोंडून शब्द फुटेना. मी फक्त मान होकारार्थी
हलवली. पण बहुदा ती नकारार्थी हलली असावी.
"अरे आपण नेहमी एकत्र असायचो. मी देव."
मला एकदम भरून आलं. खरय ... कोण्णि नव्हता माझ्याबरोबर पण देव नेहमी
होता. हा नक्कीच देव. खांबातून बाहेर आलेला नरसिंह तोच हा. मी पटकन त्याला पाया पडलो.
हात जोडून उभा राहिलो. मला एकदम आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे स्मरण झाले. खून, बलात्कार, दरोडे इत्यादी इत्यादी .... लोक
माजलेत .. म्हणतात ... देव नाही आहे इथे.
मी भरलेल्या डोळ्यांनी म्हटले," अरे तुझी रोज आठवण येते रे.
तू आहेस कुठे?"
तो म्हणाला," मी हल्ली दुबईला असतो. कालच आलो इथे."
मग बरोबर ... तरीच दुबईला सगळी सुबत्ता आहे. आणि इथे रावणराज चालू
आहे. पण मनाला एक उभारी आली. आता देव आलाय. सगळे काही ठीक होईल.
तेव्हढ्यात तो म्हणाला, "उद्या परत जाणार."
मी रडवेला झालो आणि म्हणालो," अरे, म्हणजे आमची सुटका नाहीच
का? तू आलास तर जरा सगळं ठीक करून जा ना." मला एकदम चक्कर आली आणि भडभडून आले.
पुढचे काही आठवत नाही नीटसे ... पण कुणी कुणी बोलत होते ... "त्याला जरा जास्तच झालीय." "त्याला चढलीय." "एक नंबरचा बेवडा आहे."
माझ्या भावना त्यांच्यासाठीच होत्या ना? त्यांच्यासाठीच माझ्या डोळ्यात
पाणी आले ना? आणि तेच मला असे बोलतात? मी थोडीशीच घेतली होती, मला अजिबात चढली नव्हती. फक्त झोपेचा अंमल जरा जास्तच
होता. तुम्ही म्हणता तर मला जास्त पण झाली असेल.
पण तुम्हाला म्हणून सांगतो. यापुढे मी गेट टुगेदरला जाणार नाही.
खरे सुख काय बाहेरही मिळेल. किर्ती ही भेटेल. देव तर इथे नसतोच. तिथे प्राणी येतात.
जीवाला धोका. रिस्क कशाला घ्यायची? नाही का?