Sunday 30 November 2014

माझ्या आयुष्यात आलेली एक सुंदर परी .. आश्लेषा


भाग १ : लपंडाव


"ए म्याव ... मी किचनमध्ये लपनार. तू मला हॉलमध्ये आणि बेदलुममध्ये शोधायचं हां."
"ए म्याव ... आपन आओ मीना खेलू या का?"
"ए म्याव ... सांग ना ... मी पानाला कोन्ता कलर देऊ?"
"ए म्याव ... तू आमच्याकडे कधी ऱ्हायला येनार?"

आज अशी अनेक वाक्ये आठवत आहेत. भोवताली पुष्कळ प्रसंग फेर धरून नाचत आहेत आणि कानात तिचे गोड शब्द "ए म्याव ... ए म्याव ..." गुंजन करत आहेत. एकेका शब्दाचा उच्चार विचारपूर्वक, स्पष्टपणे आणि अत्यंत धीमेपणाने करत बोलण्याची तिची शैली मनात रुतून बसली आहे. माझ्यावर असलेले तिचे निर्व्याज प्रेम मला आजही संभ्रमात टाकते. कुणास ठाऊक पण कोणत्यातरी पुर्वजन्माचा ऋणानुबंध घेऊन आश्लेषा जन्माला आली इतके नक्की! 

२००७ मधली गोष्ट आहे. मी आणि हरदत्तमामा एकाच इमारतीमध्ये राहत होतो. त्याचे घर पहिल्या मजल्यावर तर आमचे तिसऱ्या .... त्याचा मुलगा, सिद्धेश आणि माझा स्नेहसंबंध हा भावापेक्षा खूप वेगळ्या पातळीवरचा आहे. आमच्यामधला जिव्हाळा, प्रेम हे शब्दातीत आहे. आश्लेषा ... सिद्धेशची मुलगी ... जन्मली तेंव्हा सिद्धेश नोकरीनिमित्त इंग्लंडमध्ये रहात होता. आश्लेषा .... तिची आई आणि आजी-आजोबा-आत्या यांच्यासह राहत होती. रोज कामावरून घरी परत येताना पहिले त्यांच्या घरी जाऊन आश्लेषासोबत थोडा वेळ घालवून मग जेवायला घरी येत असे. जेवण झाल्यावर परत खाली जाऊन तिच्याबरोबर खेळण्यात माझा वेळ कसा जाई काही कळत नसे. ती झोपली की मी घरी परतत असे. तान्हे बाळ होती ती ... तेंव्हा इतर लहान मुलांप्रमाणे गुदगुल्या करणे, डोके अंगावर घासणे असे प्रकार केले की तीसुद्धा सर्वांना प्रतिसाद देत असे. पण आमचा खेळ वेगळाच चाले. ती ज्या बेडवर असे त्याच्या कोणत्यातरी बाजूला खाली लपून मी मांजराचा आवाज करत असे आणि ती तो आवाज शोधण्याचा प्रयत्न करत असे. त्या दिशेला कुशीवर वळण्याचा प्रयत्न करत असे. आणि मी दिसलो की खुदकन हसत असे. तिला मांजरांचा आवाज करणारी बरीच खेळणी मी आणून दिली होती. ती जशी मोठी झाली तशी मग माझी ओळख "म्याव काका" अशीच झाली. आणि मग तिच्याबरोबर खेळता खेळता मी तिचा काका न राहता तिच्या वयाचा मित्र झालो आणि काका गळून नुसता "म्याव" राहिला. 

ती थोडीशी मोठी झाली तसा आमचा लपंडाव खऱ्या अर्थाने रंगू लागला. मी लपलो की ती घरभर शोधत असे आणि नाही सापडलो की अस्वस्थ होऊन मग रडवा चेहरा करून "म्याव तू कुठे आहे?" असे ओरडत फिरत असे. घरातले कुणीतरी मग तिला हळूच कानात मी लपलेली जागा सांगत असे. मग मी सापडलो की तिचे वाक्य ठरलेले असे. "म्याव असे नाही करायचे हा. तू मी सांगते तिथे लपायचे." मग माझी लपायची जागा ती सांगायची. इकडे तिकडे शोधण्याचे नाटक करून मला एकदम अचूक हुडकून काढायची आणि एकदम खुश होऊन जायची. 

तिची लपण्याची पाळी आली की आणखीन मजा यायची. ती सरळ जाहीर करायची, "ए म्याव ... मी किचनमध्ये लपनार. तू मला हॉलमध्ये आणि बेदलुममध्ये शोधायचं हां. मग मी नाही सापडली की तू मला हाक मारायची. मग मी तुला सांगेन .... मी किचन मधे आहे मग तू मला किचन मधे शोधायचं. पण मला आउट नाही करायचं हा. मग तू हरलास की मी बाहेर येणार. OK?" मग ती लपायची ठरल्याप्रमाणे सगळे पार पडायचे आणि ती जिंकायची.

कधी कधी मी थेट ती लपलेल्या जागी जाऊन तिला आउट केले की मग रुसून बसायची, " म्याव ... तू चीटिंग करतो. तू पयले मला बेदलुममधे आणि किचनमधे शोधल नाही." मग परत माझ्यावर डाव येत असे आणि तिला हाक मारत घरभर फिरावे लागत असे.

कधी कधी मी मुद्दाम हॉलमध्ये टाईम पास करायचो. मग ती किचनमधून हळूच बाहेर यायची आणि मी दिसलो की म्हणायची, "ए म्याव, मला बेदलुममधे शोध ना."

कधी मी बराच वेळ मुद्दामच तिला हाक मारत नसे. मग ती बेडरूममधून ओरडून सांगायची, "ए म्याव, मी बेदलुममधे कपटामागे लपलीय का विचार ना?" किंवा "ए म्याव, मी बेदलुममधे खिडकीत लपलीय का विचार ना?"

या साऱ्या लपंडावामधे तिचा हा असा निरागसपणा खूप उठून दिसत असे. आजही तिची निरागसता तशीच टिकून आहे. ही निरागसता हा तिचा स्थायी स्वभाव आहे.


------X------O------X------



Sunday 2 November 2014

तुम्हे हो ना हो_ मुझ को तो _ इतना यकीन है



चित्रपट : "घरोंदा"         गाणे : तुम्हे हो ना हो, मुझ को तो इतना यकीन है
Dear Friends, या गाण्याचे पहिले कडवे ऐकताना मला जे जाणवले ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

मुझे प्या ssss र .... तुम से ....  नहीं है .... नहीं है
मगर मैंने ये राज अब तक ना जाना
के क्यों .... प्यारी लगती है, बातें तुम्हारी
मैं क्यों तुम से मिलने का ढूँढू बहाना

पहिल्या दोन ओळी आणि नंतरच्या दोन ओळी .. ऐकायला similar वाटत असल्या तरी तशा त्या नाहीत. पहिल्या दोन ओळी ज्या स्वरात आहेत त्यापेक्षा किंचित वरचा स्वर पुढच्या दोन ओळीत आहे. पहिली आणि तिसरी ओळ यातदेखील tune मध्ये सूक्ष्म फरक आहे. पहिल्या ओळीत "प्यार" शब्दातला आलाप अंगावर मोरपीस फिरवून जातो. या ओळीत नंतर तीन pause आहेत. तिसऱ्या ओळीत "के क्यो .... प्यारी लगती” असा एकच pause आहे. बाकीची ओळ मनात शिरते ती roller coaster सारखी वर खाली लाडीक आंदोलने घेतच!

"मुझे प्यार .. तुम से ..  नहीं है .. नहीं है” या ओळीत “नही है" या शब्दांचा उच्चार करताना "नही" मधल्या "ही" वर जोर देत त्याचा किंचित ठळक उच्चार करत खेचलाय आणि "है" हा मुलायमपणे सोडलाय. एखादी गोष्ट कशी आहे ते समजूनदेखील जेंव्हा ती स्वीकारायला मन नकार देते तेंव्हा ते असेच वागते नाही का?

"मगर मैंने ये राज अब तक ना जाना" ही ओळ खरे तर नंतरच्या ओळींशी संबंधित आहे. या ओळीनंतर घेतलेला किंचित pause हा ती ओळ आधीच्या "मुझे प्यार तुम से नहीं है, नहीं है" या ओळीला जोडून आल्यासारखी वाटते. आणि मनाची द्विधा अवस्था परत एकदा घट्ट होते. "मगर मैंने ___" ही ओळ अशी वर आणि खाली दोन्ही ठिकाणी जोडली गेल्यामुळे ऐकताना होणारा परिणाम एखाद्या suspense film सारखा होतो.

पहिल्या आणि तिसऱ्या ओळींच्या शेवटी येणारे "जाना" आणि "बहाना" हे शब्द रुना लैलांनी असे उच्चारलेत की ते ऐकणेबलच आहेत. "जाना" हा असा अलगद सोडलाय .. जणू हवेवर तरंगत येणारे पीस आहे आणि "बहाना" शब्द हा लाटांवर वाहात असल्यासारखा मनात तरंग उठवतो आणि आपण जणू उंचावलेल्या लाटेवर स्वार झालोत असे feeling देतो.

कभी मैंने चाहा, तुम्हे छू के देखू
कभी मैंने चाहा, तुम्हे पास लाना
मगर फिर भी
मगर फिर भी इस बात का तो यकीन है
मुझे प्यार तुम से नहीं है, नहीं है

प्रेमात भिजलेले मन जेंव्हा स्वप्न बघते तेंव्हा ते उंच आभाळात झेप घेते. पण खात्री नसलेले मन लगेच जमिनीवर उतरते. तसेच "बहाना" नंतरचे शब्द "कभी मैंने चाहा" एकदम उंच झेप घेतात आणि "तुम्हे छू के देखू" _ "कभी मैंने चाहा" _ "तुम्हे पास लाना" अशा गिरक्या घेत घेत खाली उतरतात. "मगर फिर भी" ला पूर्ण खाली पोचतात आणि मनाला परत शंकांच्या घेऱ्यात उतरवतात. शंकेला दृढता देण्यासाठी "मगर फिर भी" हेच शब्द परत किंचित वरच्या दिशेने स्वरांवर स्वार होतात आणि "मुझे प्यार तुम से नहीं है, नहीं है" या ओळीवर येऊन स्थिरावतात.

ता. क.

"मगर फिर भी इस बात का तो यकीन है" ही ओळ मी जेंव्हा जेंव्हा ऐकतो तेंव्हा तेंव्हा ही pure कविता असल्याची माझी खात्री पटते. या ओळीतला "तो" शब्द मीटरमध्ये बसवण्यासाठी संगीतकाराला बरीच कसरत करावी लागली असावी असा माझा कयास आहे. हा शब्द काढला असता तर ओळ मीटरमध्ये perfect बसली असती. पण "तो" या शब्दामुळे “यकीन” शब्दाला दृढता मिळते. त्यामुळे हा शब्द अपरिहार्य आहे असे माझे मत आहे. म्हणूनच संगीतकार जयदेव यांना सलाम!