१९९६ - स्वामी रामकृष्ण परमहंस
येशूच्या आवरणातून मी बाहेर आलो न आलो तोच अचानक आई जगदम्बेबद्दल अपार ओढ वाटू लागली. तिच्याबद्दल अलोट प्रेम, स्नेह, माया मनामध्ये दाटून येऊ लागली.
माझ्याजागी मला कोणी थोडीशी दाढी वाढलेला माणूस दिसू लागे. मनात कधीही न ऐकलेले बंगाली भाषेतील गाणी, भजने, आरती असे काही आपोआप सुरु होई. कधी तो माणूस मला समोर बसलेला दिसे आणि बाजूला बोट करून काही सांगत असे. त्याच्या बोटाच्या रोखाने पाहताच तिथे देवी प्रत्यक्ष उभी असलेली दिसे.
मी तिला "आई" म्हणून हाक मारू लागलो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या प्रत्येक हाकेनंतर ती मला दिसू लागली. आदिशक्ती, आदिमाया, जगदंबा ... अशा अनेक रूपाने वावरणारी ती ... कधी लक्ष्मीमाता, कधी गायत्रीमाता, कधी भवानीमाता तर कधी सरस्वतीमाता अशा अनेक नयनमनोहर रूपांमध्ये दिसू लागली. कधी कधी कालीमातेच्या तर कधी चंडिकामातेच्या रौद्रावतारात दिसली. पण चेहरा रौद्र असूनही ती सौम्यदर्शना होती. तिचे ते रूपही भयंकर वा भितीदायक न वाटता, आई म्हणून हवेहवेसे वाटले.
स्वामी विवेकानंदांचे गुरु, स्वामी रामकृष्ण परमहंस या शक्तीची ती चुणूक होती. त्यांना आईबद्दल जी ओढ होती त्याच्या कणभरदेखील एखाद्याला वाटले तर तो कुठच्या कुठे पोहोचेल.
परमहंसांनी देवीच्या मातृत्वाला हात घालण्याची, हाक मारण्याची, साद घालण्याची शिकवण दिली. तिला अभिप्रेत असलेली पुत्राची हाक कशी मारावी ते शिकवले म्हणूनच तिचे हे दर्शन होऊ शकले.