Sunday, 3 May 2015

वासना आणि प्रेम



वासना आणि प्रेम यात फार सूक्ष्म रेषा आहे. जगात प्रत्येक जण स्वतःच्या भावनांना उदात्त प्रेम समजत असतो. मग खरे प्रेम आणि वासना यात फरक कसा ओळखावा?

दोन्हीमध्ये एक समान धागा आहे. ती म्हणजे कोणत्या तरी गोष्टीची भूक किंवा तृष्णा ....!

वासना असेल तर तृप्ती कधीच होत नाही. मन आणि शरीर सारखे सांगत असते "आणखीन पाहिजे .... आणखीन पाहिजे". कधी एकदा आपल्या वासनेची पुर्ती होते ही घाई लागलेली असते.

प्रेमाला मात्र संयमाची जोड असते.

वासना संभ्रमित असते आणि हक्क गाजवते तर प्रेम विश्वास देते.

वासना आपल्याला स्वतःला काय हवे तेव्हढेच पाहते. प्रेम स्वतःचा विचार करत नाही. सर्वांना काय हवे याचा विचार करते.

वासना व्यसनाला जन्म देते. एकदा तृप्ती झाली तरी थोड्या वेळात लगेच पुन्हा तृष्णा लागणे हे वासनेचे लक्षण आहे. पुन्हा पुन्हा तृष्णापुर्तीची आस लागणे यालाच व्यसन म्हणतात. माणसाला कितीही मिळाले तरी पुनः पुन्हा तेच तेच हवे असते .. परत परत तो त्याचाच विचार करत असतो. एखाद्या ठिकाणी आपल्याला हवे ते आहे हे समजले कि माणसे अक्षरश तिथून ओरबाडून आपली तृष्णा पुरवायचा प्रयत्न करतात. त्यांना याचे भान नसते कि समोर वस्तू आहे, निसर्ग आहे, व्यक्ती की शक्ती... फक्त आपले शरीर आणि मन यापलीकडे विचाराची धाव जात नाही. वस्तू तुटून जात असते, व्यक्ती मोडून पडत असते, निसर्गाचा संहार होत असतो, शक्तीचा क्षय होत असतो. समोरच्याने कितीही सांगितले तरी आपण काय करतोय हे भान नसते. पण याची पर्वा न करता ती वस्तू, व्यक्ती शक्ती नष्ट होईपर्यंत शोषण करत आपली तृष्णापुर्ती करण्यात माणसे मग्न असतात.

प्रेमात माणूस इतरांना काय देऊ शकतो याचा विचार करतो. आपल्याकडे नसेल तर कुठून तरी ते इतरांना मिळावे याचा विचार करत असतो. आपल्या वाट्याला जे आणि जितके येते त्याचा आदरपूर्वक स्वीकार करून ते आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्वांना वाटून देत असतो. जो जितका वाटत जातो त्याला तितके परत मिळत जाते. कधी कधी तर इतके मिळते की वाटूनही पुन्हा झोळी भरलेलीच राहते.

प्रेमाची अत्यंत उत्कट अवस्था म्हणजे राधा  आणि मीरा ... एकीला सुरुवातीला थोडा काळ थेट सहवास मिळाला आणि त्यावर तिने उरलेले आयुष्य समाधानात काढले. दुसरीला प्रत्यक्ष सहवास किती मिळाला? मात्र तरीही ती प्रेमात बुडून राहिली. दोघींनीही कृष्णाला कधीही धमकी दिली नाही की मला तू अमुक दिले नाहीस तर मी तमुक करेन किंवा मला हे मिळाले नाही तर मी काही तरी करून घेईन. प्रेमाचा आधार असतो ... विश्वास ! तिथे धमकी नसते ... खात्री असते. जे माझे आहे ते मला आज ना उद्या मिळेल याची जाणीव असते आणि ते मिळेपर्यंत थांबायची तयारी असते.

प्रेम आणि वासना दोन्हीचा मार्ग काट्याकुट्यामधून जातो.... वेदनामय असतो.

वासना असेल तर माणूस समोरच्याकडे रडून, भीक मागून, धाक दपटशा दाखवून, भावूक होऊन, भावनात्मक धमक्या देऊन आपली मागणी रेटत राहतो. आपली वेदना हीच सर्वात श्रेष्ठ .. आणि तिच्यापुढे सर्व जग थिटे आहे हे स्वतःशीच घोकत असतो आणि समोरच्याला पटवून देत राहतो.

प्रेम मात्र माणसाला ताकद देते. कितीही वेदना झाली तरी चेहऱ्यावरचे हसू कायम असते ... मनापासून असते आणि मुख्य म्हणजे आपण काही जगावेगळे करतोय असा अविर्भाव, अभिमान यांचा लवलेशही नसतो. याचे अंतिम टोक म्हणजे आईचे प्रेम, गुरुचे प्रेम ... यात काहीही मिळवण्याची इच्छा नसते. लेकराने लाथ मारली तरी "सुखी राहा" हेच शब्द उमटतात.

आपण कसे आहोत काय वागतो आहोत हे प्रत्येकाने डोळसपणे पाहिले आणि अभ्यासले तर आपले आपल्या जोडीदारावर, मित्रावर, मैत्रिणीवर, नातेवाईकांवर प्रेम आहे की वासना हे प्रत्येकाला समजू शकेल. पण घोडे अडते ते इथेच ... डोळे उघडून माझ्या स्वतःकडे पहायची माझी तयारी आहे का?